Wednesday, August 19, 2026

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; 5 ते 6 वाहनांची धडक, रिक्षाचा चक्काचूर

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; 5 ते 6 वाहनांची धडक, रिक्षाचा चक्काचूर

पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुलाच्या तीव्र उतारावर 5 ते 6 वाहने एकापाठोपाठ एक धडकली. या अपघातात एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून ती अक्षरशः चक्काचूर झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. (Pune Navale Bridge)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवले पुलाच्या उतारावर एका वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. भरधाव वाहनाने पुढे असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून येणारी वाहनेही एकमेकांवर आदळली आणि काही क्षणांतच 5 ते 6 वाहनांचा अपघात झाला. ( Navle Bridge Accident)

या धडकेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले. रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा आवाज झाला आणि परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. (Pune News)

वाहनांचे झालेले नुकसान आणि अपघाताची तीव्रता पाहता ही घटना गंभीर होती. मात्र, सुदैवाने रिक्षासह इतर वाहनांमधील प्रवासी बचावले. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नवले पुलाच्या उतारावर यापूर्वीही वारंवार अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. (Pune Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >