हरारे (वृत्तसंस्था) : शुबमन गीलचे शतक आणि इशन किशनचे अर्धशतक यासह कुलदीप यादव, अक्षर पटेल यांची दमदार गोलंदाजी या जोरावर भारताने यजमान झिम्बाब्वेला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत करत मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. तिसरा सामना भारताने जिंकला असला तरी दुबळ्या झिम्बाब्वेने भारताला विजयासाठी झुंजवले. त्यांच्या सिकंदर रझाने ११५ धावा जमवत भारताला घाम फोडला.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात अडखळत झाली. त्यांचे दोन्हीही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. टॉनी म्युन्युएनगाही फार काळ मैदानात थांबला नाही. सीन विलियम्स आणि सिकंदर रझा या जोडीने यजमानांना तारले. सीनने ४५ धावा जमवत सिकंदरची साथ सोडली. त्यानंतर सिकंदर रझाने एकहाती फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. एवन्सने रझाला छान साथ देत झिम्बाब्वेला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. आवेश खानने एवन्सला बाद करत झिम्बाब्वेला धक्का दिला. तळात एवन्सने ३६ चेंडूंत २८ धावांचे योगदान दिले. सिकंदर रझाने ११५ धावांची शतकी खेळी करत झिंम्बाब्वेला विजयासमीप आणले होते. परंतु सिकंदर बाद झाल्यानंतर यजमानांच्या विजयाच्या आशा संपल्या. २७६ धावांवर त्यांचा डाव आटोपला.
तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकीय सलामी देत भारताला बरी सुरुवात करून दिली. शिखर धवनने ४०, लोकेश राहुलने ३० धावांचे योगदान दिले. शुबमन गील आणि इशान किशनने भारताच्या धावगतीला वेग आणला. शुबमनने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने ९७ चेंडूंत १३० धावा तडकावल्या. त्यात १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. इशन किशनने संयमी फलंदाजी केली. त्याने ६१ चेंडूंत ५० धावा तडकावल्या. त्यात ६ चौकारांचा समावेश आहे. भारताने ५० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात २८९ धावा केल्या. झिम्बाब्वेच्या एव्हन्सने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. त्याने १० षटकांत ५४ धावा देत ५ बळी मिळवले. व्हिक्टर नाऊची लेके जाँगवे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला. या गोलंदाजांना भारताच्या धावा रोखता आल्या नाहीत.
सिकंदर रझाचे शतक
यजमान झिम्बाब्वेला त्यांच्याच देशात क्लीन स्वीप देण्याची कामगिरी यजमान भारताने सोमवारी केली. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने ३-० अशी जिंकत निर्भेळ यश मिळवले. असे असले तरी सोमवारच्या शेवटच्या सामन्यात यजमानांनी भारताला विजयासाठी झुंजवले. त्यांच्या सिकंदर रझाने ११५ धावा जमवत यजमानांच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.