Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखउच्चशिक्षण प्रादेशिक भाषेतून दिले जावे...

उच्चशिक्षण प्रादेशिक भाषेतून दिले जावे…

देशाच्या कानाकोपऱ्यांत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे, यासाठी देशाच्या स्वातंत्र्यापासून राजकीय व प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणामध्ये प्रगती करणारी मुले-मुली मात्र उच्च शिक्षणाच्या चौकटीवर आल्यावर अडखळतात, त्यांची शैक्षणिक गती मंदावते, अनेकांना शिक्षणाला रामराम ठोकावा लागतो. मात्र बालवयात शैक्षणिक प्रगती करणारे, गरुडभरारी मारणारे विद्यार्थी विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, वाणिज्य, विज्ञान आदी शिक्षणामध्ये मागे का पडतात? याबाबत कोणालाही आत्मपरीक्षण करण्यास वेळ नाही. स्वातंत्र्यकाळापासून आपल्या बालमनावर नेहमीच बिंबविले जात असते की, इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे, ते आपण आत्मसात केलेच पाहिजे; परंतु तेच वाघिणीचे दूध पचविण्यास अनेकांना अपयश येते आणि मुलांच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळतो. त्यातूनच ‘शिक्षणाच्या आयचा घो’ तसेच ‘तारे जमींपर’ आदी चित्रपट निघतात आणि यशस्वीही होतात. प्रचलित शिक्षणव्यवस्थेवर मार्मिक भाष्य चित्रपटांतून करण्यात येत असले तरी भारतीय त्यातून बोध घेण्यास तयार नाहीत. त्यांना समजते, पण उमजून घेण्यास त्यांना वेळ नाही आणि स्वारस्यही नाही. इंग्रजी भाषा आली नाही म्हणून देशात उपासमारीची लाट आली अथवा इंग्रजी न येणारे भूकबळीने मेले, असे स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यांत घडले नाही आणि यापुढेही घडणार नाही.

इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीच्या अट्टहासामुळे आपण विद्यार्थ्यांचे पर्यायाने देशाचे नुकसानच करत आहोत, हे कोणीही समजून घेण्यास तयार नाही. इंग्रजीच्या प्रेमापायीच प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर, सीनिअर केजीपासूनच आपण विद्यार्थ्यांना इंग्रजीचे बाळकडू पाजण्यास सुरुवात करत असतो. यातून इंग्रजी माध्यम, सीबीएसई बोर्ड, आससीएसई बोर्ड आदी विविध शैक्षणिक संस्थांचे उखळ वर्षानुवर्षे पांढरे करत असतो. इंग्रजीच्या अतिप्रेमामुळेच आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत; परंतु महाराष्ट्रात जे चित्र दिसत आहे, ते देशाच्या अन्य राज्यांत मात्र पाहावयास मिळत नाही. त्या त्या राज्यात प्रादेशिक भाषेच्या शाळांना सुगीचेच दिवस आहेत, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आपण इंग्रजी भाषेच्या आहारी जाताना घरच्या मराठी भाषारूपी मायमाऊलीला डावलले. इतकी डावलले की, शिक्षण प्रवाहामध्ये मराठी भाषेला अखेरची घरघर लागली आहे, महाराष्ट्राच्या भूमीवर सरस्वतीच्या भक्तांनी दाखविलेल्या उदासीनतेमुळे मायमराठीला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. ‘माय मरो आणि मावशी जगो’ ही उक्ती किमान शिक्षणाच्या बाबतीत आपण महाराष्ट्रीय लोकांनी खरी करून दाखविली आहे; परंतु मराठी शाळांतून शिक्षण घेणारी व इंग्रजी माध्यमांच्या तसेच कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले महाविद्यालयीन शिक्षणासाठी एकत्र येतात, एकाच बाकावर बसून अभ्यास करतात. मग अशा वेळी आपण इंग्रजीच्या आहारी जाताना केलेल्या शैक्षणिक उधळपट्टीबाबत आपल्या डोळ्यांमध्ये शैक्षणिक अंजन पडण्यास सुरुवात होते.

मध्य प्रदेशात राबविण्यात येत असलेला उपक्रम प्रादेशिक भाषांना आशेचा किरण दाखविणारा ठरला आहे. देशामध्ये प्रथमच वैद्यकीय शिक्षणाचा एक भाग असणारा एमबीबीएस अभ्यासक्रमाचा विषय हिंदी भाषेतून शिकविला जाणार आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी भाषेतील शिक्षणही हिंदी भाषेतूनच शिकविले जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पुढाकाराने सर्वप्रथम देशामध्ये हिंदी भाषेतून एमबीबीएस अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमामधील हिंदी भाषेतील तीन पुस्तकांचे प्रकाशन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकतेच झाले. देशाच्या अन्य दहा राज्यांमध्येही अभियांत्रिकी शिक्षण त्या त्या राज्यांमधील प्रादेशिक भाषेमधून दिले जात आहे. या घटनेचा शुभारंभ महाराष्ट्रामध्येही लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. प्रादेशिक भाषेतून महाराष्ट्रामध्ये शिक्षण उपलब्ध झाल्यास खेडोपाड्यांत, वाड्यावस्त्यांवर शिक्षणाची गंगा घराघरात जाईल व कोणाच्या शिक्षणावर पूर्णविराम लागण्याची वेळ येणार नाही. प्रादेशिक भाषांतून शिक्षण उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांच्या घरामध्ये पदवीधर, डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक, शिक्षक, वैज्ञानिक निर्माण होतील. केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणाच्याही शिक्षणापुढे अडथळे निर्माण होणार नाहीत. राज्यकर्त्यांनी एकदा निर्णय घेतला आणि प्रशासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मनापासून सहकार्य केले की, त्या निर्णयाचे पडसादही लवकरात लवकर सकारात्मकच उमटतात. प्रादेशिक भाषांतून उच्चशिक्षण व अन्य तत्सम शिक्षण उपलब्ध व्हावे, ही अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी केली जात आहे. किमान मध्य प्रदेश सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी हिंदी भाषेचा वापर सुरू केल्याने आता टप्प्याटप्प्याने याचे अनुकरण देशाच्या अन्य राज्यांमध्ये लवकरच होण्याची शक्यता आहे. एकदा उच्चशिक्षण प्रादेशिक भाषेतून देण्यास सुरुवात झाल्यावर त्या अभ्यासक्रमाची पुस्तकेही लवकरच त्या त्या प्रादेशिक भाषांमध्ये मुबलक प्रमाणावर बाजारामध्ये उपलब्ध होतील. शिक्षणाची गंगा देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवायची असेल, तर ते शिक्षण प्रादेशिक भाषेतूनच दिले पाहिजे.

केवळ इंग्रजी भाषा येत नसल्याने शिक्षण प्रवाहाला अडथळे निर्माण झाले आहेत. अनेकांचे भवितव्य इंग्रजी भाषा येत नसल्याने अंधकारमय झालेले आहे; परंतु आता हे चित्र बदलण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या भाषेतून उच्चशिक्षण उपलब्ध झाल्यावर विद्यार्थ्यांनाही साहजिकच शिक्षणाबाबत गोडी निर्माण होईल. रस्त्यावर मेंढरे सांभाळणारी धनगराची मुलेही आता डॉक्टर झालेली पाहावयास मिळतील. गाढवे सांभाळणारी वडाऱ्याची मुलेही आता कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून मिरवताना दिसतील. शिक्षण हे जगाच्या वहिवाटीवरील नेत्र आहेत. नेत्र सदृढ असतील, तर वाटचाल करण्यास अडथळे निर्माण होणार नाहीत. केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातही प्रादेशिक भाषेतील शिक्षणामुळे आता गुणवत्तेला झळाळी प्राप्त होईल. नक्कीच हे चित्र लवकरच निर्माण होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -