Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्ससफाई कामगार हा देवदूत असतो

सफाई कामगार हा देवदूत असतो

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल

जितेंद्र बर्डे मुळात धुळ्याचा, पिंपळनेर त्याचे गाव. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर पब्लिक स्कूल नवोदय विद्यालय व विद्यानंद हायस्कूल येथे त्याचे शालेय शिक्षण झाले. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून तो स्टेजवर जाऊ लागला. त्याचे आजोबा कीर्तन करायचे व सोबतीला त्याला देखील न्यायचे. तो गाणी, आरती म्हणायचा, तुकारामाच्या अभंगवर काही ॲक्टिंग सादर करायचा. त्यामुळे त्याला कधीच स्टेजची भीती वाटली नाही. हळूहळू त्याचा कल नृत्याकडे गेला. तो मिमिक्री करू लागला. तो स्टेज शो करू लागला. दहावी झाल्यानंतर तो नाशिकला, जळगांवला गेला. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस घेऊ लागला. अकरावीत असताना एका स्पर्धेच्या दरम्यान नाशिकला बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्याची भेट झाली. त्यांनी जितेंद्रला सांगितले की, शास्त्रीय नृत्य शिकून घे. नंतर तो पुण्याला आला तेथे कथक नृत्य शिकला. पंडित बिरजू महाराजांची कार्यशाळा केली. नंतर पुण्यातील काही नाट्य मंडळी ओळखीचे झाले. पु. ल. देशपांडे ही एकांकिका केली. एकपात्री नाटक केले. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘गांधी ते गोध्रा’ हे पहिले व्यावसायिक नाटक त्याने केले. त्यात अभिनेते अशोक समर्थ होते. त्यानंतर सतीश तारे सोबत ‘डोम कावळे’ हे नाटक केले. त्याने ‘को-ब्लफ मास्टर’ हे नाटक त्याने केले. त्यामध्ये प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी त्याचा मेकअप केला होता. त्यात त्याची तिहेरी भूमिका होती. त्यानंतर काही चॅनेलमध्ये त्याने कामे केली. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर त्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून वर्किंग देखावे तयार करण्याच्या ऑर्डर घेतल्या. लग्नानंतर त्याने ‘कसाबसा’हे नाटक केले. त्यामध्ये अतिरेकी कसाबची भूमिका त्याने केली. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी सईद हाफिझची भूमिका केली. प्रदीप पटवर्धननी कसाबच्या वडिलांची भूमिका केली. ‘बंदीशाळा’ चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये त्याने काम केले.

२०१२ मध्ये अभिनेता आमिर खानच्या सत्यमेव जयते मालिकेमध्ये सफाई कामगारांवर पूर्ण एपिसोड दाखविला गेला. यानंतर त्याने स्वतःची निर्मिती संस्था उभारली. सफाई कामगारांवर अभ्यास करून स्क्रिप्ट तयार केली. ‘मोऱ्या’ चित्रपटाची निर्मिती करण्याचे त्याने ठरविले. त्यामध्ये मुख्य भूमिका त्याने साकारली आहे. सफाई कामगार ते सरपंच असा त्याचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. सफाई कामगारांच्या भूमिकेसाठी कोणताही कलाकार तयार होत नव्हता. दाढी वाढविण्याची वेशभूषा करण्यास कोणीही तयार होत नव्हते. शेवटी नाईलाज म्हणून त्याने स्वतः ती भूमिका करण्याचे ठरविले. जवळ जवळ दीड वर्षे दाढी वाढवली. डोक्यावरचे केस वाढवले. ४० ते ४५ दिवस त्याने चेहऱ्याला, डोक्याला पाणी लावले नाही. सफाई कामगाराचे चालणे, बोलणे त्याने आत्मसात केले. सफाई कामगार हा देवदूत असतो. परिसरात झालेला कचरा उचलण्याचे महत्त्वाचे काम तो करीत असतो; परंतु समाजाकडून त्याला तुच्छतेची वागणूक मिळते. आपल्याकडे दोनच सैनिक असतात. एक सीमारेषेवर लढणारे सैनिक व दुसरे सफाई कामगार हे देखील सैनिकच आहेत. गावातील घाण तो साफ करतो. त्याच्यामुळे आपण स्वच्छ राहू शकतो; परंतु आजही काही गावागावांमध्ये जातीयवाद फोफावलेला आपल्याला आढळून येतो. गावामध्ये सफाई कामगाराशी नीट बोलले जात नाही. त्याला वाळीत टाकले जाते.

या चित्रपटांत गावचा सफाई कामगार ते सरपंच असा प्रवास दाखविलेला आहे. तो सरपंच कसा होतो? सरपंच झाल्यानंतर त्याची परिस्थिती बदलते की, तशीच राहते हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे. या चित्रपटात मुख्य शीर्षक भूमिका व दिग्दर्शनाची धुरा त्याने सांभाळलेली आहे. या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावलेली आहे. आतापर्यंत या चित्रपटाला ३५ पारितोषिकं प्राप्त झालेली आहेत. बार्सिलोना येथे साडेआठ हजार चित्रपटांतून या चित्रपटाचा प्रथम क्रमांक आला होता. लंडन येथे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेथील प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला होता. हा चित्रपट मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित झाला आहे. जितेंद्र बेर्डे व या चित्रपटाच्या यशाची पताका अशीच फडकत राहू दे, अशी मनोमन इच्छा आहे. त्यांना हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -