Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपावसाळ्यातील आरोग्य

पावसाळ्यातील आरोग्य

डॉ. लीना राजवाडे

”नेमेचि येतो मग पावसाळा” या उक्तीप्रमाणे आपण अनुभवत आहोत हा वर्षा ऋतू. वर्षा ऋतू हा कालावधी म्हणजे सूर्याच्या दक्षिणायनाची सुरुवात, चंद्राच्या प्राधान्याचा सौम्य असा हा कालावधी होय. भारताचा विचार केल्यास उत्तर गोलार्धात हा देश असल्याने, सूर्य दक्षिण गोलार्धात असल्याने, पावसाळ्यात सूर्याचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे वातावरणात, तापमानात, हवेतील आर्द्रतेतही बदल होतो. कालाच्या सौम्य स्वभावाने चंद्र प्रबळ होतो.

निसर्गात जसे बदल घडतात तसेच सर्व प्राणिमात्रदेखील हे बदल अनुभवतात. मेघांनी होणारा वर्षाव आणि थंड वारे यामुळे हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढते. स्निग्धता वाढते. हळूहळू बल किंवा शक्ती, ताकद वाढायला सुरुवात होते. सूर्य आणि चंद्र ही अनुक्रमे उष्ण आणि शीत गुणाची प्रतीके आहेत. त्या दोहोंच्या संतुलनाने सृष्टीतले आणि शरीरातले व्यापार चालतात. वर्षा ऋतूत सृष्टीत घडणारे बदल आपण पाहतो. नद्या-नाले पाण्याने भरून वाहू लागतात. वनश्री हिरवीगार दिसायला लागते. वातावरणात ओलावा, थंडपणा जाणवू लागतो. हे जसे सृष्टीत घडते, तसे आपले शरीरदेखील बदल अनुभवत असते. अशा वेळी या निसर्गात होणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना दिनचर्या आणि ऋतुचर्या यातील छोट्या व सहज अवलंबता येतील अशा गोष्टी आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला, तर स्वास्थ्य टिकायला नक्की मदत होऊ शकते.

आजच्या लेखात पावसाळ्यात उपयोगी अशा काही टिप्स मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळा हा हवामान, वातावरण यातील बदलाचा पहिला काळ आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच हळूहळू आपल्याला ताकद मिळायला याच ऋतूपासूनच सुरुवात होते आहे किंवा होणार आहे, ही गोष्ट मनात पक्की लक्षात घेतली पाहिजे. वातावरणात थंडावा असतो, त्यामुळे देहोष्मा किंवा शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जठराग्नी देखील कार्यरत असतो. त्याची शक्ती टिकण्यासाठी अन्न हे पचायला हलके; परंतु गरम व ताजे खावे. म्हणजे या ऋतूत वाढलेला किंवा प्रकोप होणारा वात दोष नियंत्रणात राहायला उपयोग होऊ शकतो. याचबरोबर पित्तदोषही पावसाळ्यात हळूहळू संचित व्हायला लागतो. याचा अर्थ हळूहळू चांगले पित्त साठायला लागले, तर पचन सुधारायला सुरुवात होते.

पचनशक्ती चांगली कार्यक्षम होऊ लागते आणि ती पुढे थंडीमध्ये एकदम चांगली होते. याचा फायदा असा होतो की, शरीराला चांगली ताकद मिळते. पावसाळ्यात त्यामुळे जठराग्नीकडे जाणीवपूर्वक नीट लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात थंडीला सरावलेले, शरीरात साठलेले पित्त पुढे शरद ऋतूमध्ये अचानक तापलेल्या सूर्य किरणांनी प्रकुपित होते. पित्ताचे उष्ण, तीक्ष्ण गुण, गुणात प्रमाणात वाढतात. म्हणून आताच काळजी घ्यायला हवी. नाहीतर आम्लपित्त, रक्त दृष्टी, त्वचा विकार या गोष्टी बळावतात. या गोष्टी वय वाढेल तशा अधिक जुनाट आजार म्हणून आपले सोबती होतात. सध्या उच्च रक्तदाब, मधुमेह, यकृताचे आजार वाढताना दिसते आहे. याचेही प्रमुख कारण योग्य ऋतुचर्या, दिनचर्या न पाळणे हेच आहे.

एकदा का हे आजाराचे लेबल लागले की, आपल्याला त्यासाठी म्हणून काही पथ्य (आहार-विहारातील योग्य मार्ग दाखवणारे बदल) करायला हवेत. हे बदल औषधांचा परिणाम लवकर व चांगला घडवून आणतात; परंतु आपल्या बिघडलेल्या पचनशक्तीची गाडी रुळावर आणणे हा त्याचा प्रमुख उद्देश असतो. लोकांमध्ये एक चुकीचा समज रूढ झाला आहे की, आयुर्वेदिक औषधे घेताना खूप पथ्य पाळायला लागतात. तो गैरसमज या वरील स्पष्टीकरणातून दूर होईल, अशी अपेक्षा आहे. लहान मुलांच्या वाढीचे वय असल्याने, त्यांची प्रतिकारशक्ती तयार होत असल्याने, मुले पावसाळ्यात लवकर आजारी पडू शकतात. त्यांना रोज एकदा कोमट तेलाने संपूर्ण अंगाला मालीश करावे. वेखंड पावडर तळहात, पायाला लावावी. त्यामुळे दमट हवेमुळे होणारा जंतुसंसर्ग रोखायला मदत होऊ शकते. याचबरोबर पावसाळ्यात पिण्याचे पाणी खराब असू शकते. ते शक्यतो उकळून घ्यावे. पाऊस थोडा स्थिरावला की, पावसाचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवून, फडक्याने गाळून घ्यावे. ते पिण्यासाठी वापरावे. कृमी होण्याची शक्यता असते तेव्हा विडंगारिष्ट रोज जेवणानंतर घ्यावे.

पावसाळ्यात खाण्यात पुढील गोष्टींचा समावेश करावा. जुने धान्य वापरावे. धान्यांचा वापर यूष किंवा कढण स्वरूपात करावा. मांसाहारी व्यक्तींनी हळद मीठ सौवर्चल, मिरे युक्त तूप व तेलाची वरून फोडणी दिलेले सूप प्यावे. खूप जुने मनुकांपासून बनवलेले मध्वारिष्ट पाणी घालून घ्यावे. दह्याची निवळ, ताक यांचा सकाळी भोजनात अवश्य अंतर्भाव करावा. पावसाळ्यात स्वयंपाकघरात मिसळणीच्या डब्यात हिंग, ओवा, मेथी दाणे, तमालपत्र, मिरे, सुंठ हे मसाले ठेवावेत. पुढे सुरू होणारा चातुर्मास यातही भाजलेली धान्ये खावीत. वातावरणातील आर्द्रता, दमटपणा कमी करण्यासाठी धूप करावा. त्यासाठी गव्हला कचोरा, कापूर, उद, धूप अशी सुगंधी द्रव्ये वापरावीत.

पावसाळ्यात करून बघावेत, असे काही कढणाचे प्रकार –

मुगाचे कढण – हे दोन प्रकारे करता येते. सुंठ, मिरी, पिंपळी आणि तूप घालून कढवलेले किंवा त्याचबरोबर आमसूल, डाळिंबाची साल किंवा दाणे, ताक, घालून केलेले कढण. फक्त मुळा घालून केलेले मुगाचे कढण खोकला कमी करते.

पंचामृत कढण कुळीथ, मूग, तुरीची डाळ, उडीद, पावटे या पाच गोष्टी वापरून केलेले हे विशेषकरून अन्नाला चव न लागणे, अंग मोडून आल्यासारखे वाटणे ही लक्षणे असताना उपयोगी पडते.

नवांग यूष आवळा, मुळा, सुंठ, बोरं, पिंपळी, मूग, तांदूळ, कुळीथ आणि पाणी हे एकत्र करून तयार केलेले कढण. थोडक्यात, सूज्ञ वाचकहो, पावसाळ्याचा आनंद अनुभवताना वरील गोष्टी नक्की अमलात आणा आणि निरोगी राहा.

leena_rajwade@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -