Sunday, August 23, 2026

Continental Tour Silver : भालाफेकीत रोहित यादवचा सुवर्णवेध; मुरली श्रीशंकरची ‘लांब उडी’, महिला १०० मीटरमध्ये भारताचा क्लीन स्वीप

Continental Tour Silver : भालाफेकीत रोहित यादवचा सुवर्णवेध; मुरली श्रीशंकरची ‘लांब उडी’, महिला १०० मीटरमध्ये भारताचा क्लीन स्वीप

भुवनेश्वर : भारताच्या अॅथलेटिक्सपटूंनी वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्व्हर लेव्हल स्पर्धेत दमदार कामगिरी करत अनेक पदकांवर नाव कोरले. भालाफेकपटू रोहित यादवने अखेरच्या प्रयत्नात ८७.६८ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत पुरुष भालाफेकीचे सुवर्णपदक पटकावले. तर स्टार लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ८.०७ मीटरची उडी घेत पुरुष लांब उडीचे विजेतेपद मिळवले. (Continental Tour Silver)

रोहित यादवचा सुवर्णवेध; पहिला मोठा आंतरराष्ट्रीय किताब :

रोहित यादवने आपल्या अखेरच्या प्रयत्नात ८७.६८ मीटर भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले. या कामगिरीसोबतच त्याने स्वतःचाच वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम नोंदवला. या विजयासाठी रोहितला १,६०० अमेरिकन डॉलरची पुरस्कार रक्कम मिळाली. यशवीरने ८२.९४ मीटरच्या फेकीसह रौप्यपदक, तर श्रीलंकेच्या सुमेधा रणसिंघेने ८०.२९ मीटरच्या कामगिरीसह कांस्यपदक पटकावले. (Continental Tour Silver)

रोहितसाठी हा पहिलाच मोठा आंतरराष्ट्रीय किताब ठरला. ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने शानदार पुनरागमन केले. ग्लास्गो येथे ८१.५६ मीटरच्या कामगिरीसह तो सातव्या स्थानावर राहिला होता. (Continental Tour Silver)

मुरली श्रीशंकरची ‘लांब उडी’ :

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मुरली श्रीशंकरने ८.०७ मीटरची उडी घेत पुरुष लांब उडीचे सुवर्णपदक जिंकले. दक्षिण आफ्रिकेच्या दिवान मॅन्युएलने अखेरच्या प्रयत्नात ८.०३ मीटरची उडी घेत श्रीशंकरला कडवी टक्कर दिली. भारताच्या पी. डेव्हिडने ७.७८ मीटरच्या उडीसह कांस्यपदक मिळवले. श्रीशंकरची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ८.३८ मीटर, तर वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८.४१ मीटर आहे. (Continental Tour Silver)

एन्सी सोजन पुन्हा चॅम्पियन :

महिला लांब उडीमध्ये एन्सी सोजनने ६.७१ मीटरची उडी घेत सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी याच मैदानावर तिने महान अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. भारताच्या शैली सिंहने ६.५६ मीटरसह रौप्य, तर मुबसीना मोहम्मदने ६.३१ मीटरसह कांस्यपदक मिळवले. त्यामुळे महिला लांब उडीमध्ये भारताने क्लीन स्वीप केला. (Continental Tour Silver)

महिला १०० मीटरमध्ये भारताचा क्लीन स्वीप :

महिला १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. अभिनया राजराजनने ११.३४ सेकंदांची वेळ नोंदवत स्पर्धेतील सर्वात वेगवान महिला धावपटूचा मान मिळवला. हरिता भद्राने ११.४६ सेकंदांसह रौप्यपदक, तर स्नेहा सत्यनारायणने ११.५६ सेकंदांसह कांस्यपदक पटकावले. त्यामुळे या स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी क्लीन स्वीप केला. (Continental Tour Silver)

अन्नू राणीला कांस्यपदक :

अनुभवी भालाफेकपटू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती अन्नू राणीने ५६.९६ मीटरच्या फेकीसह कांस्यपदक मिळवले. मात्र, पुरुष १०० मीटरमध्ये भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अनीमेश कुजूर १०.३२ सेकंदांसह सहाव्या, तर राष्ट्रीय विक्रमधारक गुरिंदरवीर सिंग १०.३९ सेकंदांसह नवव्या स्थानावर राहिला. (Continental Tour Silver)

महिला १०० मीटर अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रमधारक ज्योती याराजीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बहामासच्या करिश्मा टेलरने १२.९६ सेकंदांत सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्या युमी तनाकाने १३.०४ सेकंदांत रौप्यपदक पटकावले. ज्योतीने १३.२४ सेकंदांची वेळ नोंदवली. पुरुष गोळाफेकीत करणवीर सिंगने २०.०६ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदक मिळवले. त्याने अनुभवी तेजिंदरपाल सिंग तूरला अवघ्या तीन सेंटीमीटरने मागे टाकले. (Continental Tour Silver)

या स्पर्धेत भारतीय अॅथलीट्सनी विविध क्रीडा प्रकारांत दमदार कामगिरी करत आपली छाप पाडली असून, रोहित यादव आणि मुरली श्रीशंकर यांच्या सुवर्णपदकांसह महिला १०० मीटर आणि लांब उडीतील क्लीन स्वीप विशेष ठरला. (Continental Tour Silver)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >