Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सCyber Crime : ऑनलाइन जॉब रॅकेटचे मलेशिया आणि दुबई कनेक्शन उघड

Cyber Crime : ऑनलाइन जॉब रॅकेटचे मलेशिया आणि दुबई कनेक्शन उघड

  • गोलमाल : महेश पांचाळ

बोरिवलीतल्या तरुणाची फसवणूक

बोरिवलीत राहणाऱ्या तरुणाला मलेशियातील एका कंपनीत एचआर प्रमुख असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला होता. जीबीएल डिजिटल मार्केटिंग कंपनीचे नाव सांगण्यात आले होते. ऑनलाइन कामे पूर्ण करण्यासाठी नोकरीची ऑफर या तरुणाला दिली होती. ही कामे पूर्ण केल्यावर, या तरुणाला विविध ऑनलाइन पेमेंट पद्धतींद्वारे एकूण ७ लाख ८ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याची सूचना देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी तरुणाने अज्ञात फोन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ एफआयआर नोंदवला गेला. पोलीस ठाण्याशी संलग्न सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ बँक खात्यावरील पेमेंट ब्लॉक केले. पोलिसांनी खात्याचा तपशील तपासला असता, यातील काही पैसे मालवणी येथील मेहता ज्वेलर्सच्या खात्यावर वळते झाल्याची बाब दिसून आली. पोलिसांनी मालवणी येथील मेहता ज्वेलर्सशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी संशयित आरोपींनी सोने खरेदी केल्याची बाब उघडकीस आली. ज्वेलर्स मालकाने संशयितांचे आधार कार्ड स्वत:कडे घेऊन ठेवले होते. तसेच, ज्वेलर्सच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ओळखले आणि दुसऱ्या ज्वेलरी दुकानात जाऊन त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तामिळनाडूचा असल्याचे समजले. कामानिमित्त तो मुंबईमध्ये फेरफटका मारत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. तो मुंबईत असल्याचे समजल्यानंतर दोन दिवस पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.त्याचा मोबाइल फोन ट्रेसिंगवर ठेवण्यात आला होता. तो मालवणी परिसरात असल्याचे लोकेशन जेथे सापडले ते पोलीस पोहोचले. मूळचा तामिळनाडूचा रहिवासी असलेला २८ वर्षीय आरोपी मोहम्मद इम्रान जमाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. जमालला अटक केल्यानंतर चौकशीत त्याचे वडील मलेशियामध्ये राहत असल्याचे समजले. ज्यांच्यासोबत हा घोटाळा सुरू केला, तो चुलत भाऊ मलेशियामध्ये आणि दुबईमध्ये एक सहकारी असल्याची कबुली त्याने केले. जमालने पोलिसांना सांगितले की, त्याच्या खात्यात फसवणूक केलेली रक्कम मिळवणे आणि सोने खरेदीसाठी त्याचा वापर झाल्यामुळे ती जबाबदारी त्याने स्वीकारली.त्यानंतर सोन्याचे परकीय चलनात रूपांतर करून ते दुबई आणि मलेशियाला हस्तांतरित करण्याच्या सूचना जमालला कोण देत होते. तसेच त्याच्या परदेशातील संबंधांबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

तात्पर्य : ऑनलाइन जॉब देण्याच्या आमिषापोटी फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. सर्वसाधारणपणे आपण काम करतो त्याचा मोबदला आपल्या बँक खात्यावर जमा केला जातो. मात्र, ऑनलाइन काम केल्यानंतर काही बहाणा काढून आपल्यालाच पैसे जमा करायला सांगतात, तेव्हा काहीतरी गडबड आहे, धोका आहे, याची जाणीव होणे आवश्यक आहे.

maheshom108@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -