Thursday, August 27, 2026

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

माविम आणि उमेद संस्थेच्या ‘लाडक्या बहिणीं’सोबत नंदनवनमध्ये रक्षाबंधन

महिलांच्या प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याचे शिंदेंचे आश्वासन

मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून मुंबईत आलेल्या माविम आणि उमेद संस्थेच्या महिला प्रतिनिधींसोबत नंदनवन निवासस्थानी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याची ग्वाही दिली. महिलांनी दिलेल्या विश्वासाची विकासकामांतून परतफेड करण्याचा शब्द देत, “मी जे बोलतो ते करतो आणि जे होणार नाही ते बोलत नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 232 आमदारांचा ऐतिहासिक विजय मिळाला. या विजयात महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत शिंदे यांनी महिला बचतगटांच्या संघटनशक्तीचे कौतुक केले. माविम आणि उमेदच्या माध्यमातून लाखो महिला जोडल्या गेल्या असून त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवरही शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. प्रभाग समन्वयक आणि सपोर्ट स्टाफच्या बदल्या, सीआरपींसाठी मोबाईल सुविधा, ऑनलाइन कामातील अडचणी तसेच प्रत्येक क्लस्टरला बचतगट भवन उभारण्याच्या मागणीवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिलांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री असताना महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा घेताना शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींसाठी 100 टक्के मोफत उच्च व व्यावसायिक शिक्षण, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, अन्नपूर्णा योजना, महिला स्टार्टअप योजना आणि महिला वसतिगृहांबरोबरच बचतगटांचा रिव्हॉल्विंग फंड 15 हजारांवरून 30 हजार रुपये केल्याचा उल्लेख केला.

माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अभियानांतर्गत तीन कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून हे अभियान पुन्हा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना शेतकरी म्हणून दर्जा देण्याचा निर्णय तसेच कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्यासंदर्भातील निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशी विविध पदे भूषवली असली तरी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी दिलेली ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ’ ही ओळख आपल्यासाठी सर्वांत मोठी असल्याचे शिंदे म्हणाले.रक्षाबंधनाचा हा सोहळा केवळ स्नेहबंधाचा उत्सव न राहता महिलांनी दिलेल्या विश्वासाला विकासाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याचा संवाद ठरला. याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, शिवसेना नेत्या शायना एनसी, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे , प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >