Sunday, August 23, 2026

BMC News : मुंबई महापालिका भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा देणार मालकी हक्काने जागा

BMC News : मुंबई महापालिका भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा देणार मालकी हक्काने जागा

- शासनाच्या धर्तीवर धोरण बनवण्याचा ठराव मंजूर

मुंबई ( विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने तिच्या मालकीच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडांचे कायमस्वरूपी मालकी हक्क (फ्री होल्ड) प्रदान करण्यात येणार आहे. याबाबत धोरण आता लवकरच तयार करण्यात येणार असून याचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. (BMC News)

भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे ही मागणी केली होती. यात त्यांनी मुंबई महानगरपालिकेने तिच्या मालकीचे भूखंड सहकारी गृहनिर्माण संस्थांना ६० वर्षाच्या कालावधीकरिता भाडेतत्त्वावर दिले आहेत. अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारती मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून, त्यांचे भाडेपट्टे २०२६ या वर्षापासून पुढे टप्प्याटप्प्याने संपुष्टात येणार आहेत. भाडेपट्ट्‌यांचा कालावधी संपुष्टात येण्याच्या पार्श्वभूमीवर, सहकारी गृहनिर्माण संस्थांतील रहिवाशांमध्ये कायदेशीर अनिश्चितता निर्माण झाली असून, बँक कर्ज, हस्तांतरण, पुनर्विकास व व्यवहार प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. (BMC News)

महाराष्ट्र शासनाने तिच्या मालकीच्या भाडेपट्टयांवरील जमिनी संबंधित धारकांना, निर्धारित अधिमूल्य आकारून, कायमस्वरूपी मालकी हक्क (फ्री होल्ड) प्रदान करण्याबाबत लोकहिताचा शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई महानगरपालिकेनेही भाडेतत्त्वावर दिलेल्या भूखंडांबाबत असाच धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे असे मत व्यक्त करून पटेल यांनी महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर, मुंबई महानगरपालिकेने तिच्या मालकीच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडांचे कायमस्वरूपी मालकी हक्क (फ्री होल्ड) प्रदान करण्याबाबत धोरण तयार करून, त्याची अंमलबजावणी करावी अशी सूचना केली. (BMC News)

यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी याचे विषयांतर करत गिरणीची जागा अशाच दिल्यामुळे मराठी माणूस हद्दपार झाल्याचा आरोप केला. तर अनेक जुन्या इमारती जुन्या जीर्ण झाल्याने त्यांनाच विकास होणे आवश्यक असून त्यासाठी असे भूखंड फ्री होल्ड होणे आवश्यक असल्याचे प्रकाश दरेकर यांनी सांगितले. विशाखा राऊत यांनी यातून महसूल जाईल. त्यामुळे नफा कुणाला होईल असा सवाल केला. तर अनेक भूखंड तथा मालमता या ९९९ वर्षाच्या असून फ्री होल्ड केल्यास त्याचा रिवर्ड लिझ होऊ नये. तर सिद्धार्थ शर्मा यांनी एकूण रेडी रेकनेरच्या २५ टक्के घेण्यात यावा अशी उपसूचना केली. याचा समाचार सभागृहनेते गणेश खणकर यांनी घेत अश्रफ आझमी यांच्या टीकेला उत्तर दिली. गिरण्या कुणाच्या काळात बंद झाल्या आणि त्यावेळी गिरणी कामगारांच्या कुटुंबाचे खायचे वांदे झाले होते. त्यामुळे ज्या मराठी माणसाला देशोधडीला लावले त्यांनी आमच्या मराठी माणसाची चिंता करू नये. तुम्ही तर त्यांना बेघर केली त्यांना आम्ही घेते देतो असेल सांगत आपल्या काळात गिरण्यांच्या जागेवर मॉल्स उभे राहिले. तुम्ही काय दिले तुमच्या सत्ता काळात असा सवाल त्यांनी केला. (BMC News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >