पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आम्ही पक्षाकडे तिकीटाची मागणीही केली होती. पण तिकीट देण्यात आले नाही. का दिले नाही माहीत नाही? अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त करताना मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यात पाणीही आले होते. शैलेश टिळक नाराज असल्याने कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर शैलेश टिळक यासंबंधी बोलताना म्हणाले की, पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु वेगळा निर्णय घेतला गेला. पक्षाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, पक्षाने घेतलेला निर्णय मान्य आहे परंतु मुक्ता टिळक यांच्या कामावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनात खंत आहे. कोणतीही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एखाद्याच्या घरातील व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नैसर्गिकपणे उमेदवारी दिली जाते. मीही उमेदवारीची मागणी केली होती, असे शैलेश टिळक म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल चर्चा झाली. उमेदवारी देण्याबाबत अजून काही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले होते. दिल्लीतून निर्णय होईल असे त्यांनी सांगितले होते. आज उद्या निर्णय होईल असेही ते म्हणाले होते. तसेच ताई गेल्यानंतर घरी यायचे राहिले होते. त्यामुळेही फडणवीस काल घरी आले होते. काल त्यांनी कोणतेही संकेत दिले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही पक्षासोबतच राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत.
आता हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.