पालघरमध्ये बंदी असतानाही प्लास्टिकचा सर्रास वापर

बोईसर (वार्ताहर) : केंद्र सरकारतर्फे प्लास्टिक बंदीसाठी जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सदर प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र पालघर ग्रामीणमध्ये या निर्णयाला हरताल फासण्यात येत आहे. येथील बोईसर, सरावली, खैरापाडा, पस्थळ या चार प्रमुख ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये ग्रामपंच्यात च्या दुर्लक्षामुळे प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत आहे. या चार ग्रामपंचायत क्षेत्रात प्लास्टिक वापरण्यास बंदी असलेल्या हलक्या प्लास्टिक पिशव्याचा वापर सर्रास रोज सुरू आहे. किराणा मालाची दुकाने, बेकरी, जनरल स्टोअर्स, भाजीपाला, दुकाने व घराघरातून प्लॉस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायत मधील डम्पिंग ग्राउंड वर जमा होत असताना याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे.

शहरातील खाद्यपदार्थ आणि फळविक्रेते त्याचबरोबर मटण आणि चिकन शॉपवरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. या ग्रामपंचायत हद्दीमध्ये व्यापारी दुकानांची संख्याही अधिक आहे. बोईसर, सरावली, खैरपाडा क्षेत्रात बाजारपेठा विकसित झाल्याने या ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिक वापर आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चार ग्रामपंचायतींच्या अखत्यारित असलेल्या बाजारपेठ परिसरामध्ये कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. कडक निर्बंध लादण्यासाठी ग्रामपंचायतीचे हात तोकडे पडत असल्याने बंदी असतानाही सिंगल यूज प्लास्टिक वापरले जात आहे.

या चार ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिकचा वापर होत असताना, ग्रामपंचायत आधिकारी वर्ग प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यास टाळाटाळा करत असल्याने शहरातील बहुतांश दुकाने प्लॉस्टिकचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. ग्रामपंचायत घंटागाडीच्या माध्यमातून जो कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये पडतो, त्यात सर्वाधिक प्लास्टिकचे प्रमाण अधिक असल्याची बाब लक्षात येत आल्याने प्लास्टिक वापरास बंदी असली तरी प्लॅस्टिकचा संचय होतो कोठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; २६ आणि २७ ऑगस्टला होणार परीक्षा

मुंबई (वार्ताहर) : मुंबई विद्यापीठाच्या पेट (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार मानव्यविद्याशाखेच्या परीक्षा २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा २६ ऑगस्ट रोजी २ ते ४ या वेळेत घेतल्या जाणार आहेत.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या परीक्षा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते १२ या काळात होणार असून या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. २० ऑगस्टपासून विद्यार्थ्यंच्या सरावासाठी सुरु झालेल्या ऑनलाईन सराव परीक्षा २३ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४७८१ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक २१०० एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १२३३, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७८४ आणि आंतरविद्याशाखेसाठी ६६४ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ५८४ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापाठोपाठ व्यवस्थापन या विषयासाठी २४८ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.

आमदारांच्या वाहनचालकांना परिवहन विभागाकडून मिळणार प्रशिक्षण

मुंबई (प्रतिनिधी) : माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघातानंतर सर्व आमदारांच्या वाहनचालकांना परिवहन विभागाच्या पुढाकाराने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बुधवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर वाहनचालकावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर राज्यातील नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळण्याबाबत भाष्य केलं होतं. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळण्यासंदर्भात मत व्यक्त केलं होतं. लांब पल्ल्याचा प्रवास करताना चालकांना डुलकी येऊन अपघात घडू शकतात.

मेटे यांच्या अपघातानंतर आता सरकार देखील सतर्क झालं आहे. अनेक आमदार अधिवेशनासाठी किंवा मंत्रालयात येण्यासाठी आपल्या गाडीने मुंबईकडे येतात. यातही रात्रीच्या वेळी प्रवास करत येऊन सकाळी मुंबई गाठली जाते. मात्र असा रात्रीच्या वेळेचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. यामुळे सरकारने आता आमदारांच्या चालकांना याबाबत प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे.

सिंधुदुर्ग कन्या पूर्वा गावडेला जलतरण मध्ये रौप्यपदक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने गुजरात-अहमदाबाद येथे झालेल्या ज्युनिअर मुलींच्या खेलो इंडिया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . जुलै मध्ये गेल्याच महिन्यात ओडिशा-भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर वॉटर पोलो स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले होते.

त्यानंतर रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या १८ वर्षाखालील ज्युनिअर मुलीच्या खेलो इंडिया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत २०० मीटर बटरफ्लाय मध्ये दुसरा क्रमांक पटकावला ऑलम्पिक जलतरणपट्टू वीरधवल खाडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.

पूर्वा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे राहणारी असून ओरोस डॉन बॉस्को व पणदूर स्कुल मध्ये सातवी पर्यत शिक्षण घेतल्यानंतर पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्याकडून जलतरण चे प्रशिक्षण घेत आहे त्यापूर्वी सिंधुदुर्गनगरी व जलतरण तलावात प्रवीण सुलोकार व दीपक सावंत यांच्याकडून प्रशिक्षण घेत होती पुणे येथे ती दहावी मध्ये शिक्षण घेत जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे.

ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाची होणार पुनर्बांधणी

मुंबई (वार्ताहर) : ब्रिटिश काळातील १५० वर्षे जुना अशा कर्नाक पूलाचे पाडकाम लवकरच होणार आहे. कर्नाक पूल पाडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे २० ऑगस्ट ते २० नोव्हेंबर या काळात हा पूल पाडून या पुलाची पुनर्बांधणी १९ महिन्यांमध्ये करण्यात यावी अशा सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.

त्यामुळे कर्नाक बंदर पूल २०२४ पर्यंत बंद राहणार आहे. हा पूल बंद झाल्यावर सीएसएमटी, फोर्ट दिशेला जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. संभाव्य वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. वाहतूक नियोजनासाठी ७० वाहतूक मदतनीस, १०० चमकणारे दिवे, ५० रिफ्लेक्टर जॅकेट, ५० बटन आणि ५० दिशादर्शक फलक उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहे. तसेच आप्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास बंद पडलेली वाहने हटवण्यासाठी एक हेवी क्रेन २४ तास उपलब्ध असेल. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांनी मागणी केलेले साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी सूचना मध्य रेल्वेने महापालिकेला केली आहे.

पूल पुनर्बांधणी कालावधीत कुंदनलाल काटा येथून पोहमल जंक्शनकडे जाणारी दक्षिण वाहिनीवरील वाहतूक दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत बंद राहणार आहे. याला वाडीबंदर जंक्शन- एसव्हीपी मार्ग-एस टी जंक्शन-भेंडीबाजार-मोहम्मद अली रोड असा पर्यायी मार्ग असेल.

झिम्बाब्वेने भारताला विजयासाठी झुंजवले! भारताचे ३-० असे निर्भेळ यश

हरारे (वृत्तसंस्था) : शुबमन गीलचे शतक आणि इशन किशनचे अर्धशतक यासह कुलदीप यादव, अक्षर पटेल यांची दमदार गोलंदाजी या जोरावर भारताने यजमान झिम्बाब्वेला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत करत मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. तिसरा सामना भारताने जिंकला असला तरी दुबळ्या झिम्बाब्वेने भारताला विजयासाठी झुंजवले. त्यांच्या सिकंदर रझाने ११५ धावा जमवत भारताला घाम फोडला.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात अडखळत झाली. त्यांचे दोन्हीही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. टॉनी म्युन्युएनगाही फार काळ मैदानात थांबला नाही. सीन विलियम्स आणि सिकंदर रझा या जोडीने यजमानांना तारले. सीनने ४५ धावा जमवत सिकंदरची साथ सोडली. त्यानंतर सिकंदर रझाने एकहाती फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. एवन्सने रझाला छान साथ देत झिम्बाब्वेला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. आवेश खानने एवन्सला बाद करत झिम्बाब्वेला धक्का दिला. तळात एवन्सने ३६ चेंडूंत २८ धावांचे योगदान दिले. सिकंदर रझाने ११५ धावांची शतकी खेळी करत झिंम्बाब्वेला विजयासमीप आणले होते. परंतु सिकंदर बाद झाल्यानंतर यजमानांच्या विजयाच्या आशा संपल्या. २७६ धावांवर त्यांचा डाव आटोपला.

तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकीय सलामी देत भारताला बरी सुरुवात करून दिली. शिखर धवनने ४०, लोकेश राहुलने ३० धावांचे योगदान दिले. शुबमन गील आणि इशान किशनने भारताच्या धावगतीला वेग आणला. शुबमनने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने ९७ चेंडूंत १३० धावा तडकावल्या. त्यात १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. इशन किशनने संयमी फलंदाजी केली. त्याने ६१ चेंडूंत ५० धावा तडकावल्या. त्यात ६ चौकारांचा समावेश आहे. भारताने ५० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात २८९ धावा केल्या. झिम्बाब्वेच्या एव्हन्सने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. त्याने १० षटकांत ५४ धावा देत ५ बळी मिळवले. व्हिक्टर नाऊची लेके जाँगवे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला. या गोलंदाजांना भारताच्या धावा रोखता आल्या नाहीत.

सिकंदर रझाचे शतक

यजमान झिम्बाब्वेला त्यांच्याच देशात क्लीन स्वीप देण्याची कामगिरी यजमान भारताने सोमवारी केली. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने ३-० अशी जिंकत निर्भेळ यश मिळवले. असे असले तरी सोमवारच्या शेवटच्या सामन्यात यजमानांनी भारताला विजयासाठी झुंजवले. त्यांच्या सिकंदर रझाने ११५ धावा जमवत यजमानांच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.

विरारमध्ये बनावट मॅसेजद्वारे वीज ग्राहकांची फसवणूक

विरार (प्रतिनिधी) : थकित वीजबिल वेळेत भरा, अन्यथा तुमचे वीज कनेक्शन कापले जाईल, असा मॅसेज ब-याचशा वीज ग्राहकांना आल्यानंतर ग्राहकांची झोप उडाली आहे. याबाबत ग्राहकांनी मुख्य वीज अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर क्रमांकावरून आलेला मॅसेज व सदर क्रमांकच फ्रॉड असल्याचे सांगितले आहे. अफवा पसरवणा-या बनावट वीज मॅसेजवर कोणत्याही ग्राहकाने विश्वास ठेवू नये, असे आवाहन वीज वितरण महामंडळाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या वसईतील ग्राहकांना त्यांच्या व्हॉटसअॅपवर मॅसेज येत असून थकीत वीजबिल त्वरित भरा; अन्यथा रात्री ९.३० वाजता वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मोबाईलवर आलेला मॅसेज हा इंग्रजीमध्ये असून या मॅसेजबाबत ग्राहकांनी वीज वितरण महामंडळाकडे चौकशी केली असता त्यांनी हा मॅसेज बनावट असल्याचे म्हटले आहे.

ज्या क्रमांकावरून मॅसेज आला त्या क्रमांकाबाबत वीज वितरण महामंडळाने पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या आहेत. अशा बनावट मॅसेजवर वीज ग्राहकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन वीज वितरण महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी केले आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येते. या द्रुतगती महामार्गावर कायमच वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात. सकाळच्या वेळी ९ ते ११ च्या दरम्यान या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. संध्याकाळी ४ नंतर रात्री ११ पर्यंत देखील तीच परिस्थिती असते. सकाळी कार्यालयात जाण्यासाठी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपल्याने अनेकजण घरी जाण्याच्या तयारीत असतात. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासनाला तातडीने खड्डे भरा हा पहिला आदेश दिला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिलाच आदेश अजुनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. अनेक ठिकाणचे खड्डे मृत्यूचे सापळे ठरत आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे भरण्याचे काम आज सकाळपासून सुरू असल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हाईवेवर अंधेरीच्या दिशाने जाणा-या मार्गावर वाकोला ते माहिम दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाडमध्ये द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. दीड ते दोन तास या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालकांना थांबावे लागत आहे. या वाहतूक कोंडीमध्ये काही रुग्णवाहिका सुद्धा अडकल्याचे दृश्य पाहायला मिळते.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

सेन्सेक्स ८७२ अंकानी घसरला

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८७२ अंकांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २६७ अंकांची घसरण झाली.

शेअर बाजारातील आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने झाल्याने गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. शेअर बाजारात सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली असून सेन्सेक्समध्ये १.४६ टक्क्यांची घसरण झाली असून तो ५८,७७३ अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये १.५१ टक्क्यांची घसरण झाली असून तो १७,४९० अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही ६८८ अंकांची घसरण झाली असून तो ३८,२९७ अंकांवर पोहोचला आहे.

सोमवारी शेअर बाजारामध्ये १२२८ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर २२१४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज १६३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मात्र ६.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येते आहे. दरम्यान डॉलरच्या तुलनेत सोमवारी रुपयाच्या किमतीत ९ पैशांची घसरण झाली असून रुपयाची किंमत ७९.८७ इतकी आहे.