Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीपेण मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केलेला आरोपी आदेश पाटीलला जन्मठेपेची...

पेण मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केलेला आरोपी आदेश पाटीलला जन्मठेपेची शिक्षा

पेण : तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तीला ठार मारले प्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी बुधवारी महत्वपुर्ण निकाल देत आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ याडी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सदर खटल्यात ॲड. उज्वल निकम, विशेष शासकीय अभियोक्ता, महाराष्ट्र शासन यांनी सरकार पक्षातर्फे कोर्टासमोर प्रभावी युक्तिवाद केला.

युक्तिवादामध्ये सरकारपक्षाने आरोपींच्या गुन्हयांचा पुर्वइतिहास कोर्टासमोर सादर केला. तसेच आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील आरोपीच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा नसल्याने आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी असे प्रतिपादन केले.

सदर खटल्यातील आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ याडी याच्यावर भा.द.वि. ३७६ (आय) (जे), ३७६ (अ), ३७६ (अ) (ब), ३७७, ३०२, ३६३, ३६६ (अ), २०१, ४५०, ४५५, ७५ सह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम सन २०१२ चे कलम ४, ५ (जे) (चार), ५ (एम), ६, ८, १२ सह अ.जा.ज.अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ३ (१) (डब्ल्यु) (१) (२), ३ (२) (व्हि) या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यातील भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे तसेच भा.द.वि. कलम ३७६ (अ), ३७६ (अ) (ब), सह पोक्सो कायदा कलम ५ (एम) सह ६ प्रमाणे मा.न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तीला जिवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस दोषी पकडून जन्मठेपेची शिक्षा व रक्कम रुपये ५,०००/- द्रव्यदंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच भा.द.वि. कलम ३६३ व ४५५ प्रमाणे दोन वर्षांची शिक्षा व रक्कम रुपये १,०००/- द्रव्यदंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

सदरचा गुन्हा हा मौजे पांचोळा आदिवासीवाडी वडगाव, प्रायव्हेट हायस्कुलचे बाजुला, ता. पेण गावचे हद्दीत दिनांक २९/१२/२०२० ते ३०/१२/२०२० रोजीचे दरम्यान घडला होता. यातील पुर्वदोषसिध्दी झालेला आरोपी आदेश मधुकर पाटील याने फिर्यादी व त्यांची ०३ वर्षे वयाची पणती (पिडीत मुलगी) हे आदिवासी कातकरी या मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याचे माहित असतानाही त्याने तिच्यावर बलात्कार करण्याच्या तयारीनिशी व उद्देशाने घरात अनधिकृत प्रवेश करुन ०३ वर्षे वयाची पिडीत मुलगी ही तिच्या वडीलांच्या सोबत घरात झोपलेली असताना तीला तिच्या वडीलांच्या कायदेशीर रखवालीतुन घरातुन घेवून जावून ती ०३ वर्षे वयाची व संमती देण्यास असमर्थ असल्याचे माहीत असतानाही तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या बलात्कार करुन तीला जिवे ठार मारले होते हे न्यायालयासमोर सिध्द झाले आहे.

या प्रकरणातील फिर्यादी यांनी पेण पोलीस स्टेशनला तकार नोंदविली असता, या प्रकरणी सदर केसचा पेण उप विभागीय पोलीस अधिकारी व्ही. व्ही. चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करुन मोलाचे सहकार्य केले होते. सदर खटल्यात महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त विशेष शासकीय अभियोक्ता ॲड. उज्वल निकम, यांनी एकूण २६ साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला. यामध्ये अति.सरकारी वकील ॲड भुषण साळवी यांनी सहाय्यक म्हणुन काम पाहिले. त्यामध्ये फिर्यादी, या प्रकरणातील साक्षीदार, तपासिक अंमलदार यांची साक्ष कोर्टासमोर महत्वपूर्ण ठरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -