Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणMumbai-Goa highway: भरणे जगबुडी पूल बनतोय अपघातांचा नवा ब्लॅक स्पॉट

Mumbai-Goa highway: भरणे जगबुडी पूल बनतोय अपघातांचा नवा ब्लॅक स्पॉट

तीव्र उतार आणि जोडरस्ता ठरतेय अपघातप्रवण क्षेत्र

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी ते परशुराम घाट या टप्प्यात असणाऱ्या सात ब्लॅक स्पॉटमध्ये आता आणखी अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटची वाढ झाली आहे. महामार्गावरील भरणे नाका, याठिकाणी जगबुडी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आणि तीव्र उतार आणि वक्राकार रस्त्यांमुळे गेल्या काही महिन्यात ११ हून अधिक भीषण अपघात झालेत, तर पाचहून अधिकजणांना याच नव्या पुलावर आपला जीव गमवावा लागला. हा पूल कोणत्याही सुरक्षिततेचा विचार करून बांधला गेला नाही. अपघात कमी होण्याऐवजी अपघात वाढले असल्याचे पुढे येत आहे.

मुंबई – गोवा महामार्ग नव्याने चौपदरीकरण झाल्यानंतर अपघात कमी होतील, अशी अपेक्षा सगळ्यांना होती, मात्र महामार्गाचे कामदेखील विचित्र ·पद्धतीने झाल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. आता महामार्गावरील सात ब्लॅक स्पॉटपैकी भरणे येथील जगबुडी नदीवरचा पूल आणि जोड रस्ता एक अपघातांचा नवीन ब्लॅक स्पॉट झाल्याचे पाहायला मिळते.

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी ते परशुराम घाट या ४४ किलोमीटरच्या अंतरावर एकूण ११ ब्लॅक स्पॉट असल्याचे प्रशासनाने या आधीच सांगितले होते. येथील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाच्यावतीने काही प्रयत्नदेखील करण्यात आले. भोस्ते घाटातील अवघड वळणावर होणाऱ्या सततच्या अपघातामुळे त्या ठिकाणी १५ मोठे मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर एकाच ठिकाणी टाकण्यात आलेले हे गतिरोधक एकमेव उदाहरण आहे.

ब्लास्टिंग करून निर्माण झालेल्या खड्ड्यात सतत अवजड वाहने पडून व पलटी होऊन होणाऱ्या अपघाताच्या ठिकाणी लोखंडी रेलिंग लाऊन त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सूचना फलकदेखील लावण्यात आला आहे. त्याचबरोबर बोरघर खवटी आणि कशेडी घाटातील अवघड वळण आणि अन्य तीन ठिकाणीदेखील सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच त्या ठिकाणी स्पीड लिमिटचे बोर्डदेखील उभे करण्यात आले आहेत. तरीही अपघाताची संख्या वाढतीच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -