- ध्वजारोहणाची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा यंदाच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी सुटेल, अशी अटकळ बांधली जात असताना, अद्याप त्याबाबतचा निर्णय झालेला नाही. बुधवारी रात्री शासकीय ध्वजारोहणाची यादी जाहीर झाली, मात्र पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला मुहुर्त मिळाला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदी आपली नियुक्ती येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, असा दावा केला आहे. (Bharat Gogawale)
गोगावले म्हणाले की, "स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा आदेश कालच काढण्यात आला आहे. मी सध्या दौऱ्यावर असल्याने पालकमंत्रिपदाच्या अंतिम मंजुरीबाबत नेमकी काय अडचण आली, कुठल्या देवाची नड आहे, हे मुंबईत गेल्यावर एकनाथ शिंदे यांना विचारणार आहे. मात्र, आमच्यात 'मला का तुला आणि तुला का मला' हा जो काही वाद होता, तो विधान परिषद निवडणुकीच्या काळातच मिटला आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळणार हे आधीच फायनल झाले आहे. ‘ठरलंय पालकमंत्री भरत शेठ, आता फक्त जॅकेट घालायचं बाकी आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ( Raigad Guardian Minister)
- मंत्री नितेश राणे; उद्धवना मुख्यमंत्री करण्यास संजय राऊतांचा कायम विरोधच होता मुंबई : "संजय राऊत हे वरकरणी उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत असण्याचा आव आणत ...
दरम्यान, बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट या तिढ्याशी जोडली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर, रात्री एकनाथ शिंदे 'वर्षा'वर पोहोचले. या दोन प्रमुख नेत्यांमध्ये २० मिनिटे चाललेल्या या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रिपदासह, गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले महामंडळ वाटप पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करणे, शिवसेनेच्या आमदारांना विकासकामांसाठी निधी देणे आणि रखडलेल्या इतर प्रशासकीय कामांना गती देणे यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ( Maharashtra Politics)
नेमकी अडचण काय?
- रायगड जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना नेत्यांमधील अंतर्गत वाद सर्वश्रुत आहे. सुनील तटकरे यांनी आपली कन्या, मंत्री आदिती तटकरे यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्रिपद राहावे यासाठी सुरुवातीपासून सर्व ताकद पणाला लावली होती. दुसरीकडे शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी स्थानिक वर्चस्वासाठी हे पद आपल्याकडेच म्हणजेच भरत गोगावले यांच्याकडे राहावे असा हेका धरला होता. या परस्परविरोधी भूमिकांमुळेच आजवर हा निर्णय रखडला होता. - मात्र, दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत या वादावर वरिष्ठ पातळीवर तोडगा काढण्यात आला होता. त्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना आमदार करण्यासाठी शिवसेनेचे मतदार सर्वाधिक असूनही उपमुख्यमंत्र्यांनी माघार घेण्याची भूमिका घेतली होती. त्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या पारड्यात टाकण्याचे पडद्यामागे ठरले होते. त्यामुळेच आता अंतिम घोषणेची औपचारिकता पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल, असे गोगावले यांनी सांगितले.
कोण कुठे ध्वजारोहण करणार ?
शासकीय प्रसिद्धीपत्रकानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करणार आहेत. राज्यपाल पुण्यात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन तर रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले ध्वजारोहण करतील. कोकण भवन येथे मंत्री अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात मंत्री आशिष शेलार ध्वजारोहण करणार आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कोणकोणते मंत्री ध्वजारोहण करतील याची यादी शासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यासाठी मंत्र्याच्या नावाचा उल्लेख नाही अथवा नियोजीत वेळेत मंत्री पोहोचू शकणार नाही अशा ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.






