Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गुरुवारी रात्री हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ उडालीय. विशेष म्हणजे, गोळीबार करणारा संशयित हा कोळन्हावी गावचा सरपंच असून, तो बियर बारचा मालकही आहे. देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ दोन तरुणांनी रेकॉर्ड केल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर, संबंधित तरुणांना धाक दाखवण्यासाठी सरपंचाने देशी बनावटीच्या कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. रात्रीपासून संशयिताचा शोध घेतल्यानंतर पोलिस पथकाने शुक्रवारी पहाटे त्याला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस आणि गोळीबारानंतरची एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित विकास सोलंके हा कोळन्हावी गावाचा सरपंच असून, त्याच्या मालकीचा बियर बार आहे. गुरुवारी रात्री त्याच्या बियर बारमध्ये देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ त्याच गावातील दोन तरुणांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या कारणावरून त्यांचा विकास सोलंके याच्याशी वाद झाला. वाद वाढल्यानंतर तरुणांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने सोलंके याने देशी बनावटीच्या पिस्तुलातून हवेत गोळी झाडल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
Nashik Crime News : गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या जुन्या वादातून हेमंत सूर्यवंशी (२९, रा. होळी चौक, सुरगाणा) या युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात ...
सुदैवाने गोळीबारात कोणालाही दुखापत नाही
घटनेच्या वेळी संशयित मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबाराची माहिती मिळताच यावल पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. रात्रीपासून त्याचा माग काढत पोलिस पथकाने शुक्रवारी पहाटे त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस तसेच गोळीबारात वापरलेली रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली आहे.
गुन्हा दाखल , तपास सुरु
दरम्यान, पोलिसांच्या तपासात या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संशयित सरपंचाने त्याच्याकडील देशी बनावटीचा कट्टा सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका व्यक्तीकडून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हा कट्टा नेमका कोणाकडून घेतला, तो त्याच्यापर्यंत कसा पोहोचला आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या कट्ट्याचा मागील दुवा पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ तसेच शस्त्र कायद्याच्या कलम ३/२५ आणि ५/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






