Thursday, August 20, 2026

Cancer Vaccine : कॅन्सरवरील उपचारात मोठा चमत्कार! मॉडर्ना आणि मर्कची नवीन लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता

Cancer Vaccine : कॅन्सरवरील उपचारात मोठा चमत्कार! मॉडर्ना आणि मर्कची नवीन लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता

कर्करोगाची गाठ पुन्हा न होण्यासाठी वैयक्तिककृत 'mRNA' लस ठरतेय प्रभावी; अंतिम चाचणीत मोठे यश

कॅन्सर (कर्करोग) या गंभीर आजारावर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा शोध लागला आहे. प्रसिद्ध औषध कंपन्या 'मॉडर्ना' (Moderna) आणि 'मर्क' (Merck’s )यांनी एकत्र येऊन कर्करोगावर एक विशेष लस तयार केली आहे. या लसीच्या अंतिम टप्प्यातील (Phase 3) चाचण्यांमध्ये अत्यंत सकारात्मक निकाल समोर आले आहेत. त्वचेचा कर्करोग म्हणजेच 'मेलानोमा' झालेल्या रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर 'कीट्रुडा' नावाच्या औषधासोबत ही लस दिल्यास, कॅन्सर पुन्हा उलटण्याचा किंवा शरीरात इतरत्र पसरण्याचा धोका खूप पटीने कमी होतो, असे या अभ्यासात दिसून आले आहे.

काय आहे ही 'पर्सनलाइज्ड mRNA कॅन्सर लस' ?

आपण लहानपणी किंवा कोरोना काळात घेतलेल्या लसींसारखी ही लस आजार होण्याआधी रोखण्यासाठी दिली जात नाही. ही लस कॅन्सर झालेल्या प्रत्येक रुग्णासाठी त्याच्या शरीरानुसार स्वतंत्रपणे तयार केली जाते.

लस कशी तयार होते ? रुग्णाच्या शरीरातून शस्त्रक्रिया करून कॅन्सरची गाठ काढून टाकली जाते. त्यानंतर त्या गाठीतील पेशींची आणि जनुकांची (Genes) सखोल तपासणी केली जाते.

लस कशी काम करते? मॉडर्नाचे mRNA तंत्रज्ञान या पेशींची माहिती घेऊन रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीला (Immunity System) संदेश देते. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कॅन्सरच्या उरलेल्या सुक्ष्म पेशींना सहज ओळखतात आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करतात.

१,१३७ रुग्णांवर झाली चाचणी: काय आले निकाल ?

या संशोधनासाठी गंभीर स्वरूपाचा त्वचेचा कॅन्सर असलेल्या १,१३७ रुग्णांना एकत्र आणले गेले होते. या सर्वांच्या कॅन्सरच्या गाठी शस्त्रक्रियेने आधीच काढल्या होत्या. यामध्ये दोन गट करण्यात आले: एका गटाला फक्त नेहमीचे 'कीट्रुडा' औषध दिले गेले, तर दुसऱ्या गटाला कीट्रुडासोबत ही नवीन 'mRNA लस' देण्यात आली. याचा परिणाम ज्या रुग्णांना लस आणि औषध दोन्ही दिले गेले, त्यांच्यात कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचा धोका खूप कमी झाला. तसेच हा आजार शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरण्याचा धोकाही टळला. या उपचारादरम्यान रुग्णांच्या शरीरावर कोणताही घातक दुष्परिणाम (Side Effects) दिसून आला नाही.

रुग्णांना कधी मिळणार ही लस?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरच्या उपचारांमधील ही एक नवीन सुरुवात आहे. मॉडर्ना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीच्या मंजुरीसाठी शासकीय औषध प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. या उपचाराला 'विशेष औषध' (Breakthrough Therapy) म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सर्व परवानग्या वेळेत मिळाल्यास, ही लस पुढील वर्षापर्यंत प्रत्यक्ष रुग्णांच्या उपचारासाठी बाजारात उपलब्ध होऊ शकते.

या शोधाचा काय फायदा होणार?

या यशानंतर आता फुफ्फुस, स्वादुपिंड (Pancreas) आणि स्तनाच्या कॅन्सरवरही अशाच प्रकारची लस तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर कॅन्सर पुन्हा येईल का, या भीतीखाली जगणाऱ्या रुग्णांसाठी ही लस एक मजबूत सुरक्षा कवच ठरणार आहे. जरी या लसीचे उत्पादन करणे आणि तिची किंमत सर्वांच्या आटोक्यात ठेवणे ही मोठी आव्हाने असली, तरी कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्यासाठी ही लस नक्कीच एक क्रांतिकारी पाऊल मानली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >