Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकोकणातील शिवपंचक गृहीतके

कोकणातील शिवपंचक गृहीतके

अनुराधा परब

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक प्रथा परंपरांवर शिवपंचकाचा पगडा आहे. रद्र/शिवाचे अवतार मानले गेलेले भैरव, काळभैरव, रवळनाथ, वेतोबा/वेताळ, आदिमाया पार्वतीचे रूप मानली गेलेली सृजनदेवता सातेरी आणि सर्वात शेवटी येऊन दाखल होत प्रस्तुत कालखंडात सर्वाधिक लोकप्रिय झालेला गणपती हे ते शिवपंचक!

सिंधुदुर्गातील कोकणी माणसासाठी गणेशोत्सव हाच दिवाळसण असतो. एक वेळ सिंधुदुर्गवासीय दिवाळीला गावी जाणार नाहीत; परंतु गणपतीला मात्र इकडची दुनिया तिकडे करून ते गावी आवर्जून जाणारच. ही गणपतीची ओढ आताची नाही, तर ती मध्ययुगापासूनची आहे. कोकणातील या शिवपंचकाची सुरुवात ज्या रुद्रापासून होते, त्याचा सर्वप्रथम उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो. रुद्रावर एकूण तीन सूक्त असून तब्बल पंचाहत्तर वेळा संपूर्ण ऋग्वेदात त्याचा उल्लेख येतो. “ओम त्र्यंबकम् यजामहे…” हा प्रख्यात मृत्युंजय मंत्रदेखील रुद्राशीच संबंधित आहे, तर ऋग्वेदामध्ये त्याच्या रूपाची तुलना सूर्याशी केलेली आहे. “रूद्र” या शब्दाच्या मुळाशी गेले असता लक्षात येते की, रौद्र रूप असलेला तो रूद्र. शिवाय त्याच्याशी येऊन जोडल्या गेलेल्या पुराकथांतून जगाचा विलय घडविणारा, तसेच रडणारा आणि रडवणारा अथवा जगातील अंधःकारमय वाईटाचा नाश करणारा असेही त्याचे वर्णन येते. विख्यात संशोधक स्टेला क्रामरिश यांच्या मते, “रूद्र म्हणजे वन्य किंवा जंगली, ज्याला माणसाळवणे अशक्य असते. हा रौद्ररूपी आहे आणि त्याला सर्वच घाबरतात किंवा वचकून असतात.” संशोधक आर. के. शर्मा रुद्राचे वर्णन करताना “तो भयानक आहे,” असे म्हणतात, तर विख्यात टीकाकार सायणाचार्य रुद्राच्या सहा उपपत्ती सांगतात. ज्या सर्वच्या सर्व शिवाशीच जोडलेल्या आहेत. याच रुद्राचा एक संबंध शिवाला आवडणाऱ्या रूद्र अक्ष अर्थात रुद्राक्षाशीही जोडलेला आहे. सिंधुदुर्गाचा विचार करताना रूद्र आणखी एका गोष्टीसाठी महत्त्वाचा ठरतो. कारण हा किनारपट्टीचा भाग असून येथील लोकांचे जीवन समुद्राशी बांधलेले आहे. रुद्रालाच ‘मरूत्’ म्हणजेच ‘वादळांचा देव’ असेही म्हटले जाते, हे इथे महत्त्वाचे ठरावे.

रूद्र, भैरव, काळभैरव, रवळनाथ यांच्या प्रतिमाशास्त्रामध्ये बरेचसे साम्य आढळते. कारण ही सर्व रूद्र/शिवाचीच रूपे आहेत, असे मानले जाते. रूद्र किंवा शिवापासूनच यांची निर्मिती झाल्याच्या अनेक आख्यायिका सर्वश्रुत आहेत. याच मूळ भैरवापासून अष्टभैरवांच्या निर्मितीतील एक रूद्रभैरवाचा संबंध हा रवळनाथाशी जोडलेला आहे. अष्टभैरव आठ दिशांचे राखणदार अर्थात क्षेत्रपाल आहेत, असे मानले जाते. काळभैरव तसेच रवळनाथ यांच्याकडेही ‘राखणदार’ किंवा ‘क्षेत्रपाल’ म्हणूनच भक्त पाहतात. अष्टभैरवांचा संबंध हा अष्टमातृकांशीही जोडलेला आहे. या अष्टमातृकांच्या प्रतिमाशास्त्रात सोबत गणपतीदेखील अनेक ठिकाणी लेणींमधून अंकित झालेला दिसतो, तर दुसरीकडे रूद्र हे जसे शिवाचे रूप तसेच पलीकडच्या बाजूस येणाऱ्या सातेरी, पावणाई यांसारख्या सृजनदेवता आदिमाया पार्वतीचे रूप मानल्या जातात.

अनेक ठिकाणी गेल्या हजार वर्षांमध्ये प्रथा परंपरांची एवढी घुसळण व मिश्रण झाले आहे की त्यांचे मूळ विलग करणे किंवा शोधणे कठीण झाले आहे. याच मुद्द्याचा आपण विस्ताराने अभ्यास करतो तेव्हा लक्षात येते, की म्हणूनच कदाचित ज्या-ज्या ठिकाणी देवीची शक्तिपीठे अस्तित्वात आली आहेत. त्या-त्या ठिकाणी तिच्यासोबत काळभैरव, भैरवाची देवालयेदेखील हमखास सापडतात. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करताना आणखी एक महत्त्वाची बाब आपल्या लक्षात येते. ती म्हणजे महाराष्ट्राचे उत्तर दक्षिण असे दोन भाग केले, तर उत्तरेकडील भागाचे नाते उत्तर भारताच्या संस्कृतीशी अधिक आहे. तसेच दक्षिणेकडच्या भागांत खासकरून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर हे कर्नाटक, तामिळनाडू या दक्षिण भारताशी अधिक जवळ आहे. रूद्रभैरवाची परंपरा दक्षिण भारतात म्हणूनच कदाचित मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. कदाचित हेच कारण असावे, त्यामुळे कर्नाटक, गोवा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गामध्ये रवळनाथ हा अनेक ठिकाणी ग्रामदेव किंवा कुलदेव म्हणून मान्यता पावलेला दिसतो.

देवता आणि प्रथा परंपरांची ही घुसळण मध्ययुगापासून झालेली दिसते. हा तोच कालखंड होता, जेव्हा भारतात अनेक ठिकाणी नाथ संप्रदायाची शक्तिपीठे मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आली होती. नाथ परंपरेमध्ये साधकाचे अंतिम उद्दिष्ट हे रूद्र/शिवाच्या रूपामध्ये विलीन होणे हेच असते. त्यामध्ये ज्या देवतांची प्रामुख्याने पूजा केली जाते, त्यात काळभैरवाचा प्रमुख समावेश आहे. काळभैरवाशीच नाते सांगणाऱ्या रवळूचा नंतर “रवळ‘नाथ’” झालेला असावा, अशीही एक उत्पत्ती संशोधक सांगतात. राऊळ म्हणजे महाल! त्या राऊळात बसून या प्रदेशावर राज्य करणारा आणि प्रदेशातील जनतेची काळजी वाहणारा ‘प्रशासक राजा’ म्हणजे रवळनाथ अशीदेखील जनमानसाची गाढ श्रद्धा आहे.

या पंचकामध्ये वेताळ किंवा वेतोबा मात्र पुराकथांमध्ये दिसायला रौद्ररूपी वा भयानक दिसत असला तरीदेखील प्रत्यक्षात सिंधुदुर्गामध्ये तो पालनकर्ता, वडीलधारा म्हणून येतो. किंबहुना म्हणूनच तो वेताळ न राहता “वेतोबा” होतो. प्रतिमाशास्त्रात वेतोबा सिंधुदुर्गात धोतर आणि पंचा परिधान केलेला दिसतो, तर त्याचे डोळे हे रूद्रभैरवाप्रमाणे न दिसता त्यांत वात्सल्यभाव दिसतो. या सर्व पंचकामध्ये गणपती हा गाणपत्य आणि नाथसंप्रदायातून येऊन स्थिरावला आणि मध्ययुगापासून या सर्व देवतांपेक्षा अधिक प्रबळ व लोकप्रिय झाला.

गणपतीदेखील सुरुवातीच्या काळात रूद्रशिवाच्या गणांमधील एक म्हणूनच येतो; परंतु मध्ययुगानंतर त्याला त्याचे स्वतंत्र रूप प्राप्त होऊन तो लोकप्रिय झालेला दिसतो. म्हणूनच कोकणातील या देवतांचा विचार ‘शिवपंचक किंवा शिवपरिवार’ म्हणून केला, तरच आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -