Sunday, August 23, 2026

BMC Parks Photography : महापालिकेची उद्याने आता छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून विकसित; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

BMC Parks Photography : महापालिकेची उद्याने आता छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून विकसित; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रमुख सार्वजनिक उद्याने व बागांमध्ये टप्याटप्प्याने आकर्षक सेल्फी पॉईंट, थीम-आधारित सुशोभिकरण व छायाचित्रणासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात करण्यात येईल. तसेच त्याठिकाणी, प्री-वेडिंग शूट, प्री-बेबी शूट, व्यावसायिक फोटोशूट, चित्रिकरण व तत्सम उपक्रमांसाठी पारदर्शक ऑनलाईन परवानगी प्रणाली राबवण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. (BMC Parks Photography)

भाजप नगरसेविका नीलम गुरव यांनी ठरावाच्या सुचेनद्वारे ही मागणी केली होती. यात त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील अनेक सार्वजनिक उद्याने, बागा व हरित क्षेत्रे ही नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. पण, या उद्यानांमध्ये अनेक आकर्षक जागांचा नियोजनबद्ध व महसूलवाढीच्या दृष्टीने पुरेसा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येत आहे असे नमूद केले. (BMC Parks Photography)

सध्या प्री-वेडिंग शूट, प्री-बेबी शूट, वाढदिवस फोटोशूट, कौटुंबिक फोटोशूट, सांस्कृतिक छायाचित्रण व इतर व्यावसायिक छायाचित्रणासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विविध खाजगी ठिकाणांचा वापर केला जातो. महानगरपालिकेने मुंबईतील प्रमुख उद्यानांमध्ये आकर्षक सेल्फी पॉईंट, थीम-आधारित सुशोभीकरण, फुलांची सजावट, कलात्मक शिल्पे, नैसर्गिक पार्श्वभूमी, प्रकाशयोजना व इतर छायाचित्रणासाठी उपयुक्त सुविधा विकसित केल्यास ही उद्याने नागरिकांसाठी अधिक आकर्षक ठरतील. तसेच, अशा ठिकाणांचा प्री-वेडिंग शूट, प्री-बेबी शूट, व्यावसायिक फोटोशूट, लघु चित्रीकरण व तत्सम उपक्रमांसाठी नियमानुसार परवानगी देऊन नाममात्र शुल्क आकारल्यास महानगरपालिकेच्या महसुलामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. याचबरोबर उद्यानांच्या देखभाल, सुशोभीकरण व विकासासाठी अतिरिक्त आर्थिक स्त्रोत उपलब्ध होण्यास मदत होईल, असे नमूद केले आहे. (BMC Parks Photography)

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रमुख सार्वजनिक उद्याने व बागांमध्ये टप्याटप्प्याने आकर्षक सेल्फी पॉईंट, थीम-आधारित सुशोभिकरण व छायाचित्रणासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात याव्यात. तसेच, प्री-वेडिंग शूट, प्री-बेबी शूट, व्यावसायिक फोटोशूट, चित्रिकरण व तत्सम उपक्रमांसाठी पारदर्शक ऑनलाईन परवानगी प्रणाली विकसित करून विहित शुल्क निश्चित करण्यात यावे. (BMC Parks Photography)

जेणेकरून या माध्यमातून प्राप्त होणारा महसूल संबंधित उद्यानांच्या देखभाल, सुशोभीकरण, सुरक्षा व सुविधा वाढवण्यासाठी वापरण्यात येऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतची ठरावाची सूचना महापौरांनी मंजूर करून आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवला. (BMC Parks Photography)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा