Sunday, May 5, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअनैतिक संबंधांमुळे सुखी संसाराला गालबोट

अनैतिक संबंधांमुळे सुखी संसाराला गालबोट

अॅड. रिया करंजक

श्यामचा आपली पत्नी, दोन मुली व एक मुलगा, आई-वडील यांच्यासोबत सुखाचा संसार चालू होता. रिक्षा चालवून तो आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत होता. या रिक्षामधूनच त्याला रिक्षामधील काही बारीक-सारीक गोष्टी समजून पुढे तो रिक्षाचे परमिट काढण्याचा व्यवसाय करू लागला. त्यात त्याला भरपूर पैसा मिळू लागला. पैसा मिळाला की, माणसाच्या बुद्धीला आपोआप दुर्बुद्धी सुचते तसाच प्रकार श्यामच्या बाबतीत झाला. घराशेजारी म्हणजेच बाजूच्या घरातील विवाहित स्त्रीशी त्याचे अनैतिक संबंध सुरू झाले. जराही कल्पना दोघांच्या घरामध्ये नव्हती. परस्त्री असलेली राधा, तिला एक मुलगी होती. अनेक वर्षे हे संबंध चालू होते, पण अचानक तिच्या वागण्यातील बदलांमुळे तिच्या नणंदेला संशय आला व नणंदेने तिच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सुरू केले.

त्यावेळी राधाचं नेमकं काय चाललेलं आहे हे तिच्या नणंदेला समजलं आणि या नणंदेने आपल्या घरात व शेजारील श्यामच्या घरात ही गोष्ट सांगितली. दोन्ही घरांमध्ये वाद झाले, भांडणं झाली. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं आणि समजूतदार लोकांनी मिटिंग घेऊन हे प्रकरण तिथल्या तिथे मिटवलं. राधा राहत असलेल्या ठिकाणावरून गायब झाली व श्यामकडे पैशाची मागणी करू लागली. साहजिकच श्यामने पैसे देण्यास नकार दिला. आपली तर आता बदनामी झालीच आहे आणि घरच्या लोकांच्या सांगण्यावरून राधाला आपण दोषी नाही आहोत, तर सर्व दोष श्यामचे आहेत हे आपल्या घरात पटवून द्यायचं होतं व आपण कसे निर्दोष आहोत, हेही समाजाला दाखवायचं होतं म्हणून तिने पोलीस स्टेशनमध्ये श्यामविरुद्ध तक्रार केली. तीही समझोता झाल्यावर पंधरा दिवसांनी तिने पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार केली की, श्यामने माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन माझ्यावर बलात्कार केला.

त्यामुळे श्यामवर ३७६(२) एन ५०६ कलम लावण्यात आले. श्याम राधेला सर्व गोष्टी पुरवत होता, वेळोवेळी पैशाची मागणी झाली की, पैसे पुरवत होता, पण ज्यावेळी त्याने पैसे देणे बंद केलं. त्याचा राग येऊन राधेने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलीसांनी श्यामला घरामधून अटक केली व त्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवून त्याच्याकडून गुन्हा कबुली करून प्रकरण कोर्टामध्ये दाखल झालं. पोलीस कस्टडीनंतर श्याम जेलमध्ये गेला. एकूलता एक मुलगा जेलमध्ये गेला, याचा धक्का श्यामच्या आई-वडिलांना बसला. श्यामच्या पत्नीला आपल्या पतीने एवढा विश्वासघात केलाय, यावर विश्वास बसत नव्हता.

त्याला बेलवर सोडवण्यासाठी सेशन कोर्टात प्रयत्न करण्यात आले. त्यावेळी श्यामच्या वकिलाने पोलीस आणि सत्र न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशिटवर युक्तिवाद केला. यामध्ये पोलिसांनी राधेची जबानी घेतली होती, त्याप्रमाणे श्यामने तिला कुठे कुठे नेले, कुठल्या कुठल्या लॉजवर ठेवले, याची कसून चौकशी केली होती. त्याच्यासोबत जाताना ती कशा प्रकारे, कुठल्या वाहनाने गेली होती, तिच्या मुलीला कधी धमकावलं होतं? या सगळ्या गोष्टी त्या चार्जशीटमध्ये होत्या. या चार्जशीटचा आधार घेऊन वकिलांनी युक्तिवाद केला. राधेने सांगितले होते की, श्यामच्या घरात गेल्यावर पहिल्यांदा श्यामने तिच्या मुलीला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावर वकिलांनी असे मत मांडले की, श्यामच्या घरात दिवस-रात्र त्याचे आई-वडील असतात. घरामध्ये कधी कोणी असत नाही, असा प्रसंग कधीच येत नाही. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा इथे मुद्दाच येत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे श्याम आणि राधेच्या आजूबाजूलाही घरं आहेत. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी राधेने बोंबाबोंब का नाही केली? त्यावेळी तिने आपल्या घरातल्यांना याची कल्पना का नाही दिली? किंवा श्यामच्या घरातील लोकांना तसेच श्यामच्या पत्नीला ही गोष्ट का नाही सांगितली? हे महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. त्यानंतर ज्या लॉजवर ते गेले, त्या त्या लॉजवर पोलिसांना रेकॉर्डमध्ये तिचा आधार नंबर सापडलेला होता. म्हणजे तिने स्वतःहून आधार कार्ड नेले होते व ते तिने लॉजवर दाखवलेले होते. ती लॉजवर जाताना अनेक रिक्षांमधून गेली होती, त्यामुळे त्या चार्जशीटमध्ये रिक्षावाल्याचा जबाब नोंदवला होता. त्या रिक्षावाल्याने असं सांगितलं होतं, राधा अमुक ठिकाणी वाट बघत असायची व मी तेथे रिक्षा घेऊन जायचो. ती रिक्षात बसून लॉजवर यायची. याचाच अर्थ असा की, श्यामने तिच्यावर कुठे जबरदस्ती केली नव्हती. ती स्वतःच्या मर्जीने येत होती.

या अनेक ठिकाणी तिची मुलगी कुठेच दिसत नव्हती. कारण तिने सांगितले होते, तिच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन त्याने अतिप्रसंग केले होते. वरील घटनाक्रम पाहिल्यास त्यामुळे प्रश्न निर्माण होतो, असा युक्तिवाद श्यामच्या वकिलांनी केला तसेच एवढे वर्ष यांच्यात संबंध होते तेव्हा तिने बलात्काराची केस का दाखल केली नाही? या केसमध्ये रिक्षावाल्याच्या जबानीमुळे श्यामला जामीन मिळाला व तो तुरुंगातून बाहेर आला. तोपर्यंत राधेच्या घरातील लोक श्यामच्या घरातील लोकांना धमकावत होते. त्यांनी श्यामच्या घरातील लोकांचं जगणं मुश्कील करून ठेवलं होतं. या केसमध्ये राधेला वाटलं की, आपल्या घरातील लोकांना आपण निर्दोष व श्याम दोषी आहे, हे पटवून देऊ.

तसेच तिला वाटलं की, पोलीस स्टेशनपर्यंतच हे प्रकरण असेल. तेथे आपण श्यामकडे पैशाची मागणी करून प्रकरण तिथल्या तिथे मिटवू. पण प्रामाणिक पोलिसांमुळे प्रकरण कोर्टात दाखल होऊन राधेचे सगळे प्रयत्न फसले गेले. आता हा पूर्णपणे अडकल्याची समजूत राधा नि तिच्या घरातील लोकांची झाली. श्यामला जामीन मिळणार नाही कारण, त्यावेळी हैदराबादमधील डॉक्टरवरील बलात्कार केस पूर्ण भारतात गाजत होती. त्यावेळी ३७६ कलमांना जामीन मिळणे मुश्कील झाले होते. पण तिला माहीत नव्हतं की, हे संबंध दोघांच्या संमतीने झालेले होते. त्याच्यामुळे त्याने बलात्कार केलाय, हे सिद्ध होत नव्हते.

श्यामला विश्वास होता, राधा त्याला फसवणार नाही, त्याला अडकून ठेवणार नाही. पण राधेला पैसे देणं थांबवलं, तेव्हा राधेने त्याला बलात्काराच्या केसमध्ये अडकवलं. अशा प्रकारे त्याने स्वतःचाच नाही, तर या प्रकरणामुळे आपल्या पत्नीचा आणि घरातल्या लोकांचा विश्वास गमावलेला होता.
(सत्य कथेवर आधारित.
व्यक्तींची नावे बदलली आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -