Tuesday, August 11, 2026

Pankaja Munde : अंबरनाथचं मांजर प्रकरण माहिती आहे का ?

Pankaja Munde : अंबरनाथचं मांजर प्रकरण माहिती आहे का ?

अंबरनाथ : अंबरनाथच्या रॉयल फ्लोरा फेज-२ मध्ये २६ जुलैला बाराव्या मजल्यावरून एक मांजर खाली ढकलून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. मांजर ढकलून देणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, त्याला अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाणे जिह्यातील पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून मांजर प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे व आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. (Pankaja Munde)

मांजर प्रकरणावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "अशा पद्धतीची क्रूरता अक्षम्यच आहे". पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की समोर आलेल्या व्हिडीओत मांजरीच्या लहान पिल्लाला एका व्यक्तीने इमारतीतून खाली फेकले असल्याचे निदर्शनास आले. (Pankaja Munde)

या प्रकरणाविरोधात स्थानिक प्राणिमित्र संघटनांनी कारवाई होत नसल्याने रोष व्यक्त केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील कृत्य प्राण्यांविरुद्ध क्रूरता दर्शवणारे असल्याने प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. अशा व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३, कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. कोणत्याही पाळीव अथवा भटक्या प्राण्याला ठार मारणे, विष देणे, त्याच्या शरीराला इजा पोहोचवणे किंवा त्याला अपंग करणे हे प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०पीसीए अॅक्ट १९६०च्या कलम ११ (१) अ नुसार गुन्हा मानले जाते.

"माणसांप्रमाणेच प्राण्यांच्या जीवाचं ही तेच मोल आहे, अशी क्रूरता अक्षम्य आहे त्याबाबत त्वरित कार्यवाही करून मला अवगत करावे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे". या पत्राची प्रत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती ठाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा आणि प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती जिल्हा ठाणे यांनाही पाठवण्यात आली आहे. (Pankaja Munde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा