Thursday, August 20, 2026

Sharad Pawar News : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी पार्थ पवारांची शरद पवारांसोबत बैठक

Sharad Pawar News : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी पार्थ पवारांची शरद पवारांसोबत बैठक

- 'सिल्वर ओक' निवासस्थानी तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यात बुधवारी रात्री 'सिल्वर ओक' या निवासस्थानी तब्बल तीन तास गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी, या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Sharad Pawar)

बुधवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास पार्थ पवार 'सिल्वर ओक'वर दाखल झाले होते. त्यानंतर जवळपास रात्री सव्वाअकरा वाजेपर्यंत, म्हणजेच सलग तीन तास आजोबा आणि नातवामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. सध्या राजकीय वर्तुळात आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला केंद्रात एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्रिपदासाठी पार्थ पवार यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातील या बैठकीत याच अनुषंगाने चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, बारामतीमधील विविध विकासकामांसंदर्भात आणि आगामी राजकीय भूमिकेबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Parth pawar Meeting)

मात्र, या भेटीबाबत दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेले नाही. त्यामुळे या तीन तासांच्या बैठकीत नेमके काय घडले, याबद्दल तर्क-वितर्क लढवले जात असून, आगामी काळात याचे काय राजकीय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Cabinet Expansion 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >