Tuesday, August 11, 2026

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न पेटला ! शहर अभियंत्यासह 'इतक्या' अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न पेटला ! शहर अभियंत्यासह 'इतक्या' अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

Nashik News : नाशिक शहरातील खड्डे अनेक नाशिकरांसाठी काळ ठरले आहेत. तर कोणाला गंभीर तर कोणाला किरकोळ जखमा या खड्डयांमुळे झाल्या आहेत. नाशिकच्या खड्ड्यांमुळे नाशिककर पुरते त्रस्त झाले आहे. दरम्यान आता शहरातील खड्डयांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने अभियंते गोत्यात सापडले आहे.

३६ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

महापालिका हद्दीत खड्ड्यांमुळे सहा जणांचा बळी गेल्यानंतर आणि या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री 'अ‍ॅक्शन मोड'वर आल्या आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागातील शहर अभियंत्यांसह पाच आणि पाणीपुरवठा विभागातील चार अशा नऊ कार्यकारी अभियंत्यांसह २६ उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंते मिळून ३६ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांना खुलासा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

तर खड्ड्यांसोबतच शहराच्या विविध भागांत जलवाहिन्या फुटण्याचे प्रकारही घडत आहेत. मात्र त्यानंतर जलवाहिनी दुरुस्तीचे कामही वेळेत होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील चार कार्यकारी अभियंत्यांसह १८ उपअभियंते व कनिष्ठ अभियंत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. खड्डे, जलवाहिनी दुरुस्तीतील दिरंगाईवरून या विभागावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

...यांना बजावल्या नोटिसा

बांधकाम विभागातील शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, संदेश शिंदे, रवींद्र बागूल, रवींद्र पाटील, नवनीत भामरे, नरेंद्र शिंदे, संजय अडेसरा, विशाल गरुड यांच्यासह उपअभियंता नीलेश साळी, नितीन राजपूत, हेमराज नांदुर्डीकर, भरत ठाकरे, ज्ञानेश्वर जगताप, बाळा गाजूल, प्रशांत बोरसे, दत्तात्रय शिंगाडे, सुरेश पाटील, दत्तात्रय कोल्हे, हेमंत पठे आदींचा नोटिसा बजावलेल्यांत समावेश आहे.

शहरातील खड्डे दुरुस्तीबाबत महापालिकेच्या नऊ कार्यकारी अभियंत्यांसह २६ उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. खुलासा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिला आहे.

खड्ड्यांचे खापर महापालिकेसह स्मार्ट सिटी अन् एमएनजीएलवर

नाशिकच्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे शहरात आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे. खड्ड्यांवरून नाशिककर संतप्त झाल्यानंतर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेऊन शहरातील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महासभेत नगरसेवकांनी जीवघेण्या खड्ड्यांचे खापर महापालिकेसह स्मार्ट सिटी आणि 'एमएनजीएल'वर फोडले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी कठोर भूमिका घेत बांधकाम व पाणीपुरवठा विभागाची झाडाझडती सुरू केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >