मुंबई (प्रतिनिधी) : माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघातानंतर सर्व आमदारांच्या वाहनचालकांना परिवहन विभागाच्या पुढाकाराने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बुधवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर वाहनचालकावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर राज्यातील नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळण्याबाबत भाष्य केलं होतं. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळण्यासंदर्भात मत व्यक्त केलं होतं. लांब पल्ल्याचा प्रवास करताना चालकांना डुलकी येऊन अपघात घडू शकतात.
मेटे यांच्या अपघातानंतर आता सरकार देखील सतर्क झालं आहे. अनेक आमदार अधिवेशनासाठी किंवा मंत्रालयात येण्यासाठी आपल्या गाडीने मुंबईकडे येतात. यातही रात्रीच्या वेळी प्रवास करत येऊन सकाळी मुंबई गाठली जाते. मात्र असा रात्रीच्या वेळेचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. यामुळे सरकारने आता आमदारांच्या चालकांना याबाबत प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे.