अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अद्यापही मतमोजणी सुरु आहे. मागील २६ तासांपासून मतमोजणी सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ३६६ मतांनी महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर असल्याचे समजते. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. पाटील यांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य करीत फेर मतमोजणी सुरु केली होती.
दरम्यान, निवडणुकीसाठी एकूण ४९.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोटा पूर्ण न झाल्यास निकालाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.