मुंबई (वार्ताहर) : ब्रिटिश काळातील १५० वर्षे जुना अशा कर्नाक पूलाचे पाडकाम लवकरच होणार आहे. कर्नाक पूल पाडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे २० ऑगस्ट ते २० नोव्हेंबर या काळात हा पूल पाडून या पुलाची पुनर्बांधणी १९ महिन्यांमध्ये करण्यात यावी अशा सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.
त्यामुळे कर्नाक बंदर पूल २०२४ पर्यंत बंद राहणार आहे. हा पूल बंद झाल्यावर सीएसएमटी, फोर्ट दिशेला जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. संभाव्य वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. वाहतूक नियोजनासाठी ७० वाहतूक मदतनीस, १०० चमकणारे दिवे, ५० रिफ्लेक्टर जॅकेट, ५० बटन आणि ५० दिशादर्शक फलक उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहे. तसेच आप्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास बंद पडलेली वाहने हटवण्यासाठी एक हेवी क्रेन २४ तास उपलब्ध असेल. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांनी मागणी केलेले साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी सूचना मध्य रेल्वेने महापालिकेला केली आहे.
पूल पुनर्बांधणी कालावधीत कुंदनलाल काटा येथून पोहमल जंक्शनकडे जाणारी दक्षिण वाहिनीवरील वाहतूक दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत बंद राहणार आहे. याला वाडीबंदर जंक्शन- एसव्हीपी मार्ग-एस टी जंक्शन-भेंडीबाजार-मोहम्मद अली रोड असा पर्यायी मार्ग असेल.