Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘या’ मानसिकतेचे करायचे काय?

‘या’ मानसिकतेचे करायचे काय?

प्रासंगिक:अरविंद श्रीधर जोशी

अगदी परवाचीच गोष्ट, एका बैठकीसाठी भाईंदरला गेलो होतो. ठाण्याला परत यायला निघालो. स्टेशनवरच्या बस स्टॉपवर आलो, तर ठाण्याच्या दोन बस नुकत्याच गेल्यात असे कळले. आता अर्धा-पाऊण तास दुसरी बस यायला आहे, असे चौकशी केल्यावर समजले. काय करावं, हा प्रश्न पडला होता. थोडा वेळ थांबून ‘उबर’चा सहारा घ्यायचे ठरवले. लगेच बुक झाली. कुणी रमेश नावाचा चालक आहे, असे उबरने दाखवले. मनात म्हटले व्वा… छानच! अन्यथा हल्ली ओला-उबरवरती शांतिदूतांचा भरणा जास्त असतो! असो. ७ ते ८ मिनिटांत चालकाने गाडी आणली. गाडीत बसलो आणि समोरून ठाण्याला जाणारी एसी बस हजर! आपले नशीब दुसरे काय?

गाडी सुरू झाली आणि काही फोन आले. त्यावरून त्या रमेश नामक चालकाला समजले की, अस्मादिक मराठी आहेत. मग काय? त्याने गप्पा मारायला सुरुवात केली… साहेब तुमचे गाव कोणते? हरिहरेश्वर… म्हणजे श्रीवर्धन जवळचे का? हो… अरे, मी नुकताच तिथे जाऊन आलो… बरे… मी पण त्याचे गाव विचारले, तर तो लातूरकडचा. मग मला थोडीफार जी माहिती आहे, त्या आधारे काही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पाण्याचे कसे दुर्भिक्ष्य, कसा त्रास होतो आणि मग एकदम घसरला की उबाठा सेनेवर! देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार सुरू केलेलं, यांनी थांबवले. आता ते सरकारमधून गेल्यावर पुन्हा त्याला चालना मिळाली आहे, कशा चांगल्या योजना बनत आहेत… हे आणि अशा अनेक गोष्टी… त्याचे मन मोकळे करत होता जणू! मीसुद्धा मग १०० % मतदान का आवश्यक हे समजावले! आपला विषय मांडायला मिळाला की सोडायचे नाही… बरोबर ना?

राजकारणावरील चर्चा दुसऱ्या विषयावर वळवायला हवी, असे वाटले म्हणून विचारले… किती वर्षं हा व्यवसाय करतोयस? त्याचे वय साधारणतः पंचवीस, तिशीच्या आसपास असावे. दोन वर्षं झाली, त्याने उत्तर दिले, त्याआधी दोन वर्षं गाडीवर ड्रायव्हर होतो. मग स्वतःची गाडी घेतली. आता आणखीन एक इनोव्हा बुक केली आहे. त्यासाठी अण्णासाहेब पाटील वाहन कर्ज योजनेत अर्ज केला. बऱ्याच कमी दरात सरकारने कर्ज उपलब्ध करून दिलाय, असे म्हणाला. मग त्याने त्याच्या मनातील बोचरी सल मांडायला सुरुवात केली…आणि ते ऐकून मलाही अंतर्मुख व्हायला झाले… कारण ते सध्याच्या तरुण पिढीचे विदारक वास्तव आहे…!

साहेब, हल्ली मुलांना स्वतःचा रोजगार करायला नको. सरकारच्या बऱ्याच योजना आहेत. एखादा छोटा उद्योग सुरू केला, तर त्याला सरकार अर्थसहाय्य करते… पण आजच्या तरुण मंडळींना ते करायला नको! एक तर सरकारी नोकरी हवी किंवा मग कुणातरी राजकारण्याच्या नादी लागून त्याच्या मागे फरपटत जायचे! साहेब, आमच्याच क्षेत्रात बघा ना… इदच्या दिवशी बऱ्याच गाड्या रस्त्यावर आल्याच नाहीत… कारण ड्रायव्हर मुख्यतः शांतिदूत! आपले ड्रायव्हर हल्ली मिळतच नाहीत इथे! अहो साहेब… आपले पारंपरिक व्यवसाय बंद पडत चाललेत!

खाटीक, फळवाले, दूधवाले, सलून आता तर आंबेवाले, कापड दुकान, पंक्चर वाले, शोरमावाले, ढाबा आणि हॉटेल वाले, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, एसी रिपेअर… कुणी बळकावले हे उद्योग! आणि आपली तरुण मुलं काय करतात? त्यांना हे उद्योग करायला नको! लाज वाटते! म्हणतात कोण करणार असले उद्योग! आतापर्यंत आम्ही भैय्या मंडळींना खूप बोललो… आता तर तेसुद्धा या उद्योगातून बाहेर पडलेत! साहेब, असच चाललं तर सरकारी मदत उचलून हीच मंडळी आपल्या डोक्यावर बसतील… नव्हे बसलीच आहेत… आणि आपली मूल नाक्यावर गप्पा ठोकत बसणार!

साहेब, आणखीन एक व्यथा आहे. आमच्या सारख्यांची… अहो माझ्यासारख्या स्वतःचा व्यवसाय करणाऱ्याला लग्नाला मुलगी मिळत नाही! का तर सरकारी किंवा फिक्स इन्कमवाली नोकरी नाही… काय खात्री उत्पन्नाची! साहेब, मला सांगा मागच्या चार वर्षांच्या या व्यवसायात स्वतःची एक गाडी घेतली, आताच ईनोव्हा बुक केलीय आणि एक कोटी रुपये किमतीचे घरही बुक केले आहे… आणखीन काय पाहिजे? साहेब, व्यवसाय करणाऱ्याबद्दल आपल्या समाजाची मानसिकता बदलायला हवी!

त्याच्याशी संवाद साधताना, मनात विचारचक्र सुरू झाले. भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतोय, सर्व बाबतीत प्रगतिपथावर जात आहे, अमृत काल सुरू आहे, सरकार निरनिराळ्या योजना आखत आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावेल, अधिकाधिक व्यवसाय करणारी संख्या वाढावी. २०४७ पर्यंत भारत विकसित देश म्हणून वाटचाल करेल… आणि या अशा महत्त्वाकांक्षी वाटचालीत आमच्या समाजाची मानसिकता काय आहे? खरंच अशी मानसिकता देशाला पुढे नेईल? यासाठी मला, तुम्हाला आणि सर्वांनाच काय करायला हवे? तेवढ्यात रमेश म्हणाला की, “साहेब आले तुमचे ठिकाण. असेच भेटू पुन्हा कधी तरी!” रमेशचे आभार मानले आणि त्याला त्याच्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या! माझे धन्यवाद मानून तो निघून गेला!… काही वेळ मी त्या जात असलेल्या गाडीकडे पाहत होतो…!

माझा हा उबर प्रवास या विचारांचा भुंगा मात्र मागे लावून गेला. मग विचार केला की, हा भुंगा एकटा मीच का मागे लावून घेऊ? तुमच्यासारखे सुहृदय नागरिक आहेत की, जे देशाचा आणि समाजाचा विचार करतात…! बघा या भुंग्याचे काही करता येते का ते!…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -