Monday, May 6, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गभल्ली भल्ली भावयच्या जल्लोषात साळशी येथे ‘भावई’ उत्सव साजरा

भल्ली भल्ली भावयच्या जल्लोषात साळशी येथे ‘भावई’ उत्सव साजरा

शिरगाव (वार्ताहर) : ढोल ताशाच्या गजरात व भल्ली भल्ली भावयच्या जल्लोषात शिवकालीन परंपरा लाभलेल्या भावई उत्सव देवगड तालुक्यातील साळशी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढ महिन्याच्या कर्क संक्रातीच्या दिवशी भावई उत्सव साजरा करण्यात येतो. सिद्धेश्वर देवालयासमोर भावई देवी असून तिचा उत्सव असतो.

या दिवशी सकाळी भावई देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी गावातून देवीला नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर दुपारी बारा पाच मानकरी ग्रामस्थ एकत्र जमून भावई देवीकडे या उत्सवाची सुरुवात करून पावणाई देवालयासमोर ढोल ताशाच्या गजरात व भल्ली भल्ली भावईच्या जल्लोषात भावई खेळतात. यामध्ये लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी होतात. यावेळी एकमेकास चिखल लावला जातो. तसेच होळदेव (मोठा दगड) दोन्ही हाताची योग्य पकड देऊन वर उचलून शक्ती प्रदर्शन केले जाते.

जमिनीत पुरण्यात आलेला नारळ काढताना चढाओढ

त्यानंतर जमिनीत (चिखलात) पुरण्यात आलेला नारळ हस्त कौशल्याने काढण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतात. त्याला सापड खेळणे असे म्हणतात. त्यानंतर सर्वजण चौऱ्याऐंशीच्या चाळ्यावर जाऊन नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा सर्वजण पावणाई देवालयासमोर एकत्र येऊन काल्पनिक शिकारीचा खेळ खेळतात.

त्यानंतर शिवकला (अवसर) काढण्याची कला सादर करतात. या शिवकलेकडे शिकार मानवून शिकारीचे मुंडके (प्रतिकात्मक अभ्यासात टाळ) ढोल ताशाच्या गजरात मिराशी कुटुंबीयांकडे नेला जातो, तिथे त्याची पूजा करून भोजनाचा कार्यक्रम होतो. या उत्सवापासून पावणाई देवीच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात होते. या दिवशीच्या आदल्या दिवशी सायंकाळी देसरुढ काढण्यात येते. शेती हंगाम असून देखील शेतकऱ्यांना विरंगुळा व आनंद देणारा भावई उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -