मुंबई : अभिनेत्री ईशा कोप्पिकरने अलिकडेच सोशियल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत स्वतःला 'अंधभक्त' म्हटल्या जाणाऱ्या मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले होते. ईशाच्या या वक्तव्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत हिने तिचे समर्थन केले आहे. देशप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि वैयक्तिक आयुष्यातील अन्यायाविरोधातील लढा यावर कंगनाने तिचे मत मांडत ईशाच्या विचारांशी सहमती दर्शवली आहे.
"माझे प्रेम राजकीय पक्षावर नाही, तर देशावर!" - ईशा कोप्पिकर
View this post on Instagram
ईशा कोप्पिकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, जर देशावर मनापासून प्रेम करणे आणि त्याच्या प्रगतीची इच्छा ठेवणे म्हणजे 'अंधभक्ती' असेल, तर असा 'अंधभक्त' असण्याचा मला अभिमान आहे. मात्र, ही अंधभक्ती कोणत्याही एका विशिष्ट राजकीय पक्षासाठी नसून केवळ आपल्या भारत देशासाठी आहे. ईशाने हेदेखील स्पष्ट केले की, देशावर प्रेम करताना सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करण्याचा किंवा असहमती दर्शवण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे.
नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवा
आपल्या संदेशात ईशाने देशातील नागरिकांच्या जबाबदारीवर भर दिला. "देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. हा देश माझे घर आहे, जिथे मला ओळख आणि उपजीविकेची साधने मिळाली. त्यामुळे या भूमीचा आदर करणे आणि तिची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे," असे सांगत तिने आपण भारतीय असण्याचा सार्थ अभिमान असल्याचे व्यक्त केले.
भोपाळ : सोशल मीडियावरील एका चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओमुळे एका १६ वर्षांच्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. आखाती देशांमध्ये ...
कंगनाने आठवले शाळेतील दिवस आणि २६/११ चा लढा
ईशाचा हा व्हिडिओ पाहून कंगना राणौतने 'वेल एक्सप्लेन' अशी प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले. कंगनाने स्वतःच्या आयुष्यातील काही घटना आठवत सांगितले की, "शाळेत असताना मुलांवर काठीने हल्ला करणाऱ्या शिक्षकांविरोधात मी आवाज उठवला होता. एवढेच नाही तर मुंबईतील २६/११ चा दहशतवादी हल्ला असो किंवा दिल्लीतील निर्भया प्रकरण, मी प्रत्येक वेळी अन्यायाविरोधात भूमिका घेतली आहे."
"मी देशावर आणि इथल्या लोकांवर मनापासून प्रेम करते"
आपल्या मर्यादांसाठी पालकांना दोष न देता कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी कष्ट केल्याचे कंगनाने नमूद केले. "मी माझ्या देशावर, इथल्या नागरिकांवर आणि माझ्या आयुष्यावर नितांत प्रेम करते. मी भेटणाऱ्या प्रत्येक चांगल्या माणसाची भक्त आहे," असे सांगत कंगनाने ईशा कोप्पिकरने मांडलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि देशभक्तीच्या विचारांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.





