Nashik : नाशिकच्या विकासासाठी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्रयत्न करण्यात येत आहेत. सौर कृषी वाहिनी, शेतकरी कर्जमुक्ती, ‘वीर प्रेरणा स्थळ’, ‘शिव मार्ग’ व ‘राम मार्ग’ सह विविध विकास योजनांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाचा रोडमॅप तयार झाला आहे. शेतकरी, युवक यांना पाठबळ देण्यासोबतच जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात मंत्री महाजन यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करताना शेतकरी, महिला, युवक, पर्यटन, पर्यावरण आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) अनुषंगाने विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यावेळी गिरीश महाजन यांनी भाषणात नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅपच सादर केला. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर जिल्ह्यात होऊ घातलेल्या विकास कामांच्या संकल्पाची माहिती त्यांनी दिली.
Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय (District Collector's Office) येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांच्या हस्ते ध्वजारोहण ...
वीर प्रेरणा स्थळा’ची घोषणा
नाशिक ही क्रांतिकारकांची भूमी असून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेले ‘अभिनव भारत मंदिर’ नव्या स्वरूपात उभे राहत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे लवकरच लोकार्पण होणार असून येणाऱ्या पिढ्यांना ती प्रेरणा देत राहील. युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी शहीद जवानांचे ‘वीर प्रेरणा स्थळ’ जिल्ह्यात स्थापन करण्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केली.
शेतकरी कर्जमुक्तीचा पहिला टप्पा पूर्ण
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगताना महाजन यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers' Loan Waiver Scheme)
पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पावणेदोनशे कोटी रुपये थेट जमा झाल्याचे सांगितले. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी (Chief Minister's Solar Agricultural Feeder Scheme) योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात सुमारे ५१५ मेगावॅट वीज मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा हक्काची वीज उपलब्ध होत असून या योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात सर्वप्रथम असल्याचे मंत्री महाजन यांनी नमूद केले.
Nashik : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दिली जाणारी मानाची केंद्रीय अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि केंद्रीय उत्कृष्ट सेवा पदके २०२६ जाहीर झाली आहेत. यामध्ये नाशिक ...
३३ हजार वनहक्कधारकांना सातबाऱ्यावर हक्क
नाशिक जिल्ह्यातील ३३ हजार वनहक्कधारकांचे अधिकार अभिलेख अर्थात सातबाऱ्यावर नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे कृषी कर्जासह १०० पेक्षा अधिक शासकीय योजनांचा लाभ वनहक्कधारकांना घेता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक शेतकरी महाविस्तार ॲपचा वापर करीत असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. तसेच नाशिकमध्ये लवकरच ‘शिव मार्ग’ आणि ‘राम मार्ग’ या विशेष पर्यटन बस सेवा सुरू होणार आहेत. या माध्यमातून आध्यात्मिक व तत्त्वज्ञानात्मक महत्त्व असलेली अनेक स्थळे जोडली जाणार आहेत. भाविकांची सोय होण्याबरोबरच पर्यटनातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.
‘कुंभ भक्ती संगम’ २८ ऑगस्टपासून
सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद ३१ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तयारी सुरू आहे. सिंहस्थाची कामे पूर्ण झाल्यानंतर नाशिक शहर आणि परिसराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा विश्वास मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला. आगामी कुंभमेळा स्वच्छ, हरित, पर्यावरणपूरक आणि आनंददायी करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. वारकरी संप्रदायाचा सिंहस्थ कुंभमेळ्यातील सहभाग वाढविण्यासाठी २८ ऑगस्टपासून ‘कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमाचे आयोजन नाशिक शहरात करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायासह नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Nashik : नाशिकमध्ये एक संतापजनक घटना अमोर आली आहे. माणसाच्या रूपात कसा रानटी प्राणी असू शकतो याचा प्रत्यय जिल्ह्यातील देवळा (Deola) तालुक्यातील या घटनेमुळे ...
हरित नाशिकचा संकल्प
‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमांतर्गत शाळांनी पावणेदोन लाख वृक्षांची लागवड केली आहे. उन्नत नाशिक अभियानातून लोकसहभागाने स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक घडविण्याचे प्रयत्न सुरू असून आगामी काळात नाशिक जिल्हा ‘हरित जिल्हा’ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर नाशिकमध्ये झालेल्या गुंतवणूक परिषदेत १३ हजार कोटी रुपयांहून अधिकचे करार झाले असून निफाड येथील ड्रायपोर्टमधून हजारो रोजगार निर्माण होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
जलसंधारण सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे
‘कॅच द रेन’ उपक्रमाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दखल घेतली असल्याचे सांगून हा जिल्हावासीयांचा सन्मान असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी नमूद केले. पाण्याबाबत जनजागृतीसाठी आजपासून २१ ऑगस्टपर्यंत जलसंधारण सप्ताह राबविण्यात येत असून नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या कष्टाने, महिलांच्या शक्तीने, युवकांच्या स्वप्नांनी आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीने विकसित नाशिक घडेल. विकसित नाशिकमधून विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्रातून विकसित भारत घडेल, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
या समारंभास आमदार सरोज अहिरे, महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीचे अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमास माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.