नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा घेण्याची मागणी
पुणे : एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. नवीन वर्णनात्मक अभ्यास २०२३ पासूनच लागू करावा या मागणीसाठी पुण्यात पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर परिक्षा घेण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील अलका चौकात त्यासाठी विद्यार्थी एकत्र आले आहेत.
तीन दिवसांपुर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रमानुसार २०२५ पर्यंत परिक्षा नकोत यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर सरकारकडून २०२३ ऐवजी २०२५ पासून नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा घेण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाची याच्या नेमकी उलटी मागणी आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा २०२५ पासून नव्हे तर २०२३ पासूनच घेण्यात याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे. निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला आहे सरकारला नाही, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत.