Thursday, August 27, 2026

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये बदल होणार आहेत. बँकिंग, कर, एलपीजी गॅस सिलेंडर आणि परदेशी प्रवासाशी संबंधित या नव्या नियमांचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर तसेच बजेटवर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे १ सप्टेंबर उजडण्यापूर्वी या नियमांची माहिती घेऊन आवश्यक कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा नाहक आर्थिक दंड किंवा अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

आयकर विवरणपत्र (ITR) आणि एफडीच्या नियमांत बदल

करदात्यांसाठी आणि व्यवसायिकांसाठी १ सप्टेंबरचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, अशा बिझनेस आणि प्रोफेशनल्सना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले आयटीआर (ITR) भरणे अनिवार्य आहे. ५० लाखांपर्यंत उत्पन्न असणारे आणि अनुमानित कर योजनेचा (Presumptive Tax Scheme) लाभ घेणारे व्यापारी ITR-4 (सुगम) भरू शकतात. तर एफ अँड ओ (F&O) ट्रेडिंग करणारे किंवा ५० लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ITR-3 फॉर्म भरावा लागेल. दुसरीकडे, बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठ्या एफडीबाबत (FD) नवीन सूचना दिल्या आहेत. ₹३ कोटी किंवा त्याहून अधिकच्या ठेवींवर रोज सकाळी १०:१० पर्यंत सर्व बँकांना त्यांच्या संकेतस्थळावर एक समान व्याजदर जाहीर करावा लागेल. एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये समान रकमेवर वेगवेगळे व्याजदर देण्याची पद्धत बंद होणार असून हे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून पूर्णपणे लागू होतील.

गॅस सिलेंडरची ई-केवायसी आणि दरांमधील संभाव्य बदल

घरगुती स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ३१ ऑगस्ट ही अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप आपल्या एलपीजी (LPG) कनेक्शनची ई-केवायसी किंवा आधार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून ही सेवा बंद झाल्यास किंवा केवायसी प्रक्रियेअभावी ग्राहकांना व्यावसायिक दराने गॅस खरेदी करावा लागू शकतो आणि सवलतीचा दर मिळणार नाही. इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएलने यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. याशिवाय, दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे १ सप्टेंबरला एलपीजी सिलेंडर आणि एटीएफच्या (ATF) दरांचा पुनढावा घेतला जाईल, ज्यामुळे किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिलासा आणि एटीएम शुल्काचे संकेत

परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी १ सप्टेंबरपासून एक अत्यंत दिलासादायक निर्णय लागू होत आहे. आता आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील इमिग्रेशन काउंटरवर बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का (Stamp) मारण्याची गरज उरणार नाही. प्रवासी त्यांच्या मोबाईलमधील डिजिटल बोर्डिंग पास किंवा प्रिंटेड प्रत दाखवून थेट प्रवास करू शकतील. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि इमिग्रेशन प्रक्रिया अधिक वेगवान होईल. तसेच, नवीन महिन्यात बँक एटीएमच्या (ATM) सेवा शुल्कात आणि एफडीच्या व्याजदरांमध्येही सुधारणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीलाच या आर्थिक बदलांची नोंद घेणे फायदेशीर ठरेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >