Friday, May 3, 2024
HomeUncategorizedS. Somnath ISRO : इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान

S. Somnath ISRO : इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान

आदित्य एल-१ लाँचिंगच्या दिवशीच समजली होती बातमी; केला मोठा खुलासा…

चेन्नई : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम ‘चांद्रयान-३’ (Chandrayaan-3) तसेच भारताची सौर मोहिम ‘आदित्य एल-१’ (Aditya-L1) यामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेले इस्रोचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ (S. Somnath) यांना कॅन्सरचे (Cancer) निदान झाल्याची बातमी समोर आली आहे. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. शिवाय आदित्य एल-१च्या लाँचिंग दिवशीच मला या आजाराबाबत कळलं, असं त्यांनी सांगितलं. चांद्रयान -३ मोहिमेपासून त्यांना आरोग्यविषयक समस्या सुरु झाल्या होत्या. मात्र, तेव्हा आपल्याला कर्करोग झालाय, याची त्यांना माहिती नव्हती, असंही त्यांनी यावेळेस सांगितलं.

सोमनाथ यांना कॅन्सर झाला आहे, याची माहिती मिळाल्यानंतर इस्रोमधील त्यांच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र, अशा आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी स्वत:ला आणि सहकाऱ्यांना सावरले. चांद्रयान मोहिनंतर त्यांनी पोटाचे स्कॅनिंग केले. तेव्हा त्यांना पोटाचा कॅन्सर झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील उपचार घेण्यासाठी ते चेन्नईत गेले. त्यांना हा आजार अनुवंशिकतेने झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

कॅन्सरचे निदान झाल्यानंतर एस. सोमनाथ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बऱ्याच काळापासून त्यांच्यावर किमोथेरपी सुरु आहे. स्कॅन, मेडिकल चेकअप्स अशा अनेक कठीण प्रक्रियांमधून गेल्यानंतर त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा आहे. त्यांचा आजार आता बरा झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कर्करोगाशी झुंज देत असतानाच कुटुंबिय आणि सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली असल्याचे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.

इस्रोचे सर्व मिशन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

एस. सोमनाथ म्हणाले, ‘मला माहिती आहे की, कॅन्सर पूर्णपणे बरा व्हायला बराच वेळ लागेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. मात्र, ही लढाई मी लढेन आणि जिंकेन सुद्धा’ असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला. ‘सध्या मी बराच रिकव्हर झालो आहे. मी केवळ चार दिवस रुग्णालयात होतो. त्यानंतर मी माझे काम देखील पूर्ण केले. अजूनही मी सातत्याने सर्व चेकअप करतोय. पण त्यासोबतच माझं काम आणि इस्रोचे मिशन यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. इस्रोचे सर्व मिशन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही’, असेही सोमनाथ यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -