Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीभाजपची लोकसभा फेज २ रणनीती

भाजपची लोकसभा फेज २ रणनीती

डॉ. सुकृत खांडेकर

भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली असून २०१९ मध्ये ज्या १४४ लोकसभा मतदारसंघांत पराभव झाला, त्या जागांवर लक्ष्य केंद्रित करून त्या यावेळी जास्तीत जिंकायच्या अशी रणनीती भाजपने आखली आहे. सन २०१९ मध्ये ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला, त्या १४४ मतदारसंघांत पक्षाचे मोठे मेळावे घेऊन जनसंपर्क वाढविण्याविषयी आराखडा तयार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा चाळीस मतदारसंघांत स्वत: मेळाव्याला हजर राहणार आहेत. अन्य मतदारसंघांत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठे नेते जाणार असून मतदारसंघ बांधणीत लक्ष घालणार आहेत. या सर्व रणनीतीला लोकसभा प्रवास फेज २ असे नाव देण्यात आले आहे. केंद्रातील बहुतेक मंत्री या मोहिमेत सहभागी झाले असून जिथे अन्य पक्षांचे खासदार गेल्या वेळी निवडून आले आहेत, तेथे संघटना बांधणी आणि निवडणुकीची तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत.

गेल्या वेळी जिंकलेल्या जागा यावेळी कायम राखायच्या आहेतच. पण गेल्या वेळी जिथे भाजपचा पराभव झाला, त्या जागाही आपल्याकडे कशा खेचून आणता येतील, याची रणनीती भाजपने राबवायला सुरुवात केली आहे. विशेषत: ज्या मतदारसंघात भाजप नंबर २ किंवा ३ वर आहे, त्या मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पश्चिम बंगाल, तेलंगणा, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू या राज्यांत अनेक मतदारसंघात भाजपला गेल्या निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. भाजप दोन क्रमांकावर असलेल्या अनेक जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत. पश्चिम बंगालनंतर दक्षिण भारतात अनेक जागांवर भाजपला मतदान चांगले झाले पण पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी आणि महाराष्ट्रात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघावर भाजप यावेळी बरीच मेहनत घेणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये रायबरेली (सोनिया गांधी, काँग्रेस) आणि मैनपुरी (मुलायमसिंह यादव, सपा), महाराष्ट्रात सुप्रिया सुळे (बारामती, राष्ट्रवादी काँग्रेस), तेलंगणात मेहबूब नगर (श्रीनिवास रेड्डी, टीआरएस), मध्य प्रदेशात छिंदवाडा नकुल नाथ, काँग्रेस) हे प्रमुख लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हिट लिस्टवर अग्रभागी आहेत. सन २०१९ मध्ये देशभर मोदी लाट असूनही या मतदारसंघात भाजपला यश मिळाले नव्हते. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले होते. काँग्रेसचे ५२, द्रमुकचे २३, तृणमूल काँग्रेसचे २२, वायएसआर काँग्रेसचे २२, अपक्ष ६ आणि अन्य लहान पक्षांचे ११६ खासदार निवडून आले होते. नड्डा, शहा यांच्यात गेल्या वेळी देशात ज्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला, त्या १४४ मतदारसंघांतील निकालाची म्हणजेच भाजपला मिळालेल्या मतांची चर्चा झाली. पंचवीस केंद्रीय मंत्र्यांवर प्रत्येकी तीन ते चार मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे मंत्री त्या त्या मतदारसंघांना प्रत्यक्ष भेट देऊन आपला अहवाल सादर करतील, त्यानंतर लोकसभा प्रवास योजना फेज २ आराखडा तयार केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी चाळीस ठिकाणी सभांमध्ये भाषणे करतील. त्या भागासाठी केंद्रीय मंत्र्यांवर प्रभारी म्हणून जबाबदारी दिली जाईल. अन्य १०४ लोकसभा मतदारसंघांत अन्य केंद्रीयमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होतील. प्रचार मोहीम राबविणे, लोकसंपर्क वाढविणे, राजकीय व्यवस्थापन, पक्षाची विधायक प्रतिमा निर्माण करणे, लोकसभा मतदारसंघात मुक्काम करून स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणे हे काम सर्व प्रभारी केंद्रीय मंत्र्यांना करावे लागणार आहे. मतदार संघातील जे नाराज नेते व कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे समाधान करण्याचे काम या प्रभारी मंत्र्यांवर सोपविण्यात आले आहे. स्थानिक नेत्यांबरोबर नियमित बैठका, स्थानिक धार्मिक नेते, साधू-संत, वेगवेगळ्या समाजाचे नेते यांच्याबरोबर संवाद साधण्याची जबाबदारीही या प्रभारी मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. मतदारसंघात होणाऱ्या विविध कार्यक्रमात व सभा-संमेलनातही सामील होऊन जनसंवाद साधण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वकील, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्याबरोबरही बैठका करून त्यांच्याशी संवाद साधावा अशा सूचना या मोहिमेत सहभागी झालेल्या केंद्रातील मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील दहा राज्यांमध्ये भाजपने तेथील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. गुजरात २६, राजस्थान २५, हरियाणा १०, दिल्ली ७, उत्तराखंड ५, हिमाचल प्रदेश ४, त्रिपुरा २, अरुणाचल प्रदेश २, दमण-दिव १, चंदिगड १. याच निवडणुकीत देशातील अकरा राज्यांत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. भाजपला आपले खाते उघडता आले नाही,

त्यात तामिळनाडूमध्ये ३९ जागा आहेत, आंध्र प्रदेश २५, केरळ २०, मेघालय २, सिक्कीम १, पुडुचेरी १, नागालँड १, मिजोराम १, लक्षद्वीप १, दादरा नगर हवेली १, अंदमान- निकोबार १ अशा जागा आहेत. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी, काँग्रेस (अमेठी-उत्तर प्रदेश), संबित पात्रा, भाजप (पुरी, ओरिसा), ज्योतिरादित्य शिंदे, काँग्रेस (गुना, मध्य प्रदेश), अतिशी आप (दिल्ली, पूर्व), दीपेंद्र हुड्डा काँग्रेस (रोहतक, हरयाणा), भक्त दास, काँग्रेस (कालाहंडी, ओरिसा), राघव चड्डा आप (दक्षिण दिल्ली) अशा दिग्गजांचा पराभव झाला होता. दरम्यान हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने भाजपने आपली ताकद त्या राज्यात लावली असली तरी दुसरीकडे २०२४च्या निवडणुकीची रणनीती ठरविण्याची तयारी चालूच आहे. हिमाचल प्रदेश हे भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे हे गृहराज्य आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेली पाच वर्षे भाजपची सत्ता आहे. गेल्या महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेळा हिमाचल प्रदेशला भेट दिली. पक्षाने या राज्यासाठी मिशन रिपिट मोहीम राबवली आहे. स्वत: पंतप्रधानांनी त्यात लक्ष घातले आहे. कोणत्याही परिस्थितीत हिमाचल प्रदेशची सत्ता भाजपला आपल्या हाती राखणे अत्यावश्यक आहे. पक्षाच्या अध्यक्षांच्या गृहराज्यात भाजपचाच भगवा फडकत राहिला पाहिजे, यावर मोदी, शहा व स्वत: नड्डा यांचा कटाक्ष आहे.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -