Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीबैलगाडी शर्यतीत कर्नाटकातील बैलांचे वाढतेय महत्त्व

बैलगाडी शर्यतीत कर्नाटकातील बैलांचे वाढतेय महत्त्व

कोल्हापूर, सांगली भागांतील सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के बैल हे कर्नाटकी जातीचे

नांदगाव मुरुड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सारळ (रेवस) येथील समुद्रकिनाऱ्यापासून आवास, किहीम, नवगाव, थळ, कामत, अलिबाग, रायवाडी, नागाव, रेवदंडा आदींसह मुरुड तालुक्यातील काशिद, चिकणी, नांदगाव, मुरुड, तर श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, श्रीवर्धन, आदी समुद्रकिनारी, तर सताड, सारसोली-चणेरा, रोहा, माणगाव येथील माती मैदानावर प्रतिवर्षी जत्रा, महोत्सव, मान्यवरांचे वाढदिवस, अथवा अन्य कारणांमुळे शनिवार, रविवार अथवा सुट्टीच्या दिवसात बैलगाडी, घोडागाडीच्या शर्यतींचे आयोजन केले जाते. या शर्यतीत सुमारे ५०० ते ६०० बैलगाडी स्पर्धक मोठ्या हिरीरीने सहभागी होत असतात. मात्र सद्यस्थितीत या स्पर्धांतून पळण्यास उजवे असल्याने कर्नाटकातील बैलांचा बोलबाला वाढला आहे.

या शर्यतींतील बारा-पंधराशे बैलांत कर्नाटक व आसपासच्या कोल्हापूर, सांगली भागातील सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के बैल हे कर्नाटकी जातीचे पळताना दिसून येत आहेत. भरदार देहयष्टी, टोकदार उंचच उंच खिलारी शिंगे, पांढरा शुभ्र रंग व वाकडी पिळदार शेपटी, रुबाबदार बांधा अशी ही जनावरे मातीच्या घाटावरील बैलगाडा शर्यतीत वेगाने सुसाट पळत विविध गटागटांतून क्रमांक पटकावलेले असतात. किमान आठ ते दहा कि.मी. अंतराच्या शर्यतीत अधिक वेळ भरधाव पळण्याची अंगी क्षमता असल्याने समुद्रकिनाऱ्यावरील ४ ते ५ कि.मी.चे अंतर ते वेगाने लिलया कापतात. त्यामुळेच ते स्थानिक गावरान तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील अन्य जातीच्या बैलांहून पळण्यात उजवे ठरत आहेत. येथील काहींनी असे बैल खरेदी करून येथील शर्यतीत भाग घेऊन यश मिळविल्यामुळे अलिकडच्या काळात बऱ्याच जणांनी आपला मोर्चा असे कर्नाटकी बैल खरेदी करण्याकडे वळवला आहे.

या बैलांचे वैशिष्ट्य म्हणजे शर्यतीत पळवतांना त्यांना कोणत्याही शस्त्राने मारहाण करण्याची गरज लागत नाही. तसे तर शासनाने अशा प्रकारच्या मुक्या प्राण्यांना अमानुष मारहाणीवर बंदीच घातली आहे. म्हणून अशा वेगाने धावणाऱ्या कर्नाटकी बैलांनी येथील स्पर्धेतील चुरस अधिक वाढवल्यामुळे कुणा एका स्पर्धकाची एखाद्या गटातील हमखास नंबर मिळण्याची मक्तेदारीच संपुष्टात आणली आहे.

या कर्नाटकी फंड्यामुळे अन्य जातीच्या बैलांची विक्री ही केवळ खटारा गाडी, नांगरणी अशा अवजड मेहनतीच्या कामासाठी होत आहे. कर्नाटकी फंड्यामुळे हौशी गाडीवान थेट कर्नाटक व आजूबाजूच्या परिसरात जाऊन शर्यतीत धावणाऱ्या बैलांची खरेदी करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -