Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणबारसू रिफायनरी परिसरात अघटीत घडविण्याचे षडयंत्र

बारसू रिफायनरी परिसरात अघटीत घडविण्याचे षडयंत्र

माजी खासदार निलेश राणे यांची खळबळजनक माहिती

परभागातील मंडळी दहशतीसाठी करत आहेत कट

रिफायनरी परिसरात मटेरियल सप्लायच्या निमित्ताने जिलेटिन स्फोटकांचा करण्यात आलाय मोठा साठा

पोलिस,प्रशासनाचे वेधले लक्ष!

सिंधुनगरी (प्रतिनिधी): बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कामे सुरू असून या ठिकाणी मटेरियल सप्लायचे काम सुरू झाले आहे. हीच संधी साधून जिलेटिन स्टिक सारख्या स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याचे जाहीर झाले आहे. प्रकल्पाचे समर्थन करणारी ताकद मोठी आहे .तर विरोध करणाऱ्यांची ताकद कमी असल्यामुळे बाहेरचे लोक हे वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. येथे जमणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडू नये व निरपराध लोकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून जिलेटिन सारख्या स्फोटाचा साठा आणी त्यामागील कटाचा पोलीस,प्रशासनाने शोध घ्यावा.याकडे माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले. सिंधुनगरी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याची माहीती देणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी निलेश राणे म्हणाले, बारसू रिफायनरी परिसरात जवळपास ७२ ठिकाणी बोरवेल मारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मटेरियलचे सप्लाय करणारे बाहेरचे ठेकेदार आहेत. या मटेरियल सप्लायच्या माध्यमातून,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होण्यापूर्वी जिलेटिन स्टिक या स्फोटकांचा मोठा साठा या परप्रांतीय सप्लायरमार्फत करण्याचे काम सुरू झाले आहे. त्या ठिकाणी आंदोलकांची गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडू नये,आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये त्याची झळ बसू नये यासाठी ही माहिती आपण जाहीर करत आहोत. आपण तीन लोकसभा निवडणुका या मतदारसंघात लढल्या आहेत. या भागातील नागरिकांचा विरोध असला तरी त्याची तीव्रता कमी आहे. या लोकांना भडकवण्याचे काम बाहेरची लोक करीत आहेत. विरोधासाठी गर्दी जमवून त्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडविण्याचा कट असल्याचा आपल्याला संशय आहे. याबाबतची काही माहिती काही सूत्रानी माझ्यापर्यंत पोहचवली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही माहिती त्यांच्याकडे पोहोच करणार आहे. तसेच याबाबत पोलिसांनाही आवश्यकता भासल्यास माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे. बारसूत कोणताही अनुचित प्रकार घडू नये,सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसू नये एवढीच आपली प्रामाणिक अपेक्षा आहे असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंचा दुट्टपीपणा समोर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी येत आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांना बारसू येथे रिफायनरी प्रकल्प हवा होता तसे त्यांनी त्यावेळी हा प्रकल्प का हवा? याबाबत देशाच्या पंतप्रधानांना लेखी पत्राने विनंती केले होती. आता तेच उद्धव ठाकरे प्रकल्प नको आहे म्हणून बारसू येथे येत आहेत. तेथील लोक बदलली की उद्धव ठाकरे बदलले हे जनतेसमोर आले आहे. या प्रकल्पाला लोकांच्या विरोधाची तीव्रता कमी असली तरी त्यांना भडकवणाऱ्या लोकांची तीव्रता जास्त आहे. यासाठी बाहेरून लोक आणण्याचा, काहीतरी अनुचित प्रकार घडविण्याचा बाहेरच्या लोकांचा कट आहे. या कटात उद्धव ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नाही. परंतु लोक जमून आंदोलन करण्याचा विरोध करून लोकांना भडकवण्याचा त्यांचा हेतू योग्य नाही. त्याने या प्रकल्पाला विरोधी आंदोलन केले तर आम्ही बारसू प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन करून समर्थनार्थ ताकद काय आहे हेही दाखवून देऊ असेही निलेश राणे म्हणाले.

राजन साळवींनी आधी बारसू गावात जावे मग आम्हाला रोखावे !

राजन साळवी यांच्या चॅलेंज बद्दल बोलताना ते म्हणाले, जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाच्या भिकेवर मोठे झालेले हे नेतृत्व असून हिम्मत असेल तर त्यांनी बारसू गावात जाऊन दाखवावे मगच त्यांनी राणेंना रोखावे असे प्रती चॅलेंज दिले आहे.बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे हे या भागाशी संबंध नसलेले लोक आहेत. येथील नागरिकांना भडकवण्याचे त्यांनी काम केले आहे. हा प्रकल्प विरोधामुळे गेला तर राज्यातील चौथा प्रकल्प जाणार आहे. हे फार मोठे नुकसान असून तो प्रकल्प बारसू येथे व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे समर्थन आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही समर्थनाच्या बाजूने नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. असेही निलेश राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -