Saturday, August 22, 2026

दाद

दाद

- संवाद, निशा वर्तक

आई... डोळे बंद कर!” दहा वर्षांची सई दोन्ही हात पाठीमागे लपवून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता होती. आज आईचा वाढदिवस होता. गेल्या आठवडाभरापासून तिने रंगीत कागद, चमकी, रंगीत पेन्सिली जमवून स्वतःच्या हाताने एक सुंदर शुभेच्छापत्र तयार केलं होतं. दुकानातून आणलेलं नव्हे, तर तिच्या निरागस मनातून उमललेलं. आईने घाईघाईने डोळे उघडले. “हे बघ! तुझ्यासाठी!” आईने कार्ड हातात घेतलं. त्यावर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं - “माझी आई जगातली सर्वात छान आई आहे!” पण त्या क्षणी आईची नजर कार्डावर नव्हती; घड्याळावर होती.ऑफिसला उशीर होत होता. “खूप छान गं... संध्याकाळी निवांत बघते,” एवढं म्हणत तिने कार्ड टेबलावर ठेवलं आणि ती निघून गेली. सई काही क्षण कार्डाकडे पाहत राहिली... संध्याकाळ झाली... आई आली... घरकाम, फोन, स्वयंपाक, पाहुणे... आणि त्या सगळ्या गडबडीत ते कार्ड कागदांच्या ढिगाऱ्याखाली हरवून गेलं. दोन दिवसांनी आवराआवर करताना आईला ते सापडलं. तिने अलगद उघडलं... आत एक छोटासा कागद होता. त्यावर सईने लिहिलं होतं - “आई, तू हसशील म्हणून मी हे कार्ड बनवलं होतं... पण तू ते नीट पाहिलंच नाहीस...”आईच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं. तिला त्या दिवशी एक गोष्ट उमगली... मुलांना महागड्या भेटवस्तूंपेक्षा त्यांच्या प्रयत्नांची घेतलेली दखल जास्त महत्त्वाची वाटते.

दाद... हा शब्द छोटा आहे; पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. दाद म्हणजे केवळ टाळ्या नाहीत. ती एखाद्याच्या प्रयत्नांना दिलेली मनापासूनची पोहोचपावती असते. ती सांगत असते - ‘‘मी तुला पाहिलं आहे... तुझे प्रयत्न माझ्या लक्षात आले आहेत... आणि ते माझ्यासाठी मौल्यवान आहेत.” जगात असा एकही माणूस नाही, ज्याला कौतुकाची आस नसते. पहिलं पाऊल टाकणारं बाळ आईकडे पाहतं... पहिलं अक्षर लिहिणारं मूल बाबांकडे पाहतं... शाळेत कविता म्हणणारा विद्यार्थी शिक्षकांच्या चेहऱ्यावरचं हसू शोधतो... पहिली पोळी करणारी मुलगी आईच्या डोळ्यांतील समाधान शोधते... पहिला लेख लिहिणारा लेखक वाचकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो... रंगमंचावर उभा असलेला कलाकार टाळ्यांच्या आवाजासाठी जगतो... कारण दाद ही माणसाची भावनिक भूक आहे. दुर्दैवाने आपण ही भूक अनेकदा ओळखतच नाही. आपण मुलांना महागडे कपडे देतो, खेळणी देतो, मोबाईल देतो; पण “शाब्बास!” हा शब्द देण्यात मात्र कंजूषी करतो. त्यांच्या चुका लगेच दिसतात; पण प्रयत्न दिसत नाहीत. “इतकंच?” “अजून चांगलं करता आलं असतं.” “त्याने बघ, किती छान केलंय!” अशी वाक्यं नकळत मुलांच्या मनावर ओरखडे उमटवत जातात आणि मग... ते चित्र काढणं कमी करतात... गाणं म्हणणं थांबवतात... स्पर्धांमध्ये भाग घेणं सोडून देतात... कारण त्यांना वाटू लागतं - “मी कितीही केलं तरी कुणालाच त्याचं काही वाटत नाही.” न्यूनगंडाची बीजं इथेच रुजतात. आत्मविश्वास इथेच ढासळायला सुरुवात होते. याहून मोठं नुकसान कोणतं? हेच फक्त मुलांच्या बाबतीत घडतं असं नाही. माझ्या बाबतीत असेच काहीसे पण थोडे वेगळे घडले होते. मी शाळेत असल्यापासून काही तरी लिहायची मला सवय होती, पण माझ्या भित्र्या आणि लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे मी ते कधीच कुणाला दाखवले नाही. पण एके दिवशी उशिरा का असेना एका कौतुक करणाऱ्याच्या नजरेस पडले आणि माझ्या आयुष्यात आनंद आला. मी स्वतःला काही मोठी साहित्यिक वगैरे बिलकुल समजत नाही पण माझ्या कथा, कविता, लेख दिवाळी अंकात, वर्तमानपत्रात येऊ लागले आणि माझा आत्मविश्वास दुणावला. मला हुरूप आला, मी आणखी लिहू लागले, माझा आनंद मला मिळाला. कुणी तरी कौतुक केले, दाद दिल्यामुळे हे घडून आले.

दाद न देण्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतच असतात. जसे घरात आई, पत्नी रोज स्वयंपाक करते. अगदी जीव ओतून आणि तिच्या हातचं जेवण आपण गप्पच खातो काही न बोलता... ‘खूप छान झाले आहे, आज मस्तच झाले’ अशी काही तरी अपेक्षा तिची असते पण हे सहसा होतच नाही! हा तर माझाही अनुभव आहे. मीठ जरा कमी-जास्त झालं, तर लगेच मात्र बोलतात. वडील आयुष्यभर कष्ट करतात. त्यांच्या त्यागाची दखल आपण अनेकदा त्यांच्या निवृत्तीनंतरही घेत नाही. पत्नी दिवसभर घर आणि नोकरी सांभाळते. तिच्या श्रमांपेक्षा तिच्या चुका अधिक दिसतात. पती रात्रंदिवस धडपडत असतो; पण त्याच्या प्रयत्नांपेक्षा त्याच्या अपयशावरच चर्चा होते. आपण प्रेम करतो... पण ते व्यक्त करत नाही. आपण अभिमान बाळगतो...पण तो सांगत नाही. आपण कृतज्ञ असतो... पण “धन्यवाद” म्हणायला विसरतो.आणि हळूहळू...माणसं बोलणं कमी करतात. हसणं कमी करतात. प्रयत्न करणं कमी करतात. बाहेरून ती जिवंत दिसतात; पण आतून कोमेजत जातात. कौतुक न मिळाल्यामुळे कोणी मरत नाही... पण अनेकांची स्वप्नं मरतात. अनेकांचा आत्मविश्वास मरतो. अनेक नाती हळूहळू निस्तेज होतात. म्हणूनच दाद देताना हात आखडता घेऊ नका. मात्र ती दाद खरी असावी. खोटी स्तुती नव्हे, तर मनापासूनची दखल असावी. कधी मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवा आणि म्हणा, “शाब्बास!” आईला सांगा, “तुझ्या हातच्या जेवणाची चव अजून कुणालाच जमली नाही.” वडिलांना म्हणा, “तुमच्या कष्टांमुळेच आम्ही उभे आहोत.” जोडीदाराला सांगा, “तू आहेस म्हणून आयुष्य सुसह्य आहे.” विश्वास ठेवा... ही वाक्यं ऐकण्यासाठी कदाचित ते कित्येक वर्षे वाट पाहत असतील. कौतुक करणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. त्यासाठी मोठं मन लागतं. अहंकारापेक्षा प्रेम मोठं असावं लागतं. मत्सरापेक्षा माणुसकी मोठी असावी लागते.

आज घरात गेल्यावर एक छोटासा प्रयोग करून पाहा. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं एक तरी मनापासून कौतुक करा. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद निरखून पाहा. तुम्हाला जाणवेल — कौतुकाने केवळ ओठांवर हास्य येत नाही...ते मनाला जगण्याची नवी उमेद देतं. ते आत्मविश्वासाला नवे पंख देतं. ते तुटलेल्या नात्यांवर अलगद फुंकर घालतं. आणि कधी कधी... एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. म्हणून... दाद देण्यास कधीही उशीर करू नका. कारण— वेळीच मिळालेली दाद आयुष्य घडवते... आणि उशिरा मिळालेली दाद अनेकदा फक्त श्रद्धांजली ठरते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणायचे, “महान शिक्षक केवळ धडा शिकवत नाहीत; ते विद्यार्थ्यांच्या मनात स्वतःवर विश्वास निर्माण करतात.” त्यांच्या शिक्षकांनी दिलेली दाद आणि प्रोत्साहन यामुळेच एका छोट्याशा गावातील मुलाने आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. एका “शाबास”मध्ये किती मोठी शक्ती दडलेली असते, याचा हा जिवंत पुरावा आहे. कौतुकाचे दोन शब्द उच्चारायला दोन क्षण लागतात; पण ते एखाद्याच्या आयुष्यात आयुष्यभरासाठी प्रकाश पेरून जातात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा