Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीभाजप नेत्यांवर खोटे आरोप करणाऱ्या घोटाळेबाज शिशिर धारकरला पेणच्या रस्त्यांवर फिरू देणार...

भाजप नेत्यांवर खोटे आरोप करणाऱ्या घोटाळेबाज शिशिर धारकरला पेणच्या रस्त्यांवर फिरू देणार नाही – गटनेते अनिरुध्द पाटील

यापुढे बदनामी केल्यास धारकरला धडा शिकवणार

पेण : पेण येथे आयोजित उबाठा पक्षाच्या जाहीर सभेत भाजप आमदार रवीशेठ पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्बन बँकेतील मुख्य आरोपी असलेल्या शिशिर धारकरला पेणच्या रस्त्यांवर फिरू देणार नसल्याचा इशारा पेण नगरपालिकेचे माजी गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी दिला. शिशिर धारकर विरोधात लवकरच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अनिरुद्ध पाटील यांनी भाजप पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

भाजप आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील हे अर्बन बँकेचे कधीही सभासद नव्हते. पेण अर्बन बँक प्रकरणातील मुख्य आरोपी शिशिर धारकर याने आमचे नेते आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील याच्यावर जे खोटेनाटे आरोप केले आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत असून असे आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नसून, त्यांना जशास तसे उत्तर देऊन धडा शिकवू असा इशारा यावेळी अनिरुद्ध पाटील यांनी दिला.

सदर पत्रकार परिषदेला अर्बन बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेन जाधव, माजी नगरसेवक शोमेर पेणकर, माजी सभापती परशुराम पाटील, स्वप्नील म्हात्रे, माजी नगरसेवक अजय क्षीरसागर, रविंद्र म्हात्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पेणमध्ये गेल्या अनेक वर्षात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे झाली असून यामुळे विरोधकांच्यात पोटशूळ उठले आहे. गेल्या 12-13 वर्ष राजकरणापासून अलिप्त असलेले पेण बँकेतील मुख्य आरोपी शिशिर धारकर हे स्वतःला नेता म्हणून सिद्ध करण्यासाठी राजकीय व्यासपीठावरून बेछूट आणि खोटे आरोप करून आमच्या नेत्यांची व भाजप पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम करीत आहेत. पेण शहरातील भाजी मार्केट, रिंगरोड, पाणी शुद्धीकरण प्रकल्प ही विकास कामे पारदर्शक पद्धतीने सुरू असून टाऊन प्लॅनिंग नुसार आम्ही सत्तेत येण्यापूर्वीच या जमिनीवर आरक्षण टाकले होते. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे पैसे अर्बन बँकेमध्ये बिडविण्याचे काम कोणी केले हे सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे. खोटे बोल पण रेटून बोल अशी शिशिर धारकर याची भूमिका असून शांत असलेला पेण अशांत करण्याचा व पेणकरांना भुलविण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप अनिरुद्ध पाटील यांनी केला.

यावेळी माजी नगरसेवक शोमेर पेणकर यांनी अर्बन बँक सारख्या जिव्हाळ्याचा प्रश्न मेलेला आहे असे विधान ज्या शिशिर धारकर यांनी केलं ते विधान निषेधार्ह असल्याचे सांगितले. पेण अर्बन बँक प्रकरणात माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी अनेक मार्गे संघर्षाची भूमिका घेतली होती, पेण ते मंत्रालय पायी पदयात्रा काढली होती. परंतु ज्या अर्बन बँक प्रकरणात अनेकांचे संसार उध्वस्त केले, ठेवीदारांना देशोधडीला लावले तो शिशिर धारकर आत्ता बढाया मारत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी धारकर बेताल वक्तव्य करीत असून यापुढे आमच्या नेत्यांबद्दल एकही आरोप सहन करणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -