Saturday, August 22, 2026

सुसंगती सदा घडो...

सुसंगती सदा घडो...

- मनस्वीनी, पूर्णिमा शिंदे

मित्रांनो, शाळेच्या फळ्यावर लिहिलेले ‘सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो’ हे वाक्य तुमच्या-आमच्या मनावर कायमचे कोरलेले आहे. सुसंगती म्हणजे आपली संगत चांगली असणे. आपल्या संगतीवरून आपली परीक्षा, दिशा आणि भवितव्य ठरत असते. सहवासाचा परिणाम माणसाच्या जीवनावर किती मोठा होऊ शकतो, याचे सुरेख उदाहरण आचार्य विनोबा भावे यांनी दिले आहे. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर पडला, तर तो पिण्यायोग्य असतो. मात्र तोच थेंब गटारात पडला, तर त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही उपयोगाचा राहत नाही. तोच थेंब गरम तव्यावर पडला, तर त्याचे अस्तित्वच संपून जाते. कमळाच्या पानावर पडला, तर मोत्यासारखा चमचमतो आणि शिंपल्यात पडला, तर त्याचा मोती होतो. थेंब तोच; पण तो कुणाच्या सहवासात आला, यावर त्याचे अस्तित्व, प्रतिष्ठा आणि पुढील प्रवास अवलंबून असतो. आपल्या जीवनाचेही तसेच आहे. तांदूळ आणि हळदीकुंकू एकत्र केले की ते देवावर वाहिले जाते आणि अक्षता म्हणून वापरले जाते. पण त्याच तांदळाची डाळीसोबत संगत झाली की त्याची खिचडी होते. चंदनाच्या झाडाचा सुवास शेजारच्या झाडांनाही दरवळतो. दुसरीकडे, केळीच्या झाडाला बाभळीचे काटे वाऱ्याच्या मंद झुळकीसोबत टोचत राहतात. हाच संगतीचा परिणाम!

जोपर्यंत वाल्या कोळ्याला नारदमुनींची भेट झाली नव्हती, तोपर्यंत त्याचे जीवन गुन्हेगारीच्या अंधारात होते. नारदमुनींच्या सहवासाने त्याच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली. ‘राम’ म्हणता न आल्याने ‘मरा-मरा’ म्हणत त्याचा रामनामाचा जप झाला आणि पुढे तोच वाल्या कोळी वाल्मीकी ऋषी झाला. संगती माणसाचे जीवन किती बदलू शकते, याचे यापेक्षा सुंदर उदाहरण कोणते असावे? इतिहास आणि पुराणकथांमध्येही सुसंगतीची अनेक उदाहरणे आहेत. श्रीकृष्ण-सुदामा, श्रीकृष्ण-अर्जुन, प्रभू राम-हनुमान आणि प्रभू राम-शबरी यांचा सहवास जीवनाला दिशा देणारा ठरला. रामायणातील खारुताईची कथाही प्रेरणादायी आहे. वानरसेनेसोबत समुद्रावर पूल बांधण्याच्या कामात इवलीशी खारुताईही सहभागी झाली. आपल्या छोट्याशा क्षमतेनुसार तिने योगदान दिले. तिचे कार्य लहान असले तरी त्यामागची भावना मोठी होती. अशीच एक कथा चिमणीची आहे. जंगलाला आग लागली असताना चिमणी आपल्या इवल्याशा चोचीत पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करत होती. तिला पाहून इतरांनी तिची थट्टा केली. ‘तुझी एवढीशी चोच, तू काय आग विझवणार?’ असे तिला विचारण्यात आले. त्यावर चिमणीने दिलेले उत्तर मनाला भिडणारे आहे. ती म्हणाली, ‘उद्या इतिहासात कोणी विचारले तर चिमणी आग विझविण्याच्या प्रयत्नात होती, आग लावण्यात नव्हती, एवढे तरी सांगता येईल.’

आपली कर्मे आणि आपली ओळख कोणत्या संगतीत आपण राहतो, यावरही अवलंबून असतात. चुकीच्या संगतीमुळे माणूस सुपारी, मावा, गुटखा, तंबाखू, गांजा, दारू, जुगार, सिगारेट अशा व्यसनांच्या आहारी जाऊ शकतो. गुंडगिरी आणि भ्रष्टाचारासारख्या प्रवृत्तींच्या संगतीत राहिल्यास त्याच प्रवृत्ती जीवनाचा भाग बनण्याचा धोका असतो. आज बेरोजगारी आणि ताणतणावाचा प्रश्न गंभीर आहे. या तणावातून काही युवक नशेचा आधार घेतात. त्यातून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याबरोबरच आई-वडील, पत्नी आणि मुलांच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो. लक्षात ठेवा, नशेचा एक घोट ताण कमी करत नाही; उलट तो संपूर्ण कुटुंबाच्या सुखाला गिळंकृत करू शकतो. म्हणूनच अशा लोकांच्या संगतीत राहा, जिथे तुमच्या ज्ञानात आणि माहितीत भर पडेल. तुमची नीतिमूल्ये जपली जातील. तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा मिळेल. सत्संगाचा परिणाम तुमच्या आचार-विचारांवर होईल.

आपली किंमतही आपल्या संगतीवरून ठरते. त्यासाठी सर्वप्रथम स्वतःचा आत्मबोध होणे गरजेचे आहे. आंब्याच्या पेटीत एक आंबा सडका असेल, तर हळूहळू संपूर्ण पेटी खराब होऊ शकते. आपल्या आयुष्याचेही तसेच आहे. आपण कोणाच्या संगतीत राहतो, यावर आपले मोल आणि भवितव्य ठरत असते. मानवाला परमेश्वराने दिलेले सर्वांत मोठे वरदान म्हणजे जीवन. जगता-जगता इतरांचे कल्याण करण्याची शक्ती आपल्यात आहे. जीवनाचे कमळ फुलवायचे असेल, तर कष्टाचा चिखल तुडवावाच लागतो. निःस्वार्थ बुद्धीने इतरांच्या चेहऱ्यावर अश्रू आणायचे की हसू, हे आपणच ठरवायचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार, ताणतणाव आणि प्रतिकूल परिस्थिती येतच असते. मात्र त्यावर नशेचा आधार घेणे हा मार्ग नाही. दगडातून शिल्प घडवताना शिल्पकार नको असलेला भाग काढून टाकतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून दोष दूर करा. चांगल्या गोष्टी स्वीकारा आणि वाईट गोष्टींचा त्याग करा.

केवळ चौदा दिवसांचे आयुष्य असलेले फुलपाखरूही आपले जीवन किती सुंदरपणे जगते! ते निसर्गाच्या सान्निध्यात बेधुंद विहरत असते. निसर्गाकडून आपणही शिकले पाहिजे की जीवन कसे सुंदर करता येते. माणसाच्या आयुष्यात घडायचे की बिघडायचे, यामध्ये संगतीची भूमिका महत्त्वाची असते. संगती जीवनाची दशा बिघडवू शकते किंवा जीवनाला योग्य दिशा देऊ शकते. म्हणून पुन्हा एकदा स्वतःला विचारा - आपण कोणाच्या संगतीत आहोत? जीवनमूल्ये, नैतिकता आणि चांगले विचार यांची साथ घेऊन आयुष्य जगा. महात्मा गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे चांगले ऐका, चांगले बोला आणि चांगले पाहा. शेवटी एवढेच -‘सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.’ आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी संगत लाभो, हीच सदिच्छा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा