Tuesday, May 7, 2024
HomeदेशVideo : ७० वर्षांनंतर चित्त्यांचे भारतात आगमन

Video : ७० वर्षांनंतर चित्त्यांचे भारतात आगमन

पंतप्रधान मोदींनी कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांना सोडले

ग्वालियर : भारताची ७० वर्षांची प्रतीक्षा आज संपली. नामिबियातील आठ चित्त्यांनी भारतीय भूमीवर पहिले पाऊल ठेवले. विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसही आहे. हा दुग्धशर्करा योग साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये बॉक्स उघडून क्वारंटाइन एनक्लोजरमध्ये तीन चित्ते सोडले.

येथे पंतप्रधानांसाठी १० फूट उंच मंच बांधण्यात आले होते. या मंचाखाली पिंजऱ्यात चित्ते होते. पंतप्रधानांनी लीव्हरद्वारे बॉक्स उघडला. चित्ते बाहेर येताच अनोळखी जंगलात थोडे थबकलेही. इकडे तिकडे नजर फिरवली आणि चालू लागले. लांबच्या प्रवासाचा थकवा स्पष्ट दिसत होता.

चित्ते बाहेर येताच पीएम मोदींनी टाळ्या वाजवून चित्त्यांचे स्वागत केले. मोदींनी काही फोटोही क्लिक केले. ५०० मीटर चालत मोदी स्टेजवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान होते. चित्ता मित्र टीमच्या सदस्यांशीही पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाचे आभारही मानले. ते म्हणाले- आम्ही तो काळही पाहिला, जेव्हा निसर्गाचे शोषण हे सत्तेचे प्रतीक मानले जात असे. १९४७ मध्ये देशात फक्त तीन चित्ते शिल्लक असताना त्यांचीही शिकार करण्यात आली. हे दुर्दैवं आहे की, १९५२ मध्ये आपण चित्ता नामशेष घोषित केले, परंतु त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक दशके सार्थक प्रयत्न केले गेले नाहीत. आज स्वातंत्र्याच्या अमृत काळात आता देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होऊ लागले आहे, असे ते म्हणाले.

राजकीय दृष्टिकोनातून कोणीही महत्त्व देत नसलेल्या अशा कामामागे आम्ही अनेक वर्षे ऊर्जा खर्च केली. चित्ता कृती योजना तयार केली. आमच्या शास्त्रज्ञांनी नामिबियातील तज्ञांसोबत काम केले. देशभरातील वैज्ञानिक सर्वेक्षणानंतर नॅशनल कुनो पार्कची शुभारंभासाठी निवड करण्यात आली.

कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते पुन्हा धावतील. येत्या काळात येथे इको टुरिझम वाढणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी वाढतील. आज मी तमाम देशवासियांना विनंती करू इच्छितो की, कुनोमध्ये चित्ता पाहण्यासाठी काही महिने धीर धरावा लागेल. ते नवीन घरात आले आहेत.

आज हे चित्ते पाहुणे बनून आले, या परिसराची त्यांना माहिती नाही. कुनोला हे चित्ते त्यांचे घर मानू शकतील यासाठी आपल्याला त्यांना काही महिने द्यावे लागतील. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारत या चित्त्यांनी येथे राहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

शनिवारी सकाळी ७.५५ वाजता नामिबियाहून विशेष चार्टर्ड कार्गो विमानाने ८ चित्ते भारतात आणले. २४ जणांच्या टीमसह चित्ते ग्वाल्हेर एअरबेसवर उतरले. येथे त्यांची नियमित तपासणी झाली. नामिबियाचे पशुवैद्यकीय डॉक्टर अॅना बुस्टो याही चित्त्यांसोबत आल्या आहेत. नामिबियातून खास प्रकारच्या पिंजऱ्यात चित्ते आणण्यात आले. या लाकडी पिंजऱ्यांमध्ये हवेसाठी अनेक गोलाकार छिद्रे आहेत. चिनूक हेलिकॉप्टरने ग्वाल्हेर एअरबेसवरून चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले.

कुनोला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानाने दिल्लीहून ग्वाल्हेरला पोहोचले. येथे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, मध्यप्रदेशसाठी यापेक्षा मोठी भेट नाही. देशातून चित्ते नामशेष झाले होते आणि त्यांचे पुनर्वसन हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या शतकातील ही सर्वात मोठी वन्यजीव घटना आहे. यामुळे मध्य प्रदेशातील पर्यटनाला झपाट्याने चालना मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -