Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरबांबूपासून बनवलेल्या आकाशकंदिलांना मोठी मागणी

बांबूपासून बनवलेल्या आकाशकंदिलांना मोठी मागणी

संजय नेवे

विक्रमगड : दिवाळी म्हणजे दीपोत्सव. दिव्यांना या सणात विशेष महत्त्व असते. दीप, दिवे, पणत्या आणि आकाशकंदील यांना या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी जवळ आल्याने सर्वांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. अशातच विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावात टेटवाली बांबू हस्तकला स्वयंम सहाय्यता महिला समूह सध्या बांबूकलेत रमला आहे. दिवस-रात्र काम करून अतिशय सुबक व बारीक काम, उत्तम पद्धतीचे बांबू, रंगसंगती व नक्षीकाम असलेले आकाशकंदील बनवण्यात व्यस्त आहेत.

विविध प्रकारचे हाताने नक्षी काम केलेले १० प्रकारचे आकाशकंदील बनवले जात आहेत. मुंबई तसेच इतर भागांत विविध प्रकारचे हस्त नक्षीकाम केलला एक आकाशकंदील ३०० ते ८०० रुपयांना विकला जात आहे. एक आकाशकंदील बनवण्यासाठी एका महिलेला एक दिवस लागतो. आतापर्यंत या गटाने ७०० ते ८०० आकाशकंदील विकले असून दोन हजार कंदिलांची मागणी असल्याचे येथील महिलांनी सांगितले. तसेच, बांबूपासून बनवलेले व सुबक हस्तकलेने नक्षीकाम केलेले २०० आकाशकंदील अमेरिका येथे पाठवण्यात आल्याची माहिती टेटवाली ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडुरंग भुरकूड यांनी दिली. सध्या शेतीची कामे सर्वत्र सुरू असूनही येथील महिला रात्री व आराम करण्याच्या वेळेत एकत्र येऊन सुबक आकाशकंदील तयार करत आहेत.

पूर्ण ताकतीने हा व्यवसाय घर व शेती सांभाळून करत आहोत. आम्हाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यात या कलेने सहकार्य केले असून पुढील काळात वेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवण्याचा मानस आहे. – नमिता नामदेव भुरकूड, अध्यक्षा, टेटवाली बांबू हस्तकला स्वयंम सहाय्य्यता महिला समूह

बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनवल्या जात आहे. दिवाळी आल्याने आकाशकंदिलांना खूप मागणी आहे. हे कंदील अमेरिकेत पाठवण्यात आले असून विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू इंग्लड, आस्ट्रेलिया व इतर देशांत निर्यात केल्या जातात. -पांडुरंग काशिनाथ भुरकूड, उपसरपंच, टेटवाली ग्रामपंचायत

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -