Wednesday, August 19, 2026

Baramati News : 'जरा बारामतीकडे लक्ष द्या, दादा जाताच...' पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र व्हायरल

Baramati News : 'जरा बारामतीकडे लक्ष द्या, दादा जाताच...' पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र व्हायरल

बारामती : बारामतीतील विविध समस्या आणि वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर एक कथित खुलं पत्र सध्या चर्चेत आलं आहे. या पत्रातून पवार कुटुंबीयांना बारामतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दादांच्या आकस्मिक निधनानंतर बारामती पोरकी झाल्याची भावना व्यक्त करत, शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. (Baramati News)

'जरा बारामतीकडेही लक्ष द्या' :

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्राची सुरुवात 'आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय सुप्रिया ताई, पार्थ दादा, जय दादा, जरा बारामतीकडेही लक्ष द्या, ही नम्र विनंती' अशा आशयाने करण्यात आली आहे. बारामतीतील सामान्य नागरिक सध्या विविध प्रश्नांना सामोरे जात असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. विशेषतः नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं पत्रात म्हटलं आहे. (Baramati News)

वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा :

बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढत असून नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला आहे. तसेच शहरातील कारभार एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्यासारखी चर्चा असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. बारामती ही केवळ राजकीय जागा नसून पवार कुटुंबीयांनी अनेक वर्षांत निर्माण केलेली विश्वासाची भूमी असल्याचं पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील सर्व प्रमुख नेत्यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, गुन्हेगारी आणि प्रशासनातील कथित मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. (Baramati News)

'जनतेचा आवाज ऐका' :

या पत्रातून 'जनतेचा आवाज ऐका' असं आवाहन पवार कुटुंबीयांना करण्यात आलं आहे. दादांच्या निधनानंतर बारामतीतील परिस्थितीबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या भावना या पत्रातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रामागे नेमकं कोण आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पत्रातील दावे आणि त्याची सत्यता याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. (Baramati News)

आता या कथित खुल्या पत्रावर पवार कुटुंबीयांतील नेते काय भूमिका मांडतात आणि बारामतीतील नागरिकांच्या या कथित प्रश्नांवर काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Baramati News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >