Thursday, August 20, 2026

Chhatrapati Sambhajinagar : "सॉरी आई-आप्पा, पुढच्या जन्मी नक्की डॉक्टर बनेन"; १९ वर्षीय तरुणाने शेवटची चिट्ठी लिहिली अन्...

Chhatrapati Sambhajinagar :

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न अपुरे राहिल्याच्या नैराश्यातून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा (भवरबेंद) येथील एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःचे जीवन संपवल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सूरज सुभाष शिंदे (suraj Subhash Shinde) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET) अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे त्याने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हा गेल्या काही महिन्यांपासून घरीच राहून अत्यंत जिद्दीने नीट परीक्षेची तयारी करत होता.

बुधवारी (दि. १९) गावात धार्मिक सप्ताहाचा कार्यक्रम असल्यामुळे त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर गेले होते. घरी कोणीही नसताना सूरजने नेहमी अभ्यास करत असलेल्या वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये जाऊन गळ्याला दोर लावून घेतला. दुपारी २ च्या सुमारास कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी सूरजला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा मोबाईल बंद येत होता. संशय आल्यामुळे त्याच्या लहान बहिणीने वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता, सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. कुटुंबीयांनी तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

"सॉरी आई-आप्पा, पुढच्या जन्मी डॉक्टर बनेन"

आत्महत्येपूर्वी सूरजने लिहिलेली दोन ओळींची भावुक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. "सॉरी आई आणि आप्पा... नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेल. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा," असा काळजाला घर पाडणारा संदेश त्याने या चिठ्ठीत लिहून ठेवला होता. आपल्या मुलाच्या या अकाली जाण्याने आणि शेवटच्या शब्दांनी शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण खंडाळा गावावर शोककळा पसरली असून, एका गुणवंत आणि स्वप्नाळू तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >