Thursday, August 13, 2026

Nitesh Rane : 'राऊत फाईल्स' उघडल्या तर उद्धव ठाकरेंबद्दल नको ते ऐकायला मिळेल!

Nitesh Rane : 'राऊत फाईल्स' उघडल्या तर उद्धव ठाकरेंबद्दल नको ते ऐकायला मिळेल!

- मंत्री नितेश राणे; उद्धवना मुख्यमंत्री करण्यास संजय राऊतांचा कायम विरोधच होता

मुंबई : "संजय राऊत हे वरकरणी उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत असण्याचा आव आणत आहेत, प्रत्यक्षात त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे होते आणि उद्धव ठाकरेंच्या नावाला त्यांचा तीव्र विरोध होता, असा दावा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी केला. "कधी जर संजय राऊतांचे वैयक्तिक टेप्स किंवा 'राऊत फाईल्स' उघडल्या, तर ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला कोणत्या पातळीवर जाऊन शिव्या देतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला मिळेल," असेही राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना नितेश राणे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर लावलेल्या आरोपांचा संदर्भ घेत राणे म्हणाले की, म्हस्के यांचे वक्तव्य शंभर टक्के सत्य आहे. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असताना संजय राऊत यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना स्वतःहून फोन केले होते. 'उद्धव ठाकरेंपेक्षा माझे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे चालवा', अशी गळ राऊत आणि त्यांचा भाऊ आमदारांना घालत होते. त्यातील काही आमदारांनी स्वतः ही बाब आमच्या कानावर घातली होती. संजय राऊत यांचे ठाकरे कुटुंबाविषयी वैयक्तिक पातळीवर नेमके काय मत आहे, हे खासदार नारायण राणे, खासदार म्हस्के आणि आमच्यासह माजी शिवसैनिकांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे खासदारकीच्या तिकिटासाठी उशीर झाल्यावर राऊतांनी रश्मी ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा म्हस्केंचा दावा अगदी खरा आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह ५ हजार कोटी रुपयांना एकनाथ शिंदे यांना विकले गेल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपाचा नितेश राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीतच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खऱ्या शिवसेनेला भरभरून मतदान केले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खरा वारसदार कोण, याचा निकाल जनतेने लोकन्यायालयात आधीच देऊन टाकला आहे. आता सर्वोच्च न्यायालयातही हाच निकाल सप्रमाण सिद्ध होईल. त्यामुळे संजय राऊत यांच्या निरर्थक आरोपांना जनता किंमत देत नाही. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना लक्ष्य करताना राणे म्हणाले की, संसदेत विद्यार्थी आंदोलनावर सविस्तर उत्तर देण्याची तयारी अमित शहा यांनी कालच दर्शवली होती. मात्र, विरोधकांमध्ये ऐकण्याची हिंमत नसून ते पळपुटे आहेत. संसदेत चर्चा झाली तर विरोधकांचे पूर्ण 'वस्त्रहरण' होईल, म्हणूनच ते पळ काढत आहेत.

शरद पवार-भाजप नेत्यांच्या भेटी ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधील गाठीभेटींवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर राणे यांनी भाष्य केले. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांच्या एकत्र प्रवासाचे उदाहरण देत ते म्हणाले की, वेगवेगळ्या राजकीय पक्षांत असलो तरी एकमेकांशी वैयक्तिक आणि कौटुंबिक नाते जोपासणे ही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय संस्कृती आहे. शरद पवार यांच्या पक्षातील नेते जर पंतप्रधान मोदी, अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांना भेटत असतील, तर त्यात मतदारसंघाच्या विकासाचे किंवा जनहिताचे विषय असू शकतात. यापूर्वीही विधानसभेच्या काळात आदित्य ठाकरे हे अनेकदा अवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला येत असत, असे सांगत त्यांनी या भेटींमध्ये काहीही गैर नसल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी

परिवहन विभागाने रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी लागू केलेल्या मराठी भाषेच्या अनिवार्यतेविषयी बोलताना राणे म्हणाले की, महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि व्यावसायिक सेवा देणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून या नियमाची अत्यंत योग्य पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि पुरेसा वेळही देण्यात आला होता, त्यामुळे आता या नियमाचे पालन सर्वांना करावेच लागेल.

सरकार जरांगेंच्या प्रत्येक शंकेचे निरसन करणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ तारखेपासून पुकारलेल्या आंदोलनावर बोलताना मंत्री राणे म्हणाले, जरांगे पाटील मांडत असलेला मुद्दा योग्य असून, राज्य सरकार त्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्यास आणि तांत्रिक त्रुटी दूर करण्यास पूर्णपणे तयार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे किंवा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवले जातील. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळवून दिले, त्याचप्रमाणे समाजाच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी हे महायुती सरकार कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >