अदानी कंपनीसाठी खुशखबर! जागतिक रेटिंग एजन्सीने सांगितले…

मुंबई: जगातील प्रसिद्ध रेटिंग एजन्सी फिचने शुक्रवारी अदानी समुहाबाबत एक खुशखबर दिली आहे. फिचच्या म्हणण्यानूसार हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समुहाच्या रेटिंगवर कोणताही तात्काळ परिणाम होणार नसल्याचे फिचचे म्हणणे आहे.

फीचने असेही नमुद केले की, अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवालाचा अदानी समूहाच्या क्रेडिट प्रोफाइलवर कोणताही परिणाम झाला नाही. अदानी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाने आपला एफपीओ मागे घेतला होता. त्यानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवाल निराधार असल्याचे अदानी समुहाने म्हटले होते आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचीही पुष्टी केली होती.

दुसरीकडे, मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसनेही शुक्रवारी सांगितले की ते अदानी समूहाच्या आर्थिक अस्थिरतेवर लक्ष ठेवून आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीबाबत ते म्हणाले, अलीकडच्या घडामोडींचा समूहावर नकारात्मक परिणाम होत आहे आणि त्यामुळे येत्या एक-दोन वर्षांत समूहाच्या कर्ज उभारणीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनादरम्यान आंदोलन

वर्धा : वर्धात आजपासून सुरू झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला विदर्भवाद्यांनी गालबोट लावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना गोंधळ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सर्वांचे म्हणणे ऐकणारे आहे. तुमचेही म्हणने ऐकू, असे आश्वासन देत भाषण सुरू केले. तेव्हा पुन्हा काही विदर्भवादी उभे राहिले. त्यांनी “शेतकऱ्यांवर बोला, वेगळ्या विदर्भावर बोला’, असे आवाहन केले. तसेच ‘वेगळा विदर्भ द्या’ अशी मागणी करत पत्रके व्यासपीठाच्या दिशेने फेकली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाहेर नेले. त्यानंतर आणखी काही जणांनी घोषणाबाजी केली. तर संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे उदघाटन कार्यक्रमात भाषण सुरू करताच काही महिलांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. या सर्वांना पोलिसांनी बाहेर काढले.

साहित्य संमेलन आणि वाद याचे नाते तसे जुनेच आहे. वर्धा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीवरूनही वादाचे सूर उमटले होते. मात्र, थेट संमेलनाच्या उदघाटनावेळी अचानक हा प्रकार घडल्याचे समोर आले. यामुळे संमेलनस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, प्रसिद्धी हिंदी कवी डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास उपस्थित होते.

या संमेलनाचा समारोप रविवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, दत्ताजी मेघे, संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहणार आहेत.

पीएसोबत गेलेले आमदार राजन साळवी पडले तोंडघशी

मुंबई: ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांचा पीए सुभाष मालप यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरु झाली आहे. या चौकशीला पीए मालप यांच्यासोबत गेलेल्या आमदार राजन साळवी यांच्यावर मात्र, तोंडघशी पडण्याची वेळ आली.

राजन साळवी यांच्या पीएला रायगड लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचाची नोटीस आली होती. २ फेब्रुवारीला होणाऱ्या चौकशीसाठी ते गैरहजर राहिल होते. आज त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता हजेरी लावली. त्यावेळी राजन साळवीही त्यांच्यासोबत उपस्थित होते. पण फक्त पीए सुभाष मालप यांनाच आत चौकशीसाठी बोलवण्यात आले.

राजन साळवी हे त्यांच्या मालमत्ता वाढीसंदर्भातील प्रकरणावरुन सध्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. याआधीही राजन साळवींनी दोन वेळा लाचलूचपत विभागाच्या कार्यालयात मालमत्ते संदर्भात चौकशीसाठी हजेरी लावली होती.

यापूर्वी कोकणातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानंतर आता साळवी यांना नोटीस बजावण्यात आली असून, तेही आता चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.

अमरावती : मतमोजणी संपली तरीही तिढा कायम!

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाआघाडीचे धीरज लिंगडे यांना ४६,३४४ व भाजपचे रणजीत पाटील यांना ४२,९६२ मते मिळाली आहेत. मात्र विजयासाठी आवश्यक ४७,१०१ मतांचा कोटा एकही उमेदवार पूर्ण करू शकलेला नाही. यामुळे मतमोजणी संपली असली तरीही येथे विजयी घोषित करावे की नाही याबाबत तिढा कायम आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत २१ उमेदवार बाद झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक ४७१०१ मतांचा कोटा एकही उमेदवार पूर्ण करू शकले नाहीत.

या दोन्ही उमेदवारापैकी सर्वाधिक मते असणाऱ्या धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्याची औपचारिकता बाकी आहे. या दोन्ही उमेदवारांची नावे व मते निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी भारत निवडणूक आयोगाकडे कळविली आहेत. आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर धीरज लिंगडे हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे.

अंतिम दोन उमेदवार असल्याने यापैकी सर्वाधिक मते धीरज लिंगाडे यांना ४६३४४ तर भाजपचे रणजीत पाटील यांना ४२९६२ मते मिळाली आहेत.

जगात मोदीच नंबर १! ऋषी सुनक, बायडन यांनाही टाकले मागे

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगात नंबर १ ठरले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही मोदींनी मागे टाकले आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत २२ देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. ताज्या सर्वेक्षणात, पंतप्रधान मोदींना प्रौढ लोकांमध्ये ७८ टक्के मान्यता मिळाली आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर यांना पंतप्रधान मोदींनंतर दुसरे स्थान मिळाले आहे. ६८ टक्के प्रौढांनी त्यांना त्यांची पहिली पसंती सांगितली. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याला ६२ टक्के मान्यता रेटिंग मिळाली आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की सप्टेंबर २०२१ नंतर पीएम मोदींची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.

यूएस-आधारित जागतिक सर्वेक्षण कंपनी मॉर्निंग कन्सल्टनुसार, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ५८ टक्के रेटिंगसह या यादीत चौथ्या आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा ५० टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत. अशाप्रकारे सुपरपॉवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे टॉप १० नेत्यांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. ट्रम्प यांच्या कठीण आव्हानादरम्यान, बायडन यांना केवळ ४० टक्के मान्यता रेटिंग मिळाली आहे. लोकप्रिय नेत्यांच्या यादीत बायडन सातव्या क्रमांकावर आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

वर्धा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले असून आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या साहित्यनगरीमध्ये वर्धा शहरात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली आहे. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात आयोजित केलेल्या या साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने झाली. मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच गुरुदेव सेवा मंडळानी हरिपाठ आणि लेझीमचे पथक सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

ज्येष्ठ विचारवंत-लेखक न्या. नरेंद्र चपळगावकर यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्याचबरोबर या साहित्य संमेलनासाठी वर्ध्यात येणाऱ्या साहित्य संमेलनासाठी उद्घाटन आणि समारोपाला येणाऱ्या पाहुण्यांचे प्रत्यक्ष सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत केले जाणार आहे.

काँग्रेस आमदार अस्लम शेख ईडीच्या जाळ्यात अडकणार?

मुंबई : कथित मढ स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवल्याने माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अस्लम शेख यांनी मढ मार्वेत एक हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. यात अस्लम शेख यांनी स्टुडिओच्या बांधकामास मदत केल्याचाही सोमय्यांचा आरोप आहे.

याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांनी मढ, एरंगल आणि भाटी गावातल्या ४९ स्टुडिओंसंदर्भात चौकशी समिती स्थापन केली होती. याच चौकशी समितीचा अहवाल आता ईडीने मागवला आहे. मनी लाँड्रींग आणि फेमा कायद्यानुसार, हा अहवाल तपासणार असल्याचे ईडीने म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी केले आहेत गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर तब्बल ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. महाविकास आघाडीचे हे लुटारु सरकार होते. गेल्या दोन वर्षात माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी, मढ या भागात तब्बल २८ फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम केले आहे. यातील ५ स्टुडिओ हे सीआरझेड झोनमध्ये आहेत. मंत्रालयाने फक्त फिल्म सेट लावण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने तिथे १० लाख स्केअर फूटची जागा मोकळी करून २८ स्टुडिओ बांधण्यात आले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

अदानींच्या शेअर्सची घसरण सुरूच; आत्तापर्यंत ११८ बिलियन डॉलर्सचे नुकसान!

अमेरिकन शेअर बाजारातूनही अदानींना दाखवला बाहेरचा रस्ता

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अदानी उद्योग समूहाचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास अजूनही थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाही. अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालामुळे संसदेपासून शेअर बाजारापर्यंत सगळीकडे हल्लकल्लोळ माजला आहे. तर अमेरिकेच्या डाउ जोंस स्टॉक एक्सचेंजने अदानी एंटरप्रायझेसला सस्टेनबिलिटी इंडेक्समधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

संसदीय अधिवेशनात विरोधकांनी अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या मुद्यावरून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० पर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांनी अदानींच्या कथित घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वातील समितीमार्फत करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सकाळी तब्बल ३५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. यामुळे एका शेअरची किंमत एक हजार रुपयांजवळ पोहोचली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानींचा एक शेअर जवळपास ३५०० रुपयांवर होता. मागील ९ दिवसांत कंपनीचे शेअर्स ७० टक्क्यांनी घसरले आहेत.

तिकडे, बांगलादेश सरकारने सुद्धा अदानी समूहासोबतच्या ऊर्जा क्षेत्रातील सौद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. बांगलादेश सरकारच्या मते, अदानींची वीज अत्यंत महागडी आहे. त्यांनी ती स्वस्त केली पाहिजे. काँग्रेसनेही या प्रकरणी ६ फेब्रुवारी देशव्यापी निदर्शनांचा इशारा दिला आहे.

एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर!

नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा घेण्याची मागणी

पुणे : एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. नवीन वर्णनात्मक अभ्यास २०२३ पासूनच लागू करावा या मागणीसाठी पुण्यात पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर परिक्षा घेण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील अलका चौकात त्यासाठी विद्यार्थी एकत्र आले आहेत.

तीन दिवसांपुर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रमानुसार २०२५ पर्यंत परिक्षा नकोत यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर सरकारकडून २०२३ ऐवजी २०२५ पासून नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा घेण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाची याच्या नेमकी उलटी मागणी आहे.

नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा २०२५ पासून नव्हे तर २०२३ पासूनच घेण्यात याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे. निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला आहे सरकारला नाही, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत.

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीचा तिढा कायम!

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अद्यापही मतमोजणी सुरु आहे. मागील २६ तासांपासून मतमोजणी सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ३६६ मतांनी महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर असल्याचे समजते. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. पाटील यांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य करीत फेर मतमोजणी सुरु केली होती.

दरम्यान, निवडणुकीसाठी एकूण ४९.६७ टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीत कोटा पूर्ण न झाल्‍यास निकालाला आणखी विलंब होण्‍याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.