Sunday, May 5, 2024
Homeमहामुंबईउंच इमारतीतील आगीवर नियंत्रण मिळवणे होणार सोपे

उंच इमारतीतील आगीवर नियंत्रण मिळवणे होणार सोपे

सीएएफएस व हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणाली लवकरच अग्निशमन दलाच्या ताफ्यात

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील उंच इमारतींमध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह (सीएएफएस) हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. हे अग्निशमन उपकरण अगदी सहजगत्या हाताळणारे आहे. त्यामुळे अशा प्रकारची ६५ उपकरणे खरेदी केली जात आहेत. या उपकरणांचा आगीच्या उगम पातळीवर अत्यंत प्रभावीपणे वापर करून आगीचा प्रसार रोखला जाईल आणि इमारतींमधील रहिवाशांना निर्माण होणारा धोका टाळता येणार आहे.

उत्तुंग इमारतीच्या वरील मजल्यांवर आग लागल्यास व इमारतीमधील अंतर्गत अग्निशमन प्रणाली कार्यरत नसल्यास अग्निशमन दलाला पाणी पुरवठा करण्याकरिता पंपांचे जाळे तयार करावे लागते. हे जाळे तयार करण्यास काही वेळ लागतो आणि त्यामुळे आग पसरण्याची व त्यामुळे इमारतीमधील रहिवाशांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्याकरता अग्निशमन जवान आगीच्या वर्दीवर जाताना प्रथमोपचार किट प्रमाणे एक लहानसे व सहजरीत्या वाहून नेण्यास सोपे असे अग्निशमन उपकरण स्वतः सोबत घेऊन गेल्यास आणि तत्काळ त्याचा मारा करून आगीच्या उगम पातळीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते.

यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह (सीएएफएस) हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणाली उपलब्ध असून त्याचा आगीच्या उगम पातळीवर अत्यंत प्रभावीपणे वापर करून आगीचा प्रसार व इमारतींमधील रहिवाशांना निर्माण होणारा धोका टाळता येईल. हे उपकरण अग्निशामकांच्या पाठीवर सहजरित्या बॅकपॅक प्रमाणे वाहता येते व यामुळे आगीच्या वर्दीला प्रतिसाद देताना सदर प्रणाली अग्निशामक स्वतः सोबत घेऊन जाऊ शकतो. त्याचा क्लास-ए, क्लास-बी तसेच १००० वोल्टसपर्यंतच्या विद्युत आगींवर वापर करता येतो, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. यासाठी तब्बल २.५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये ही उपकरणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात जमा होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -