Friday, May 3, 2024
Homeकोकणरायगडकर्जत विठ्ठल मंदिराच्या परिसरात आढळला नवीन शिलालेख

कर्जत विठ्ठल मंदिराच्या परिसरात आढळला नवीन शिलालेख

मंदिर पंचायतनाच्या इतिहासात नव्याने भर

ज्योती जाधव

कर्जत : कर्जत शहरातील दहिवली येथील प्राचीन विठ्ठल मंदिराच्या तटबंदीच्या आत नवीन शिलालेख असल्याचा शोध प्रबंधक सागर माधुरी मधुकर सुर्वे यांनी लावला आहे. या शिलालेखामुळे मंदिर पंचायतनाच्या इतिहासात नव्याने भर पडली असून विठ्ठल मंदिरातील शिलालेखांची संख्या आता दोन झाली आहे.

कर्जत पर्यटकांसाठी फार्म हाऊस सिटी तर इतिहास वेड्यांसाठी ऐतिहासिक पाऊलखुणा जपणारे गाव. या कर्जत तालुक्यात सातवाहनकालीन लेणी व व्यापारी घाटवाटा, शिवकालीन गडकिल्ले आणि मराठेशाहीतील पेशव्यांनी उभी केलेली मंदिरे आहेत. कर्जत तालुक्यात जशी शिलाहारकालीन गावे आहेत, तसे पेशव्यांनी सुभेदार पदावर नेमलेल्या पिंपुटकरांनी व्यापक रूप दिलेले दहिवली गाव आहे. याच गावामध्ये उल्हास नदीच्या काठावरील एकमेव मंदिर पंचायतन उभे आहे.

विठ्ठल मंदिराला चहुबाजूंनी तटबंदी असून आतमध्ये जायला एकच पण भव्य असे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे, तर तटबंदीच्या आतमध्ये विठ्ठल मंदिराच्या बाजूला श्रीरामाचे मंदिर व दुसऱ्या बाजूला श्रीरामाची धर्मशाळा आहे. इथेच सागर सुर्वे यांना एक शिलालेख आढळला. तटबंदीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूला तटबंदीमध्येच पार्वतीबाई पिंपळवटकर यांच्या नावाचा शिलालेख आहेच, पण धर्मशाळा जिथे बांधली गेली तिथे दुसरा शिलालेख गाडला गेला होता. नवीन बांधकामाच्या वेळी तो संस्थानाचे सदस्य मुकुंद मोगरे यांना दिसून आला.

सदर शिलालेखातील व्यक्तीचे नाव त्रिंबक गोपाळशेठ पोतदार असे असून त्यांचा सोन्याचे दागिने घडवण्याचा व्यापार होता, ते सोनार होते तसेच श्रीरामाचे निस्सीम भक्त होते, त्यांनी त्या काळात ३४ रुपये धाऱ्याची जमीन श्रीरामाच्या उत्सवाकरीता दिली होती, ज्याची नोंद देवळाच्या कागदपत्रांमध्ये आहे. तसेच यांनी शके १८१६ म्हणजे इस १८९४ मध्ये सुमारे १००० रुपये खर्च केले, असे देवळाच्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेले आहे. त्यामध्ये त्यांनी प्रवेशद्वारावरील नगारखाना, रामाची धर्मशाळा व तटबंदीच्या आतील दोन दगडी तुळशी वृंदावने इ वास्तू बांधल्याची नोंद आहे. सदर शिलालेखात त्यांचे नाव, राहण्याचे ठिकाण व साल नोंदवलेले आहे. या शिलालेखामुळे मंदिर पंचायतनाच्या इतिहासात नव्याने भर पडली असून विठ्ठल मंदिरातील शिलालेखांची संख्या आता दोन झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -