Sunday, April 28, 2024
Homeमहत्वाची बातमीतुकाराम सुपेंकडे आज पुन्हा ३३ लाख सापडले

तुकाराम सुपेंकडे आज पुन्हा ३३ लाख सापडले

आतापर्यंत एकूण ३ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : टीईटी परीक्षा पेपरफुटीत अटक करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडील घबाडचे सत्र काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे. सुपेकडून आज आणखी ३३ लाख रुपये जप्त केले आहेत. आतापर्यंत तुकाराम सुपेकडून पुणे पोलिसांनी तीन कोटी ९० लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत.

तुकाराम सुपेने हे पैसे २०१८ आणि २०१९ च्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारातून जमा केले आहेत. पोलिसांची कारवाई सुरु झाल्यावर सुपेने हे पैसे त्याच्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरी दडवून ठेवले होते. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच सुपेने दडवलेले पैसै बाहेर येत आहेत. तुकाराम सुपेची शिक्षण विभागातील कारकीर्द आधीपासूनच वादग्रस्त राहिली आहे.

२२ तारखेला तुकाराम सुपेंकडे १० लाखांची रोकड मिळाली होती. सुपेंनी ही रोकड जवळच्या व्यक्तीकडे ठेवायला दिली होती. तीच रोकड त्या व्यक्तीने आज पोलिसांच्या स्वाधीन केली. त्याआधी सुपेच्या घरातून १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केली होती. तर पहिल्या धाडीत पोलिसांनी ९० लाखांचे घबाड हस्तगत केले होते. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीने सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले होते. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागले.

म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते की, दोन पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -