Tuesday, August 11, 2026

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर भर

मुंबई : “शहरे म्हणजे केवळ विटा आणि काँक्रीटच्या रचना नाहीत, तर ती देशाच्या आर्थिक प्रगतीची ग्रोथ इंजिन्स आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे, तर मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे. जगभरातील शहरांसमोरील आव्हाने मोठ्या प्रमाणात समान असल्याने त्यावरील उपायही देशांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन शोधण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

मुंबईतील वरळी येथे आयोजित ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन झाले. ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेने आयोजित केलेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांतील शहरांचे प्रतिनिधी, महापौर, नगर नियोजन तज्ज्ञ आणि शहरी विकास क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत.

‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’चा संदर्भ :

संत तुकाराम महाराज यांच्या ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीचा संदर्भ देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ब्रिक्स देशांतील शहरांनी परस्पर सहकार्याच्या माध्यमातून विकासाचा नवा मार्ग तयार करण्याचे आवाहन केले. लवचिकता, नवकल्पना, सहकार्य आणि शाश्वततेच्या माध्यमातून २१व्या शतकातील नागरिककेंद्रित शहरे उभारण्यासाठी ब्रिक्स देशांनी आपले अनुभव, तंत्रज्ञान आणि नवकल्पना एकमेकांशी सामायिक कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

मुंबई भारताच्या आकांक्षांची राजधानी :

मुंबई ही भारताच्या आकांक्षांची राजधानी असून मेहनतीचा सन्मान, विविधतेचा आदर आणि संकटांशी सामना करण्याची जिद्द ही या शहराची ओळख आहे, असे शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. जागतिक दर्जाच्या मुंबईत ब्रिक्स परिषदेचे आयोजन होणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी विविध देशांतील शहरांनी एकमेकांकडून शिकावे, अनुभवांची देवाणघेवाण करावी आणि भविष्यातील भागीदारीला नवी दिशा द्यावी, असे आवाहन केले.

शहरीकरणासोबत अनेक आव्हाने :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहण्याचा विचार मांडला आहे. आज जगातील मोठ्या शहरांसमोर वेगाने होणारे शहरीकरण, हवामान बदल, पूर, उष्णतेच्या लाटा, वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी व्यवस्थापन आणि परवडणाऱ्या घरांची उपलब्धता अशी अनेक समान आव्हाने आहेत. या आव्हानांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण आवश्यक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

उंच इमारती नव्हे, नागरिकांचे जीवनमान महत्त्वाचे :

शहरांचा विकास केवळ उंच इमारती किंवा आकर्षक ‘स्कायलाइन’पुरता मर्यादित नसावा. नागरिकांचा प्रवास सुलभ होणे, सुरक्षित आणि परवडणारी घरे उपलब्ध होणे, स्वच्छ हवा मिळणे, मुलांसाठी चांगल्या संधी निर्माण होणे आणि आपत्तीच्या काळात प्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हेच यशस्वी शहरी नियोजनाचे खरे मापदंड आहेत, असे उपमुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले. शहरी विकास हा नागरिकांच्या सन्मानाशी आणि त्यांच्या भविष्यातील संधींशी जोडलेला असला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील शहरांच्या विकासाला नवी गती :

मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध शहरांमध्ये मेट्रो, रस्ते, ड्रेनेज, पुनर्विकास, परवडणारी घरे, डिजिटल सेवा, हरित पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांना नवी गती देण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या सर्व विकासकामांच्या केंद्रस्थानी नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पुढील पिढ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणारा असावा, असेही ते म्हणाले.

हवामान बदलाच्या आव्हानांसाठी महाराष्ट्र सज्ज :

मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरासाठी हवामान बदल हे गंभीर आव्हान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. समुद्राच्या पातळीत वाढ, पुराचा धोका आणि वाढते तापमान यांचा परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच शहराच्या अर्थव्यवस्थेवरही होतो. या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रण, किनारपट्टी संरक्षण, हरित क्षेत्रवाढ, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक आणि तंत्रज्ञानाधारित नियोजन या क्षेत्रांत राज्य सरकारकडून पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर :

ब्रिक्स देशांतील शहरांकडे सार्वजनिक वाहतूक, डिजिटल गव्हर्नन्स, आपत्ती व्यवस्थापन, हरित वित्तपुरवठा आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. डिजिटल ट्विन तंत्रज्ञान, AI आधारित वाहतूक व्यवस्थापन आणि स्मार्ट गव्हर्नन्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विविध जागतिक शहरांमध्ये होत आहे. या अनुभवांना एकाच व्यासपीठावर आणणे ही भविष्यातील शहरांच्या विकासासाठी मोठी संधी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

‘स्पर्धेपेक्षा सहकार्य महत्त्वाचे’ :

शहरांनी एकमेकांशी केवळ स्पर्धा करण्याऐवजी सहकार्य आणि सक्षमीकरणावर भर दिला पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह, उद्योगांसाठी सक्षम, नवकल्पनांसाठी खुले आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगत त्यांनी शहरे ही केवळ प्रशासकीय सीमा नसून नवकल्पनांच्या प्रयोगशाळा आणि शाश्वत विकासाची इंजिने आहेत, असे प्रतिपादन केले. त्यामुळे शहरांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला आणखी व्यापक स्वरूप देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा