बदलापूर: विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बदलापूर येथील फातिमा हायस्कूलने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला आज सुरुवात झाली.
या प्रदर्शनांमधून महाराष्ट्राची संस्कृती, गणित, भूगोल, विज्ञान या विषयांव आधारित प्रतिकृती, माहितीपूर्ण तक्ते, शैक्षणिक खेळ आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाला पालक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतूक केले.
मुरूड: महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरुड पद्मदुर्ग येथील पक्ष कार्यालयात जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपजिल्हा अध्यक्ष शैलेश खोत आणि शहर अध्यक्ष जागन पुलेकर यांच्या उपस्थितीत पक्ष संघटना नवीन पद नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी मुरुड तालुका सचिव राजेश गजानन तरे, विभाग अध्यक्ष मनील सुंदर कचरेकर, उपविभाग अध्यक्ष प्रतीक प्रमोद कणगी, शहर सचिव विघ्नेश मंगेश जगताप यांना पद नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी उप तालुका अध्यक्ष प्रशांत भाटकर, मनसे शहर सेना तालुका अध्यक्ष आशिष खोत, उपशहर अध्यक्ष राजेश गुप्ते, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष अथर्व खोत, विभाग अध्यक्ष आकाश खोत, सिद्धेश खेडेकर, सुजित गुरव, मनिष शामा, अंकित गुरव, राहुल गोसावी, निलेश पुलेकर, सुरज जैसवाल, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
मुंबई: दरवर्षी होणारा काला घोडा कला महोत्सव कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरु झाला आहे. आज सुरु झालेला हा महोत्सव पुढील ९ दिवस म्हणजेच १२ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे. दरवर्षी उभारण्यात येणाऱ्या विशिष्ट कलाकृती पाहण्यासाठी लोक येथे गर्दी करतात. यावेळी या महोत्सवात नक्की काय काय पाहायला मिळणार याची लोकांमध्ये उत्सुकता आहे.
नृत्य, संगीत, व्हिज्युअल आर्ट्स, थिएटर, साहित्य, खाद्यपदार्थ, बालसाहित्य याची रेलचेल असणाऱ्या या महोत्सवात मागील वेळी दिड लाख लोक उपस्थित होते असे सांगण्यात आले. के दुबाश मार्ग, रॅम्पर्ट रो, यशवंतराव चव्हाण सेंटर, क्रॉस मैदान आणि कूपरेज बँडस्टँड येथे या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवाचा एक महत्वाचा भाग म्हणजे हेरिटेज वॉक.
कला आणि साहित्याची आवड असलेल्यांना काला घोडा कला महोत्सवात पाहण्यासारखे बरेच काही आहे आणि त्यासाठी एक दिवस पुरेसा नाही. जवळच एशियाटिक लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला आवर्जून भेट द्या. खवय्यांनी येथील आयकॉनिक इराणी रेस्टॉरंटला नक्की भेट द्यायला हवी. फॅशन प्रेमी असाल आणि खरेदीची आवड असेल, तर या कुलाबा कॉजवेकडे तुम्हाला स्वस्तात मस्त गोष्टी मिळतील.
काळा घोडा म्हणजे काय?
या उत्सवाला त्याचे नाव त्याच्या जवळ असलेल्या काळा घोडा या पुतळ्यावरून मिळाले. काळा घोडा हा साऊथ मुंबईच्या इतिहासाचा आणि उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. वास्तुविशारद अल्फाज मिलर आणि श्रीहरी भोसले यांनी हा ‘स्पिरिट ऑफ काला घोडा’ पुतळा साकारला होता.
अंबरनाथ: अंबरनाथ मतदार संघातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रातील विकास कामांकरिता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नांतून अल्पसंख्याक विभागाच्या बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अंबरनाथ पश्चिम येथील प्रभाग क्र.२८ उलन चाळ बसेरा, बटीयार खाना पासून ते जहीर शेख यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, उलनचाळ मधील युसुफ शेख यांच्या घरापासून रफिकलाला यांच्या घरापर्यंत पायवाट तयार करणे. प्रभाग क्र.२३ मधील मदनसिंग गार्डनच्या बाजूची पत्राचाळ जवळील ड्रेनेज लाईन व गटार लाईनचे नूतनीकरण करणे आणि प्रभाग क्र.२१ मधील डी.एम.सी.न्यू. कॉलनी वुळन चाळ परिसर ते संदीप मांजरेकर यांच्या घरापासून प्रिन्स अपार्टमेंट पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच उल्हासनगर – ५ येथील पॅनल क्र.१९ मधील क्रांती नगर, इंदिरा नगर विठ्ठल नगर आणि नेहरू नगर येथे सी.सी.रस्ता व गटार बनविणे, पॅनल क्र.२० मधील पटेल नगर येथील मस्जिद जवळ सी.सी.पायवाटा व गटार बनविणे इत्यादी विकास कामे करण्यात येणार आहेत. या विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी मतदार संघातील नागरीकांच्या वतीने आभार मानले आहेत.
पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आम्ही पक्षाकडे तिकीटाची मागणीही केली होती. पण तिकीट देण्यात आले नाही. का दिले नाही माहीत नाही? अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त करताना मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यात पाणीही आले होते. शैलेश टिळक नाराज असल्याने कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर शैलेश टिळक यासंबंधी बोलताना म्हणाले की, पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु वेगळा निर्णय घेतला गेला. पक्षाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, पक्षाने घेतलेला निर्णय मान्य आहे परंतु मुक्ता टिळक यांच्या कामावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनात खंत आहे. कोणतीही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एखाद्याच्या घरातील व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नैसर्गिकपणे उमेदवारी दिली जाते. मीही उमेदवारीची मागणी केली होती, असे शैलेश टिळक म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल चर्चा झाली. उमेदवारी देण्याबाबत अजून काही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले होते. दिल्लीतून निर्णय होईल असे त्यांनी सांगितले होते. आज उद्या निर्णय होईल असेही ते म्हणाले होते. तसेच ताई गेल्यानंतर घरी यायचे राहिले होते. त्यामुळेही फडणवीस काल घरी आले होते. काल त्यांनी कोणतेही संकेत दिले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही पक्षासोबतच राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत.
आता हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप निवडणूक लढणार
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने उमेदवार जाहीर केले. यामध्ये हेमंत रासने यांना कसब्यातून तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदार संघात टिळक कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने त्यांच्या जागी हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली आहे.
या निवडणुकीत भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावलले अशी चर्चा होत असतानाच यावर पालकमंत्री आणि भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्रजी आणि मी टिळक कुटुंबाला भेटून योग्य ते स्थान देण्यात येईल, अशाप्रकारे आश्वस्त केले आहे. त्यांनी देखील पक्षासोबत राहू असे म्हटले आहे. तसेच जगताप यांच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हता. लक्ष्मण जगताप यांच्या मुलाने समजदारी दाखवली. आमचं कुटुंब कोणीही तोडू शकणार नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठिंशी संपूर्ण कुटूंब राहिल, असे त्यांच्या मुलाने सांगितल्याचे पाटील यांनी म्हटले.
टिळक कुटुंबाला डावलण्यात आले का, या प्रश्नावर पाटील म्हणाले की, टिळक कुटुंबाशी चर्चा करून ही निवडणूक जिंकणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. त्यावर शैलेंद्र टिळक आणि कुणालला महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून घोषित केले आहे. टिळक कुटुंबाच्या पाठिशी आम्ही आहोत, असेही पाटील यांनी म्हटले.
अदानी प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : भारतीय बँकिंग प्रणाली चांगल्या स्थितीत आहे. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. अदानी समूहातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या दोन्हींची गुंतवणूक मर्यादेत आहे. तसेच बँक आणि एलआयसी दोन्ही फायद्यात आहेत आणि गुंतवणूकदारांना सध्या काळजी करण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला मोठ्या प्रमाणात तोट्याचा सामना करावा लागत आहे. या अहवालामुळे गेल्या आठ दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले आहे. त्याचबरोबर, कंपनीच्या मार्केट कॅपला ८ लाख ७६ हजार ५२४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांनाही झटका बसला आहे. गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. या मुद्द्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अदानी प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, माझ्या समजुतीनुसार, अदानी समूहातील एलआयसी आणि एसबीआयची गुंतवणूक ठरविण्यात आलेल्या मर्यादेतच आहे. यावेळी त्यांनी अदानी समूहातील एसबीआय आणि एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनाही स्पष्टपणे उत्तरे दिली.
त्या म्हणाल्या, की मी नमूद करू इच्छिते की एसबीआय आणि एलआयसी या दोघांनी त्यांची तपशीलवार माहिती संबंधित सीएमडी सोबत शेअर केली आहे. त्या अशाही म्हणाल्या की, भारतीय बँका आज एनपीएचे ओझे कमी करण्यात यशस्वी ठरल्या असून त्या मजबूत स्थितीत आहेत.
या मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की, एसबीआय आणि एलआयसीने आपण ओव्हरएक्सपोज केलेले नसल्याचे दोघांनी स्पष्ट केले आहे. दोघांच्या वतीने अदानी समूहाच्या शेअर्सचे एक्सपोजर मर्यादेत असल्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यांचे मूल्यांकन घसरल्यानंतरही ते फायद्यात आहेत. सीमारामण म्हणाल्या की, सध्या भारतीय बँकिंग व्यवस्थेने एनपीएचे ओझे कमी केले आहे. बँकेकडे मजबूत दुहेरी ताळेबंद आहे. एनपीए आणि रिकव्हरी स्थिती चांगली आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी कोणतीही परिस्थिती सध्यातरी दिसत नाही, असे त्या म्हणाल्या.
सत्र आणि उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तरूणाची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
नवी दिल्ली : दोघांच्या सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या एका व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, आरोपी व्यक्तीसोबत राहण्यासाठी महिलेने आपला पती आणि तीन मुलांना सोडले होते. तसेच, बलात्काराचा आरोप असलेली व्यक्ती देखील विवाहित होती.
दिल्लीत राहणाऱ्या नईम अहमदला उच्च न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. परंतु न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने बलात्काराच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने नमूद केले की, अनेक कारणांमुळे सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बिघडल्यानंतर सतत महिलांकडून बलात्काराचा आरोप करण्यासाठी याचा वापर करतात.
अहमदने लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतूने लग्नाचे वचन दिले होते, असा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला होता, असे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी महिलेची बाजू मांडताना सांगितले. तर दुसरीकडे, अहमदचे वकील राज के चौधरी यांनी सांगितले की, महिलेने मोठ्या रकमेची मागणी पूर्ण न केल्याने बलात्काराची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, महिलेचे लग्न झाले असून तिला तीन मुले आहेत. पती आणि मुलांना सोडून ती २००९ मध्ये अहमदसोबत पळून गेली. त्यानंतर २०११ मध्ये एका मुलाचा जन्म झाला. यानंतर अहमदने लग्न टाळले. २०१२ मध्ये महिला अहमदच्या मूळ गावी गेली असता तो विवाहित असून त्याला आधीच मुले असल्याचे आढळून आले. तरीही, महिलेने २०१४ मध्ये आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि पतीसोबत आपली तीन मुले सोडली. हे सर्व घडल्यानंतरही अहमदने संबंधित महिलेशी लग्न करण्याचे टाळले. त्यामुळे २०१५ मध्ये या महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शनिवारी सादर केला. तब्बल ३७ वर्षांनी प्रशासकांच्या माध्यमातून महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. या अर्थसंकल्पात नवीन करवाढीची कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, सध्याच्या महसुली स्रोतांमधून महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतांचा शोध घेणे, आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.
छाया : अरुण पाटील
सुमारे ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा ५२६१९.०७ कोटींच्या या अर्थसंकल्पात चालू विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी २७ हजार २४७ कोटी ८० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे.
छाया : अरुण पाटील
मुंबई महापालिकेत आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे तब्बल ३७ वर्षांनी प्रशासक म्हणून इक्बाल सिंह चहल यांना प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला. एप्रिल १९८४ मध्ये द. म. सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९८५ मध्ये जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी चहल यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प जाहीर केला.
छाया : अरुण पाटील
यामध्ये प्रारंभी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला. अर्थसंकल्पाचे आकारमान मागील वर्षाच्या तुलनेत १४.५२ टक्क्यांनी जास्त आहे. मागील अर्थसंकल्पात ४५९४९.२१ कोटी रुपये होते, तर यावर्षी ५२,६१९.०७ कोटी रुपये एवढे आहे. हा अर्थसंकल्प आनंदमय असल्याचे महापालिका प्रशासकांनी म्हटले आहे.
चार-पाच तासांऐवजी अवघ्या २० मिनिटांत अर्थसंकल्प सादर
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेचा २०२३-२४ साठीचा ५२,६१९.०७ कोटींचा मुख्य अर्थसंकल्प पालिका मुख्यालयात शनिवारी सकाळी सादर करण्यात आला. महापालिकेच्या एवढ्या आर्थिक वर्षात यंदा प्रथमच आयुक्तांनी अवघ्या २० मिनिटात अर्थसंकल्प सादर केला. एरवी हाच अर्थसंकल्प सादर करायला चार ते पाच तास लागतात. शनिवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. बरोबर १० वाजून ४८ मिनिटांनी त्याची सांगता झाली. अवघ्या १५ ते १८ मिनिटांच्या कालावधीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
छाया : अरुण पाटील
मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प
२०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये १२८७.४१ कोटी आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १६८०.१९ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.
नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करुन देण्याकरीता के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग १५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक सी.टी.स्कॅन मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याबरोबरच, के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग २५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक ३ टेस्ला एमआरआय मशिन उभारण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी २०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये ७५ कोटी आणि सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.
राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे.
स्मशानभूमींच्या सुशोभिकरणासाठी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १.४० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.
किटकनाशके आणि फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात येईल. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ३५ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.
असंसर्गजन्य रोग कक्षासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता सदर उपक्रमासाठी १२ कोटी इतकी तरतूद केली आहे.
शिव योग केंद्रांसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महसूली खर्चाकरिता ५ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.
महानगरपालिकेकडून काल शनिवारी शिक्षण विभागाचा ३,३४७.१३ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. मागील वर्षी ३,३७०.२४ कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज जाहीर करण्यात आला होता.
यावर्षी खगोलशास्त्रीय प्रयोगशाळासाठी 60 लाखांची तरतूद तर ऑलिम्पियाड परीक्षांसाठी 38 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी शिक्षण विभागाच्या अर्थ संकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
व्हर्च्युल क्लासरूमसाठी 3.20 कोटी, ई वाचनालयासाठी 10 लाख तर डिजिटल क्लासरूमसाठी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका शाळांतील प्रशिक्षणे आणि उपक्रमांना ही महत्त्व देण्यात आले असून रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी एकूण 28 लाखांची तरतूद करण्यात आली आहे
2022 ते 2025 कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद
याशिवाय पालिका शाळांमध्ये असणाऱ्या संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी एकूण 10.32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर, अधिक क्षमतेने, वेगाने वापरण्यास मिळणार आहे
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना व उपक्रम 2023- 24 मध्ये ही सुरू राहणार असून यामध्ये गणवेश पुरवठा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना, उपस्थिती भत्ता योजना, शालांत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य, शालेय आरोग्य कार्यक्रम, अत्याधुनिक बैठक व्यवस्था अशा उपक्रमांचा समावेश आहे
आर्थिक वर्ष 2023 – 24 मध्ये पालिका शिक्षण विभागाकडून अनेक नवीन प्रकल्प आणि योजना ही हाती घेण्यात आल्या आहेत
नवीन आर्थिक वर्षातील नवीन प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण असणार आहे. यासाठी 28 . 45 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. निवडक शाळांतील मुलांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्याबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती ही विभागाकडून करण्यात येणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार असून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पालिका शाळांतील सुरक्षा वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.