Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीवानखेडे प्रकरणाच्या चौकशीला मुख्यमंत्र्यांकडून वाटाण्याच्या अक्षता?

वानखेडे प्रकरणाच्या चौकशीला मुख्यमंत्र्यांकडून वाटाण्याच्या अक्षता?

मुंबई(विशेष प्रतिनिधी) : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे समजते. या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. त्यातून काय निष्पन्न होते ते पाहून एसआयटी नेमण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे स्वतः नवाब मलिक यांनीच प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. दरम्यान, प्रभाकर साईल यांच्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी एनसीबीच्या दक्षता विभागाने तीन जणांच्या एका पथकामार्फत चौकशी चालू केली आहे.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या माध्यमातून राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातल्या वादावर ठिणगी पडली. या प्रकरणातले पंच किरण गोसावी खंडणीखोर असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. गोसावी सध्या फरार आहेत. त्यापाठोपाठ याच प्रकरणातील एक पंच व गोसावींचे बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे विविध स्वरूपाचे गंभीर आरोप एनसीबीच्या कारवाईवर केले. या प्रकरणात शाहरुख खान यांच्याकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली. सारा मामला १८ कोटींवर निश्चित झाला. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना दिले जाणार होते. कोऱ्या कागदांवर आपल्या सह्या घेतल्या गेल्या, असे अनेक गंभीर आरोप साईल यांनी केले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी साईल यांना पोलीस संरक्षणही पुरवले आहे. साईलकडून हे आरोप होत असतानाच नवाब मलिक यांनी त्यांचे जावई जामिनावर सुटल्याच्या निमित्ताने एनसीबीवर जोरदार टीका केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -